अल्पवयीन मुलीचे जबरदस्ती अंतर्वस्त्र काढणे म्हणजे बलात्कारच, उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिपण्णी

अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने अंतर्वस्त्र काढणे हा बलात्कारच अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी आज कोलकाता उच्च न्यायालयाने केली आहे. 2008 साली घडलेल्या एका प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती अनन्या बंडोपाध्याय यांनी ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

7 मे 2007 साली पश्चिम दिनाजपूर येथे एका अल्पवयीन मुलीने रॉबी रॉय नावाच्या व्यक्तीवर तिला निर्जनस्थळी नेऊन तिची अंतर्वस्त्र काढल्याचा आरोप केला होता. त्याप्रकरणी नोव्हेंबर 2008 मध्ये रॉबी रॉयला पोलिसांनी अटक केली होती. सत्र न्यायालयाने या प्रकरणी रॉयला दोषीही ठरवले होते व त्याला साडे पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेली.

त्यानंतर रॉयने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. याप्रकरणी सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती बंडोपाध्याय म्हणाल्या ”अल्पवयीन पीडितेला आरोपीने आईस्क्रिमच्या बहाण्याने भुलवून स्वत:च्या लैंगिक सुखासाठी निर्जनस्थळी नेले होते. मात्र पीडितने जेव्हा तिची अंतर्वस्त्र काढायला नकार दिला तेव्हा आरोपीने ते जबरदस्ती काढले. त्यामुळे हे कोणत्याही प्रकारचे प्रेम नसूच शकते. हा प्रकार बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न यातच मोडतो’, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.