नृत्यमहोत्सव तरुणाईचा

मुलाखत…संजीवनी धुरी-जाधव

झेलम परांजपे… शास्त्रीय ओडिसी नृत्यशैलीतील ज्येष्ठ गुरू… ओडिसी नृत्यांगना संजुक्ता पाणीग्रही यांच्या स्मृतिप्रित्यर्थ युवा नृत्यमहोत्सवाचे आजपासून आयोजन करीत आहेत… यानिमित्ताने शास्त्रीय नृत्यात तरुणाई कितपत रमते याविषयी झेलमताईंचे विचार…

‘पद्मश्री’ संजुक्ता पाणीग्रही या ओडिशी नृत्यातील पहिल्या महिला. ज्यांनी ओडिसाच्या बाहेर नृत्य पोहोचवले. माझ्यापेक्षा त्या दहा वर्षांनी मोठय़ा होत्या. रशियाचा आमच्या गुरूंसोबत एक महिन्याचा दौरा केला होता तेव्हा मी ज्युनियर डान्सर आणि त्या सीनियर डान्सर म्हणून आल्या होत्या. त्या महिनाभरात त्यांच्याशी माझे घट्ट मैत्रीचे नाते निर्माण झाले, पण दुर्दैवाने 1998 साली त्यांचे निधन झाले. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे असे सतत वाटायचे. त्यांना मी संजू नानी बोलायचे. कारण ओडिशामध्ये मोठय़ा बहिणीला नानी म्हणतात. त्यांना 2004 साली त्यांना 60 वर्षे होणार होती आणि म्हणून त्या वर्षापासून त्यांच्या स्मरणार्थ स्मितालयाकडून ‘संजुक्ता पाणीग्रही युवा महोत्सव’ सुरू केला. कारण ती नेहमीच तरुणाईला प्रोत्साहन द्यायची आणि या महोत्सवाचा तोच हेतू आहे. जेव्हा या महोत्सवाला सुरुवात केली तेव्हा पहिल्याच वर्षी ओडिशाच्या चार नृत्यशाळांना बोलावले होते. त्याच्या पुढच्या वर्षी भरतनाटय़म, त्यानंतर कथ्थक असे दरवर्षी वेगळेपण देत असतो. पण गेली तीन वर्षे आमच्याकडे फारसे फंड नसल्यामुळे माझेच विद्यार्थी या महोत्सवात सादरीकरण करतात. या महोत्सवात कधीही खंड पडू दिला नसल्याची भावना झेलम परांजपे यांनी व्यक्त केल्या.

काळानुसार सादरीकरण बदलतेय

शास्त्रीय नृत्य हे इतकी वर्षे वेगवेगळय़ा पद्धतीने टिकले आहे. उदाहरण घ्यायचे तर भरतमुनींचे नाटय़शास्त्रात नृत्याचा उल्लेख आहे. समाज जसा बदलत चालला आहे तसे त्याचे सादरीकरण बदलतेय. शास्त्रीय नृत्याचा पाया इतका भक्कम आहे की ते कधी लोप पावणार नाही. त्यात चढउतार येतील, पण लोप पावणार नाही. मुंबईत नालंदा नृत्य कला महाविद्यालय, भरत कॉलेज ऑफ आर्ट, पुणे विद्यापीठाचं ललित कला केंद्र आहे तिथे विद्यार्थी शिकायला येतात. ते नृत्याचे डिग्री, डिप्लोमा असे कोर्सेस करतात. जर तरुणाई येतच नसती तर कोणाला डिप्लोमा, डिग्री कोर्स करावासा वाटला असता? आज सगळीच तरुणाई शास्त्रीय नृत्याबाबत सजग आहे असे नाही, पण तरुणाईचा एक भाग नक्कीच सजग आहे आणि तेवढे शास्त्रीय नृत्याला पुरेसे असल्याचेही त्या आवर्जून सांगतात.

शास्त्रीय  नृत्यावर आधुनिकतेचे संस्कार

आताच्या पिढीपर्यंत पोहोचायचे असेल तर शास्त्रीय नृत्यावर आधुनिकतेचे संस्कार करायलाच हवे. तीच तीच राम आणि सीता, तीच तीच राधा आणि कृष्ण हे प्रेक्षकांना कितीवेळा दाखवणार. एक काळ असा येईल जेव्हा तोच तोचपणाचा त्यांनाही कंटाळा येईल. त्यामुळे शास्त्रीय नृत्याचा पाया तोच ठेवून वेगळे विषय त्यात घेतले तर ते समाजापर्यंत जास्त प्रमाणात पोहोचू शकतो. आताच्या पिढीला विषयांचे नावीन्य दिले तर काही हरकत नाही. पण काही परंपरावाद्यांना हे पटत नाही. मग टीका सोसावी लागते. आनंद देणारी कला लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवता आली पाहिजे. त्यामुळेच पारंपरिक शास्त्रीय नृत्यावर आधुनिक संस्कार दिले तर बरे होईल.

विषयांच्या नावीन्यामुळे प्रेक्षक वाढला

परंपरा म्हणजे तेच तेच करणं नव्हे किंवा थांबून राहणं नव्हे. नव्या गोष्टी करण्यासाठी परंपरा आपल्याला म्हणत असते की पुढे जा, पण माझ्याशी नाते सोडू नकोस. हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतविशारद डॉ. अशोक रानडे यांचे वाक्य आजही माझ्या मनात घर करून आहे आणि त्यावर माझा विश्वास आहे. माझ्याकडे अनेक नर्तक आहेत. ज्यांचा शास्त्रीय नृत्याचा पाया भक्कम आहे, ज्यांना त्या शैलीबाबत उत्तम जाण आहे अशांनाच मी संधी देते. कारण त्यांना आपण काय करतोय ते कळते. त्यातून आम्ही स्मितालयातर्फे नृत्यातून गणित दाखवले आहे, नृत्यातून सावित्रीबाई फुले यांच्यावर नृत्यनाटिका केलेली आहे. अशा प्रकारे शास्त्रीय नृत्य लोकांपर्यंत जास्त पोहोचते. वेगळा विषय आणि वेगळे संगीत घेऊन शास्त्रीय नृत्य केले तेव्हा अशा प्रकारचा केलेला प्रयत्न पाहायला येणारा प्रेक्षक वाढल्याचे झेलम सांगतात.

समाजाची आवड बदललीय

पूर्वी चित्रपटांमध्ये शास्त्रीय नृत्य पाहायला मिळायची, पण आता त्याचे प्रमाण नगण्य आहे. त्याचे कारण म्हणजे समाज बदललेला आहे, त्याची आवड बदललेली आहे. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये शास्त्रीय नृत्याबरोबरच लोकनृत्यही पाहायला मिळायचे. पण आता तसे पाहायला मिळत नाही. आजही समाजातील एक भाग शास्त्रीय नृत्याकडे वळणारा आहे. पण चित्रपट निर्माते त्यासाठी धजावत नाहीत. कारण इथे कोणाला फ्लॉप व्हायचे नाहीय. सगळय़ांनाच हीट व्हायचे आहे. त्याच्यामुळे तशा प्रकारचे चित्रपट करायला धजावत नसल्याची खंत झेलम यांनी व्यक्त केली

नृत्यशैली वेगळय़ा, सार एकच

प्रत्येक शास्त्रीय नृत्य हे श्रीकृष्णाभोवती फिरते. कृष्ण हा हिंदुस्थानभर प्रसिद्ध आहे. आपल्याकडे देव-देवी, देवळे खूप आहेत तरीही कृष्ण सगळय़ांचा लाडका आहे. प्रत्येक नृत्यशैली ही पौराणिक कथेवर आहे.  प्रत्येक नृत्यशैली मनोरंजननात्मक असली तरी त्यात अध्यात्म आहे. ते अध्यात्म तुम्हाला जाणवायला काही वर्षे त्यात मुरायला लागतात. देवळात जाणे, पूजा करणे मी कधीही करत नाही, पण देव म्हणजे माझा गुरू आणि माझी पूजा म्हणजे माझे नृत्य..