अलविदा ओबामा

637

<< डॉ. विजय ढवळे, ओटावा- कॅनडा >> 

माझा प्रत्येक दिवस शिकण्यात गेला, मला तुम्हीच चांगला राष्ट्राध्यक्ष बनवले, असं अमेरिकेतल्या जनतेला भावुकपणे संबोधत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी निरोप घेतला. अमेरिकेशीच नव्हे तर जगाशी जिव्हाळ्याचं नातं जोडणारं हे व्यक्तिमत्त्व कसं आहे, हे सांगणारा हा लेख.

बराक ओबामा, नोव्हेंबर २००८ मध्ये अध्यक्षपदी निवडून आलेले पहिले कृष्णवर्णीय नेता. त्यांना नोबेल समितीने शांतता पुरस्कार जाहीर केला तेव्हा त्यांनी अध्यक्षपदाची शपथही घेतली नव्हती. दुसऱ्या खेपेस त्यांनी मिट् रॉमनीला धूळ चारली आणि पुन्हा व्हाईटहाऊसचा ताबा मिळवला. जानेवारी २०, २०१७ ला डॉनल्ड ट्रम्प तेथे अध्यक्ष म्हणून राहायला जातील. ‘पीपल्स’ मासिकाला डिसेंबर १, २०१६ ला बराक आणि मिशेल ओबामांनी संयुक्तपणे मुलाखत दिली. आठ वर्षांतली, त्या मासिकासाठी ती १७ वी मुलाखत होती.

मिशेल एकदा म्हणाल्या होत्या, ”रोज सकाळी मी या व्हाईटहाऊसमध्ये जागी होते ती हे घर पूर्वी काळय़ा रंगाच्या गुलामांनी बांधले आहे याची जाणीव ठेवून आणि समोर हिरवळीवर पहाते माझ्या दोन मुली आनंदाने खेळताहेत! किती जग बदलले आहे” त्या उत्तराला उजाळा देत मिशेल सांगतात, ”जेव्हा माझी आई, मेरियन रॉबिन्सन ही टमन बाल्कनीत उभी राहून भोवतालच्या जगाचे अवलोकन करते, तेव्हा माझे हृदय आनंदाने उचंबळू लागते. जन्मभर तिने कष्ट केले. कधी श्रीमंती अनुभवली नाही, पण तिच्या जावयाच्या कर्तबगारीने तिला आज मान मिळत आहे.” जेव्हा सासूनेही व्हाईटहाऊसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा बराक यांना खूप आनंद वाटला, कारण पतीपत्नीत भांडणे झाल्यास एक नि:पक्षपाती न्यायाधीश २४ तास उपलब्ध होणार होता!  कृष्णवर्णीय संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंबपद्धती अजून जिवंत आहेच. ती ओबामांनी जिवंत ठेवली. इतकेच नव्हे, जेव्हा ते पोपला भेटायला गेले तेव्हाही त्यांच्या सासूबाई बरोबर होत्या.

मलिया आणि साशा या दोन मुली शाळेत जात होत्या तेव्हा ओबामा व्हाईटहाऊसमध्ये राहायला गेले. अध्यक्षपद हे जगातले सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीकडे असल्याचे मानतात. पण त्या महतेचा मुलींच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून ओबामा दाम्पत्य जागरुक होते. शाळकरी मुलींच्या पाटर्य़ा इतर घरात होतात तशाच होत राहिल्या. मुलींच्या मित्र-मैत्रिणींना तिथे भरपूर स्वातंत्र्य दिले जात होते. सुरक्षा अधिकाऱ्यांची नजर त्यांना जाचक वाटत नसे. परंतु कधीही व्हाईटहाऊस प्रतिष्ठेला बाधा येईल असे वर्तन ना त्या मुलींकडून घडले, ना त्यांच्या आई-वडिलांकडून. ओबामांना गरीबांच्या दु:खांची जाणीव होती. त्यांनी कारभाराची सूत्रे हातात घेतली तेव्हा अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली होती. बँका दिवाळखोरीत जात होत्या. डेट्रॉईटची मोटारी उत्पादनाची मक्तेदारी जपानने मोडीत काढली होती. त्यावेळी ओबामांनी प्रचंड तुटीचे अर्थसंकल्प सादर केले. त्यामुळे अमेरिकेवरचा कर्जभार जवळजवळ दुप्पट झाला. परंतु बेकारी कमी झाली. व्हाईटहाऊसमध्ये दिवाळी, ईद, ज्यू लोकांचा हनोका आणि नाताळ सण थाटामाटात साजरे केले जात होते. त्यामुळे मुलींवर एकात्मतेचे संस्कार आपोआप घडत होते.

व्हाईटहाऊसमधले वास्तव्य संपल्यावर मुलींना चुकल्याचुकल्यासारखे वाटेल का? या प्रश्नाला अध्यक्षांनी हसून उत्तर दिले. ”अहो, इथूनच का, घरांतूनच बाहेर पडण्यासाठी त्या उत्सुक आहेत. मलिया आता युनिव्हर्सिटीत जाणार म्हणजे कॅम्पसवरच कुठेतरी राहावे लागणार. साशा म्हणते, आपण एका व्हाईटहाऊसमधून दुसऱ्या व्हाईटहाऊसमध्येच (ओबामांचे शिकागोमधले घरही पांढऱ्या रंगाचेच आहे) जाणार आहोत ना? तरीही दोघींमध्ये धाकटीला या घराबद्दल जास्त जवळीक निर्माण झाली आहे. स्टाफबरोबर तिच्या गप्पा रंगायच्या. मोठी अभ्यासात गर्क असायची. शिकागोतले घर आमचे स्वत:चे असले तरी त्याची ओढ मुलींना लागलेली नाही, कारण गेल्या ८ वर्षात त्या तिथे राहिलेल्याच नाहीत! त्यांच्या सर्व आठवणी या व्हाईटहाऊसमधल्या त्यांच्या खोलीशीच जास्त निगडित आहेत. भावनांचा उद्रेक वगैरे सोडून द्या, पण मुलींना माहिती होतेच की इथे आपण पाहुणेच आहोत. हे घर आपले नाही. जनतेच्या मालकीचे.”

अध्यक्षपदाच्या जबाबदाऱयांचा ताण मिशेल यांच्या मते ओबामांवर इतका पडला की त्यांचे सर्व केस ८ वर्षांत पांढरे झाले. मिशेल म्हणतात, ”या काळात आमचे पती-पत्नीचे नाते घट्ट आणि उत्कट झाले. बराक सिनेटर होता. मी वकील असल्याने आमचे घरात फारसे बोलणे होत नसे. आता प्रवास म्हटले की, बऱ्याच औपचारिक भेटींच्या वेळी आम्ही बरोबरच जातो. हिंदुस्थानमध्ये आम्हाला खूप घरच्यासारखे वाटले. तेथील लोक कमालीचे आतिथ्यशील आहेत. अदबीने वागत होते. मुंबईच्या ‘ताज’मध्ये तर मी उत्स्फूर्तपणे नाचही केला होता! आठवडय़ातले बहुतेक दिवस आम्ही एकत्र जेवण घेत असायचो. आमच्या व्यस्त आयुष्यात हे प्रथमच घडत होते. बराक सकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले की त्यांच्या मागे असंख्य समस्यांची उकल करण्याची जबाबदारी असे. रात्री ऑलिव्हेटरने दुसऱ्या मजल्यावर डिनरसाठी आले की त्या तासापुरते तरी ते गृहस्थाश्रमी बनायचे आणि आम्हा दोघांतला जिव्हाळा व प्रेम अधिकच घट्ट होत असे.”

”माझा मिशेलविषयीचा आदर व आपुलकी गेल्या ८ वर्षात दशगुणित झालेली आहे.” बराक यांनी संभाषणाची सूत्रे हाती घेतली. ”कारण अध्यक्षाच्या पत्नीने कसे वागावे, काय करावे याचे कुठलेही नीतिनियम नाहीत. तिला कोणतीही कायदेशीर अधिकारवाणी नाही. मी कधी कधी सांगायचो- अमूक देशाच्या पंतप्रधानांबरोबर मीटिंग होती. त्यासाठी मी जास्त तयारी करायला हवी होती. तेव्हा तिच्या चेहऱयावर मी तुझी समस्या जाणू शकते असा भाव असायचा. हिलरींच्या निवडणूक प्रचारात आम्ही पुरेसे झोकून दिले होते. दिवसाला दोघांची मिळून ५-६ तरी भाषणे व्हायची. आमच्या हातात होते ते सर्व केले. निकाल आमच्या मनासारखा लागला नाही. परंतु तो निर्णय अमेरिकन जनतेने घेतला होता. ६० टक्के राज्यांनी त्यांचा कौल ट्रम्प यांच्या बाजून दिला होता. हिलरांना ट्रम्पपेक्षा २० लाख मते जास्त पडली तरी त्यांचा पराजय झाला हे सत्यच होते. ते अमेरिकन घटनेनुसारच घडत होते. २००० साली ऍल गोअरलाही जॉर्ज डब्ल्यू बुशपेक्षा जास्त मते पडली होती. पण अध्यक्ष बुशच झाले नव्हते का? आपली लोकशाही आहे. ती कायदे व नियम यांना बांधील आहे. त्यात व्यक्तिगत आवडीनिवडीचा प्रश्नच येत नाही.”

तुमच्या आणि येऊ घातलेल्या ट्रम्प राजवटीत अनेक विषयांवर तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे कटूता निर्माण झाली नाही का? या प्रश्नावर बराक यांनी ताबडतोब सांगितले, ”तसे होऊच शकणार नव्हते. कारण शेवटी आपण सर्व अमेरिकेचे नागरिक आहोत. देशाची प्रगती हाच प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. मार्ग भिन्न असू शकतात. ट्रम्प निवडून आल्यावर आमची मीटिंग फक्त १० मिनिटांकरता ठरली होती. ती दीड तासापर्यंत लांबली. कारण व्यक्ती म्हणून जेव्हा आपण भेटतो तेव्हा फक्त देशहिताचा विचार करतो. मी आणलेली राष्ट्रीय आरोग्य विमा योजना रद्द करण्याची ट्रम्प यांनी अनेकदा घोषणा केली होती. आमच्या मीटिंगनंतर त्यांनी ती सुधारित अवस्थेत आणण्याचे वार्ताहरांना सांगितले होते. मी प्रथम अध्यक्ष बनलो तेव्हा कारभाराची सूत्रे बुश यांच्या हातात होती. आम्ही दोघेही विरोधी पक्षांचे. पण ओव्हल ऑफिसमध्ये बसणारी प्रत्येक व्यक्ती ही प्रथम अमेरिकनच असते आणि शेवटपर्यंत तशीच राहते!”

ट्रम्प यांनी धर्म, भाषा, वंश यांचे स्तोम माजवणाऱयांवर जहरी टीका केली होती. त्याबद्दल तुमचे मत काय या प्रश्नावर बराक यांच उत्तर तयार होते. ”निवडणूक प्रचारांतली भाषणे आणि प्रत्यक्ष अध्यक्षीय खुर्चीवर बसल्यावर उमजणारी परिस्थिती व मर्यादा यांची जाणीव होते. मी जेव्हा अध्यक्ष बनलो तेव्हा आता वर्णभेद संपला अशी हाकाटी झाली. आठ वर्षांनंतर तो अजूनही आहेच. समलिंगी व्यक्तींबद्दल आकस हा जागृतावस्थेत आहेच. त्यामुळे कोणी भाषणांमध्ये एखाद्या गोष्टीवर भर दिला म्हणून तो जास्त गडद होत नसतो! अमेरिका हे गुंतागुंत असलेले राष्ट्र आहे. इथे कोणतीही गोष्ट, योजना वा मते सरळ रेषेत प्रवास करत नसतात. प्रश्नाच्या दोन्ही बाजू हिरिरीने मांडल्या जातात. दुसऱया व्यक्तीबद्दल आदर, त्याच्या मतस्वातंत्र्याचा विचार हा अमेरिकन नेहमी करतोच, असा माझा अनुभव आहे. बदल हा घडतच असतो. तो लोकशाहीचा आत्मा आहे. एक निवडणूक लोकांच्या प्रवृत्ती बदलू शकत नाही. मी आशावादी माणूस आहे.”

ज्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटावा असे कोणते अनुभव विचारल्यावर मिशेल प्रफुल्लित झाल्या. ”सर्वात मोठा अनुभव म्हणजे सतत आठ वर्षे या व्हाईटहाऊसमध्ये राहण्याचा मान अमेरिकन जनतेने बहाल केला हाच! तोच मोठा चमत्कार मानायला हवा. आज शाळा-कॉलेजेसमध्ये प्रगती करणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. बेकारीचा दर ४.९ टक्के इतका खाली आला आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. इराणच्या अणुबॉम्ब बनवण्याच्या अभिलाषा आता प्रत्यक्षात उतरणार नाहीत. क्युबाशी राजकीय संबंध जोडले गेले. ओसामा बिन लादेन अल्लास प्यारा झाला. आताच आम्हा दोघांवर भाषणांच्या आमंत्रणांचा भडीमार होत आहे. आत्मचरित्र लिहिण्याविषयी विचारणा होत आहेत. जर आम्ही काळजी घेतली नाही तर आता होतो तेवढेच २० जानेवारी २०१७ नंतरही व्यस्त राहू!”

”मी फक्त ५५ वर्षांचा आहे आणि मिशेल ५२. अजून आमच्यासमोर बरीच वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे मी घरातच मग्न राहून मिशेलचा मनस्ताप वाढवणार नाही! ८ वर्षे झाली, आमच्या काळात राजीनामा देण्याची नामुष्की एकदाही कोणावर ओढवली नाही. भ्रष्टाचार शून्य. प्रत्येकाने आपापला भार उचलला. देशाकरता काय चांगले आहे याचाच नेहमी पाठपुरावा केला. कधी कधी अपेक्षा भंगल्या. मनाला निराशेने ठासून टाकले. पण ते क्षणभरासाठीच. मी मागे वळून पाहतो तेव्हा ज्याच्याविषयी खंत करावी असे काहीही केल्याचे किंवा माझ्या हातून घडल्याचे आठवत नाही. म्हणून मी कृतार्थ आहे. आम्ही शिक्षण क्षेत्रात प्रगती चालूच राहावी म्हणून काही प्रकल्प राबवणार आहोत. वातावरण बदलांचे स्वरूप रौद्र नसावे म्हणूनही प्रयत्नशील राहणार आहोत. पुढच्या पिढीचे आयुष्य आमच्याहून जास्त चांगले व सुखकारक व्हावे म्हणून शक्य असेल ते सर्व प्रयत्न अव्याहतपणे चालूच ठेवू.

एका प्रामाणिक-निष्ठावान, मूल्यांची जाणीव असलेल्या, इतिहास घडवणाऱ्या सप्रवृत्त अध्यक्षाला त्याच्या निवृत्तीकाळासाठी जगभरातून कोटय़वधी शुभेच्छा मिळत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या