आर्थिक अफरातफर प्रकरण; झरदारींना दहा दिवसांची कोठडी

21

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

आर्थिक अफरातफर प्रकरणात बेडय़ा ठोकण्यात आलेल्या पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारींना पुढील दहा दिवस कोठडीची हवा खावी लागणार आहे. ‘नॅशनल अकांऊंटेबिलिटी ब्युरो’च्या (एनएबी) अधिकाऱ्यांनी झरदारींना मंगळवारी स्थानिक न्यायालयापुढे हजर केले होते. या वेळी तपास यंत्रणेच्या वतीने झरदारींच्या कोठडीसाठी विनंती करण्यात आली. ही विनंती न्यायालयाने  मान्य केली.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष असलेले झरदारी यांनी आर्थिक अफरातफरीचा आरोप होताच हाती बेडय़ा पडतील या भीतीने इस्लामाबाद उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तो अर्ज धुडकावून लावताच सोमवारी पोलिसांच्या बरोबरीने ‘एनएबी’च्या पथकाने झरदारींना अटक केली. त्यानंतर मंगळवारी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. तत्पूर्वी, तीन डॉक्टरांच्या पथकाने झरदारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर ‘एनएबी’च्या विनंतीला अनुसरून न्यायालयाने झरदारींची दहा दिवसांसाठी कोठडीत रवानगी केली. आर्थिक अफरातफर प्रकरणात झरदारी व त्यांची बहीण फरयाल तालपूर हे दोघे मुख्य आरोपी असून त्यांनी बेकायदा मिळवलेला पैसे पाकिस्तानबाहेर पाठवण्यासाठी बनावट बँक खात्यांचा वापर केल्याचा आरोप आहे. या माध्यमातून दोघांनी 15 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.

हमजा शेहबाजला अटक

आर्थिक अफरातफर प्रकरणात आसिफ अली झरदारींपाठोपाठ पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते हमजा शेहबाजला लाहोर उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली. आर्थिक अफरातफर आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणांत ‘एनएबी’च्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. लाहोर उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हमजाचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या