झ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय

सामना ऑनलाईन । लंडन

आंतरराष्ट्रीय टेनिसच्या क्षितिजावर नवा तारा उदयाला आलाय. त्याचे नाव ऍलेक्झॅण्डर झ्वेरेव. जर्मनीच्या या 21 वर्षीय तरुणाने सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचचा धुव्वा उडवत एटीपी फायनल्सच्या जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली. हे त्याचे पहिलेच एटीपी फायनल्सचे जेतेपद ठरले हे विशेष!. ऍलेक्झॅण्डर झ्वेरेवने नोवाक जोकोविचला 6-4, 6-3 अशा सरळ दोन सेटमध्ये हरवत झळाळता करंडक पटकावला. या वर्षी टेनिस कोर्टवर झोकात पुनरागमन करणाऱया नोवाक जोकोविचने याही स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. त्याने अंतिम सामन्याच्या आधी 36 सर्व्हिस गेम जिंकून चॅम्पियन होण्याच्या दिशेने पाऊलही टाकले होते. पण इवान लेण्डल यांच्या शिष्याने नोवाक जोकोविचची सर्व्हिस चार वेळा मोडून काढली.

एटीपी फायनल्स ही स्पर्धा जिंकणारा 21 वर्षीय ऍलेक्झॅण्डर झ्वेरेव हा सर्वात युवा टेनिसपटू ठरला आहे. याआधी दहा वर्षांपूर्वी नोवाक जोकोविचने ही करामत केली होती. तसेच ही स्पर्धा जिंकणारा ऍलेक्झॅण्डर झ्वेरेव हा बोरीस बेकरनंतरचा जर्मन खेळाडू ठरला आहे. रॉजर फेडरर व नोवाक जोकोविच यांना सेमी फायनल व फायनलमध्ये हरवणारा तो चौथाच खेळाडू ठरलाय.