झोमॅटोवरून मागवलेल्या पदार्थात सापडले प्लास्टिकचे पनीर

1

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

हल्ली फूड डिलिव्हरी अॅपवरून जेवण मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. या अॅपवरून मिळणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असते अशा बातम्या देखील आलेल्या असतानाही या अॅपवरून जेवण मागविणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र संभाजीनगरमध्ये एका व्यक्तीला झोमॅटोवरून जेवण मागविल्यानंतर एक वाईट अनुभव आला आहे. या व्यक्तीच्या जेवणात प्लास्टिकचे पनीर असल्याचे समोर आले आहे. यासाठी झोमॅटोने त्या कुटुंबाची माफी देखील मागितली आहे. सचिन जामदारे असे त्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्या जेवणाचे नमुने चाचणी साठी पाठवले आहेत.

‘मी झोमॅटोवरून माझ्या कुटुंबीयांसाठी पनीर चिली, पनीर मसाला मागवले होते. माझी मुलगी हे पनीर खात असताना अचानक तिच्या तोंडात काहीतरी लागल्यासारखे झाले. तिने ते पनीर मला दाखवले तर ते फार कडक होते. त्यानंतर जेव्हा मी ते पनीर नीट बघितलं तेव्हा मला ते फायबरचे असल्याचे आढळले. मी तत्काळ ज्या हॉटेलमधून जेवण मागवले तिथे गेलो व त्यांना ते पनीर दाखवले. मात्र त्या हॉटेल मालकाने माझे काही ऐकूनच घेतले नाही व झोमॅटो डिलिव्हरी बॉयने काहीतरी केले असावे असे सांगितले. त्यानंतर मी याविषी पोलिसांत तक्रार दाखल केली. काही पैशांसाठी आपल्या जीवाशी कसा खेळ केला जातो ते मला देशवासियांना दाखवायचे आहे.

दरम्यान या प्रकरणी झोमॅटोने माफीनामा सादर केला आहे. ‘पदार्थांचा दर्जा, स्वच्छता आणि सुरक्षितता या सगळ्याशी आम्ही बांधील आहोत. ज्या हॉटेलमधून ते निकृष्ठ दर्जाचे जेवण आले होते. त्या हॉटेलला आम्ही आमच्या यादीतून काढून टाकले आहे. तुम्हाला जो त्रास झाला त्यासाठी आम्ही माफी मागतो. आम्ही तुमचे सर्व पैसे परत करू’ असे झोमॅटोने त्यांच्या माफीनाम्यात म्हटले आहे.