जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत झाकीर मुसाचा खात्मा, कश्मीर खोऱ्यात तणाव

57

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील कुख्यात दहशतवादी झाकीर मुसाचा गुरुवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत जवानांनी खात्मा केला आहे. पुलवामा जिल्ह्यामधील त्राल भागात ही चकमक झाली आहे. मुसाचा खात्मा झाल्यामुळे त्यानेच स्थापन केलेली गझावत उल हिंद ही दहशतवादी संघटना वाऱ्यावर पडली आहे. झाकीर मुसाच्या खात्म्यानंतर कश्मीर खोऱ्य़ात तणावाचे वातावरण असून शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

झाकीर मुसा याचे खरे नाव झाकीर राशिद भाट आहे. 2013 मध्ये पंजाबमधील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना तो हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामिल झाला. जुलै 2017 मध्ये हिजबुलचा कमांडर बुरहान वाणी याचा खात्मा झाल्यानंतर मुसा हा हिजबूलचा जम्मू कश्मीरमधील टॉपचा कमांडर झाला होता. मात्र गेल्या वर्षी त्याने स्वत:ची गझावत उल हिंद ही दहशतवादी संघटना स्थापन केली होती.

पुलवामा जिल्ह्यामधील ददसारा गावात काही दहशतावादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी जवानांना दिली. त्यानंतर जवानांनी गुरुवारी संध्याकाळी या भागात शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेच्या वेळी झालेल्या चकमकीत जवानांनी झाकीर मुसाचा खात्मा केला.  मुसासोबत या संघटनेचा कमांडर अन्सार याला देखील कंठस्नान घालण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या