अजरामर सरस्वती पुत्र

194

<< प्रासंगिक  >>   << दिलीप गडकरी >>

भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी १९२१ मध्ये साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर यांच्या प्रस्तावनेसह ‘वाग्वैजयंती’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहात १३७ कविता आहेत. चरित्रात्मक कवितांचा अभ्यास केल्यास एका अभागी जीवाची कहाणी, दुःखाच्या राशीवरून चालत हा कवी गेला व अल्पायुषात स्वतःची कहाणी आपल्या साहित्यातून सांगून गेला असे लक्षात येते. उत्कट भावनांचा मनोरम आविष्कार ज्यांच्यामध्ये आहे अशी काही अद्वितीय गीते गडकऱ्यांच्या प्रतिभेने निर्माण केली. त्यांची अनेक गीते भावनोत्कटता आणि रचना या दोन्ही दृष्टींनी पहिल्या प्रतीची आहेत. या गीतांच्या जोडीला १९१६ ते १९१८ या काळात लिहिलेली प्रेमगीते वाचली असता गडकरींच्या भावनाविष्काराच्या जातीचा यथार्थ परिचय होईल.

‘काव्य कराया जित्या जीवाचे जातिवंत करणेच हवे’ असे स्वतः गडकरी यांनी ‘काव्याची व्याख्या’ या कवितेत म्हटले आहे. ‘जित्या जीवाचे जातिवंत करणेच’ म्हणजे रसरसलेली उत्कट अनुभूती आणि रसरसलेल्या उत्कट अनुभूतींचा तितकाच उत्कृष्ट आविष्कार करणे गडकरी यांच्या दृष्टीने काव्याचे सर्वात स्पृहणीय कार्य होय. गडकरी यांच्या काव्यकलेचे सारे मर्म उत्कृष्ट अनुभूतींच्या या आविष्कारातच साठविलेले आहे. अतृप्त आकांक्षा, वेडय़ा आशा, इच्छाचित्रे, केवळ स्वप्नसृष्टीतच सफल होऊ शकतील असे ध्यास, निष्काम व उदात्त प्रेमातील पावित्र्य, प्रेमभावनेचा पहिला तरळता साक्षात्कार, आशा- निराशांच्या संदेहातील गूढरम्य हुरहूर, प्रेमसाफल्याची सोनेरी स्वप्ने, प्रेमामृतान्च्या सर्वोच्च क्षणात साठवलेली उत्कट सुखाची परिसीमा आणि त्या क्षणातच सुप्त असलेली नैराश्याची तीव्र दाहकता, प्रणयाची दारुण वंचना झाल्यामुळे होणाऱ्या तीव्र वेदना आणि या वेदना सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यामुळे लागलेला मृत्यूचा ध्यास या साऱ्या विविध सूक्ष्म भावनांचा गडकरी यांच्या कवनांमधून सरस व उत्कट आविष्कार झालेला दिसतो. गुजरात ही राम गणेश गडकरी यांची जन्मभूमी असली तरी महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी असल्याने त्यांनी ‘महाराष्ट्रगीत’ या कवितेत महाराष्ट्राबद्दल आदर व्यक्त केला आहे. राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राबद्दल आदर होता तो त्यांनी महाराष्ट्रगीतातून व्यक्त केला.

कवीमनाचे गडकरी यांनी ज्या कविता लिहिल्या त्यांचे संपन्न शब्दभांडार, अफाट कल्पनाशक्ती, भावनांचे उत्कट प्रकटीकरण, विलक्षण अशी संवादशैली, शोकात्म कारुण्य व्यक्त करण्याची प्रचंड ताकद हे त्यांच्या साहित्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. गोविंदाग्रजांचे जीवन व मरण विद्युल्लतेप्रमाणे क्षणभंगूर होते. गडकरी खऱ्या अर्थाने कवीच होते. मग ते नाटय़ असो, काव्य असो वा विनोदी लेखन असो, त्यात कवित्व आढळतेच. नाटक हे काव्याचे एक अंग मानले आहे. गद्य व पद्य यांच्या संयुक्त स्वरूपापासून नाटकाची उत्पत्ती होते. नाटक हे काव्याचे उत्तरस्वरूप आहे असे गडकरी मानत असत. कवितेच्या सागरात डुंबत असलेले गडकरी नाटकाच्या सागरात आपल्या प्रतिभेची होडी घेऊन २६ मे १९०६ म्हणजे निधनापूर्वी १ा३ वर्षे गेले असले तरी १९०२ साली ‘मित्रप्रीत’ व त्याच्याही आधी गुजराती भाषेत १८९० साली म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षी ‘लालजी’ या नावाने त्यांनी ‘गुणसुंदरी’ हे गुजराती नाटक लिहिले. किर्लोस्कर नाटक कंपनीत दाखल झाल्यानंतर बालगंधर्वांनी त्यांना नाटके लिहिण्यास उद्युक्त केले. तसेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या नाटकांपासून प्रेरणा घेऊन गडकरींनी नाटक लिहिण्यास सुरुवात केली. प्रेमाच्या वैराग्यावरील ‘प्रेमसंन्यास’ १९१२ साली, सद्गुणांचे वर्चस्व प्रकट करणारे ‘पुण्यप्रभाव’ १९१६ साली, दारूचा दुष्परिणाम दाखवणारे ‘एकच प्याला’ १९१७ साली, उत्कट विनोदी पण दुःखद अंताचे ‘भावबंधन’ १९१८ साली व सावनेर येथे अर्धवट राहिलेले ‘राजसंन्यास’ १९१८ साली ही नाटके लिहिली. अल्पायुष्य लाभलेल्या. मनांत फार इच्छा असूनही भरपूर वाङ्मय निर्मिती करू न शकलेल्या, खडतर आयुष्य जगलेल्या सरस्वती पुत्राला फार मोठय़ा सन्मानाची अथवा पुरस्काराची अपेक्षा नव्हती तर आपल्या मृत्यूनंतर आपण या जगात जन्म घेतला होता याची इतरांना आठवण राहावी इतकी माफक अपेक्षा होती. त्यांनी निर्माण केलेल्या दर्जेदार वाङ्मयामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही ते अजरामर ठरले आहेत. त्यांचे चाहते असे म्हणतात की जोपर्यंत मराठी भाषा अस्तित्वात आहे तोपर्यंत राम गणेश गडकरींना कोणी विसरणार नाही.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या