…तर मलेशिया झाकीर नाईकला हिंदुस्थानकडे सोपणार

सामना ऑनलाईन । कौलालंपूर

वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रसारक झाकीर नाईक याला ताब्यात घेण्यासाठी हिंदुस्थानने औपचारिकरित्या मागणी केल्यास त्याला आम्ही हिंदुस्थानच्या ताब्यात देऊ असे मलेशियाने जाहीर केले आहे. मलेशियाचे उपपंतप्रधान अहमद झाहीद हामिदी यांनी ही माहिती मलेशियाच्या संसदेत दिली. त्यामुळे झाकीर नाईकला हिंदुस्थानात आणण्याची संधी राष्ट्रीय तपास संस्थेकडे चालून आली आहे. काही दिवसांपूर्वीच झाकीर नाईकला मलेशिया सरकारने त्यांच्या देशात कायमस्वरूपी राहण्यास परवानगी दिली होती.

‘हिंदुस्थानने म्युच्युअल लिगल असिस्टन्स कराराअंतर्गत औपचारिकरित्या जर झाकीर नाईकला ताब्यात देण्याची मागणी हिंदुस्थानने केली तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. पण आतापर्यंत हिंदुस्थानकडून कोणत्याही प्रकारचे निवेदन आलेले नाही. झाकीर नाईकने आमच्या देशात कोणताही गुन्हा केलेला नाही त्यामुळे त्याला दिलेले नागरिकत्त्व आम्ही कायम ठेवणार आहोत’, असे मलेशियाचे उपपंतप्रधान अहमद झाहीद हामिदी यांनी संसदेत सांगितले.

धार्मिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी व आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) झाकीर नाईकविरोधात ६५ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ‘आम्ही झाकीर नाईक विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतल्यानंतर आम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने झाकीर नाईकला आमच्या ताब्यात देण्यासाठी मलेशिया सरकारला रितसर विनंती करणार आहोत’, असे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.