अमेरिकन प्रतिबंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था जेरीस ; रियालची घसरगुंडी

सामना ऑनलाईन । तेहरान

शियाबहुल इस्लामिक राष्ट्र इराणला वेगळे पाडण्यासाठी अमेरिकेने लादलेल्या आर्थिक प्रतिबंधाचे परिणाम आता प्रकर्षाने दिसू लागले आहेत. इराणचे चलन रियालच्या दरात प्रचंड घसरण होऊन एका डॉलरसाठी आता १ लाख १२ हजार रियाल मोजावे लागत आहेत. शनिवारी हाच दर डॉलरला ९८ हजार रियाल होता.

मे महिन्यात अमेरिकेने २०१५ च्या अण्वस्त्र करारातून माघार घेतली होती. त्यानंतर ईराणवर पुन्हा एकदा अमेरिकन प्रतिबंध लादण्यात आले. गेल्या वर्षी ६ ऑगस्ट आणि ४ नोव्हेंबरला इराणवरील पूर्ण आर्थिक प्रतिबंधांनंतर अनेक विदेशी कंपन्यांनी इराणशी संबंध तोडले होते .त्यामुळे इराणी चलन रियालची सतत मोठी घसरण सुरू होती. गेल्या चार महिन्यांत इराणी रियालच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. जानेवारीत एक डॉलरला ३५,१८६ रियाल असा दर होता .तो मार्चमध्ये ५० हजारावर आला आणि आता एका डॉलरसाठी १ लाख रियाल मोजावे लागणार आहेत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी गेल्या आठवड्यात इराणच्या सेंट्रल बँक प्रमुखांची हकालपट्टी केली. देशावरील आर्थिक संकट रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका बँक प्रमुखांवर ठेवण्यात आला आहे. आता आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मोठा तेलनिर्यातक असलेल्या इराणने काही देशांना आयातीवर सूट देण्याचे नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.