‘झीरो टॉलरन्स फॉर पॉट होल’

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता वाढावी आणि रस्त्यांवर खड्डे पडू नये म्हणून पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कडक भूमिका घेतली आहे. ‘झीरो टॉलरन्स फॉर पॉट होल’ अशा शब्दांत अधिकाऱ्यांना त्यांनी इशाराच दिला आहे. सगळय़ा रस्त्यांचा आढावा घेऊन कोणत्या रस्त्यांवर खड्डे आहेत याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी आज अधिकाऱ्यांना दिले.

पावसाळय़ात रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे पालिकेला मोठय़ा प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागते. या वर्षी रस्त्यांवर अतिशय कमी प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र कुठल्याही रस्त्यावर एकही खड्डा असू नये हे आपले टार्गेट असावे याकरिता प्रयत्न करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. पालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता वाढावी तसेच रस्त्यांवर उद्भवणाऱ्या खड्डय़ांना प्रतिबंध व्हावा या दृष्टीने विविध मूलभूत कामे गेल्या तीन वर्षांत करण्यात आली. रस्त्यांची कामे करताना रस्त्यांच्या वैशिष्टय़ांनुसार त्यांची गटवार विभागणी करून कामे करण्यात आली. त्यामुळे या वर्षी रस्त्यांवर खड्डे कमी पडले आहेत.

चर खोदणाऱ्यांची खैर नाही

पालिकेने बांधलेल्या रस्त्यांवर चर खोदून रस्त्यांची वाट लावणाऱया कंत्राटदारांची यापुढे खैर नाही. चर खोदून रस्त्यांची वाट लावणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार केली जाणार आहे. तसेच पालिका प्रशासनातर्फे याबाबत लवकरच धोरण ठरवण्यात येणार आहे. रस्त्यांचे कंत्राटदार, विविध उपयोगिता वाहिन्यांसाठी चर खोदणाऱ्यां संस्था वा संबंधित अधिकारी यांच्या चुकीमुळे किंवा कामातील त्रुटीमुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याचे आढळून आल्यास त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेण्याचे आयुक्तांनी ठरवले आहे. विद्युत पुरवठा, दूरध्वनी सेवा, गॅस वितरण यासारख्या सेवांसाठी केबल वा वाहिनी टाकताना रस्त्यांवर चर खोदण्यात येतात. कोणत्या कंपनीचे-संस्थेचे काम सुरू आहे याची माहिती बॅरिकेडस्वर लिहिली जाते, मात्र आता चर खोदण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि चर भरल्यानंतरही उपयोगिता संस्थेचे व कंपनीचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहिणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी काही दुर्दैवी घटना घडल्यास त्याबाबत जबाबदारी निश्चित करून पोलीस तक्रार केली जाणार आहे. याबाबत सविस्तर धोरणाचा मसुदा तयार करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) व संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) यांना आयुक्तांनी दिले आहेत.

खड्डय़ांची कारणे शोधा

तरीही काही ठिकाणी खड्डे दिसून आल्यास त्याची कारणे शोधण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. चर खोदल्यामुळे किंवा किंवा कंत्राटदाराने कुचराई केल्यामुळे खड्डे पडले आहेत का याची पडताळणी करून जबाबदारी निश्चित करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) व संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) यांच्या स्तरावर हा आढावा घेण्यात येणार आहे.