अरण्य वाचन…एकशिंगी गेंडा

343

अनंत सोनवणे,[email protected]

काझीरंगा, देखण्या, धिप्पाड एकशिंगी गेंडय़ाचा अधिवास. याखेरीज घनदाट झाडी… उंच डोंगर आणि खुणावत राहते ब्रह्मपुत्रा नदी…

एकशिंगी गेंडय़ासारखा महाकाय प्राणी ‘याचि देही याचि डोळा’ त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाहायला मिळावा अशी फार वर्षांपासून इच्छा होती. त्याला पाहण्याच्या ओढीने अखेर निघालो. गुवाहाटी विमानतळापासून खराब रस्त्यांवरचा पाच तासांचा खडतर प्रवास अंगावर काटा आणणारा होता, पण जंगलात एकशिंगी गेंडय़ाचं दर्शन झालं आणि सारा शीण नाहीसा झाला.

जगात सापडणाऱया हिंदुस्थानी एकशिंगी गेंडय़ांपैकी दोन तृतीयांश गेंडे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आढळतात. 1904 साली तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या पत्नीने काझीरंगा परिसराला भेट दिली, तेव्हा तिला एकही गेंडा दिसला नाही. म्हणून तिने गेंडय़ांचं संरक्षण केलं जावं अशी मागणी पतीकडे केली. त्यामुळे 1905 मध्ये हा परिसर संरक्षित वनक्षेत्र बनला. तरी प्रत्यक्ष शिकारीवर बंदी यायला 1938 साल उजाडावं लागलं. 1974 साली हे जंगल राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झालं. युनेस्कोने 1985 साली या उद्यानाचा समावेश जागतिक वारसा स्थानांच्या यादीत केला. सुमारे 1500 ते 1600 किलो वजनाचा एकशिंगी गेंडा अपवादात्मक 2000 किलोचाही असतो. हा तृणभक्षी प्राणी आहे. अंगावर चिलखतासारखी जाड कातडी पांघरणारा हा महाकाय प्राणी ताशी 40 किलोमीटर वेगाने पळू शकतो. त्याच्या अंगावर एकही केस नसतो. शरीराचं तापमान थंड राखण्याकरिता तो पाण्यात डुंबणं पसंत करतो. चावऱया माश्यांपासून रक्षणासाठी तो चिखलाचा लेप कातडीवर लावून घेतो. त्याची दृष्टी तीक्ष्ण नसली तरी श्रवणशक्ती अफाट असते. नाकावरचं मांसल शिंग मिरवत तो दिमाखात चालतो तेव्हा पाहात राहावंसं वाटतं. दुर्दैवाने या शिंगाच्या मोहापायीच त्याची चोरटी शिकार केली जाते.

गेंडय़ासारखाच आणखी एक वेगळा प्राणी इथे पाहायला मिळतो- जंगली म्हैस. लांब शिंगाच्या या म्हशींना बघूनच मनात धडकी भरते. गवत आणि पाण्याच्या आसपास त्या दिसतात. अस्तित्व धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या यादीत या म्हशींचा समावेश होतो. काझीरंगात आढळणारा तिसरा महाकाय प्राणी म्हणजे हत्ती. इथे हत्तींचे मोठमोठाले कळप असून इथलं ‘हत्ती गवत’ इतकं उंच असतं की, त्यात हत्तींचा कळप सहज दिसेनासा होतो. सांभाळून एकेक पाऊल टाकणारी गरोदर हत्तीण आणि लीलया पोहून नदी पार करणारा हत्तींचा कळप ही माझ्या काझीरंगा भेटीतली अविस्मरणीय दृष्यं आहेत. काझीरंगात वाघांची घनताही चांगली असल्याने 2006मध्ये या जंगलाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. याशिवाय इथं बारशिंगा, रानगवे, मुंगूस, कोल्हा, तरस, अस्वल, विविध प्रकारची माकडं इत्यादी प्राणीही पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय पक्षी जगत संस्थेकडून काझीरंगाला पक्षी अभयारण्याचा दर्जा मिळालाय. इथं अनेक प्रकारचे स्थानिक, स्थलांतरित, शिकारी पक्षी, पाणपक्षी आढळतात.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इथं सर्व प्रकारच्या प्राणी, पक्ष्यांसाठी इथं गवताळ कुरणं आहेत तशीच वृक्षांची घनदाट वनं आहेत. उंच उंच डोंगर, टेकडय़ा आहेत तशीच विस्तीर्ण पठारंही आहेत… आणि या साऱयाची जीवनदायिनी ब्रह्मपुत्रा नदी! त्याशिवाय चोरटी शिकार आणि मानवी हस्तक्षेप यांचाही काझीरंगावर कायम दबाव असतो. अशा परिस्थितीतही हे जंगल नुसतंच टिकून नव्हे, तर अधिकाधिक समृद्ध होत आहे. वन विभागाला त्याचं श्रेय द्यायलाच हवं. काझीरंगामध्ये खुल्या जिप्सी गाडीतून तसंच हत्तीवरून जंगल सफारी करण्याची सुविधा आहे.

प्रमुख आकर्षण…एकशिंगी गेंडा

जिल्हा…गोलाघाट, नागाव

राज्य…आसाम

क्षेत्रफळ…430 चौ.कि.मी.

निर्मिती…1974

जवळचा विमानतळ…जोरहाट (97 कि.मी.)

निवास व्यवस्था…वन विभागाची लॉजेस, खासगी हॉटेल्स

सर्वाधिक योग्य हंगाम…नोव्हेंबर ते एप्रिल

सुट्टीचा काळ…1 मे ते 31 ऑक्टोबर

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही

आपली प्रतिक्रिया द्या