आचरा येथे २८ वे सिंधुब्रह्म संमेलन उत्साहात 

104

सामना ऑनलाईन । मालवण प्रतिनिधी 

मालवण तालुक्यातील आचरा येथील ‘द डॅफोडिल्स गार्डन रिसॉर्ट’ येथे सुरु असलेल्या दोन दिवसीय महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधदुर्ग यांच्या २८ व्या सिंधुब्रह्म संमेलनाचा रविवारी (८) समारोप झाला. दोन दिवस चाललेल्या संमेलनात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी गोसंवर्धन, वनौषधी, पौरोहित्य, वधुवर मेळावा या चार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या संमेलनात हास्यकवी अशोक नायगावकर, गजानन दामले, नेहा वझे, सुहास गोगटे, आनंद पुराणिक, विनायक गगनदास, सचिन भाटवडेकर, भूषण काजरेकर, श्रीकृष्ण ओगले, माजी आमदार अजित गोगटे, वल्लभ मुंडले, विष्णू करंबळेकर आदी उपस्थित होते.

न्यासाचे अध्यक्ष नीलेश सरजोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या  या संमेलनाची सुरुवात शनिवारी (७) गणेश पूजनाने झाली होती. न्यासाचे सरजोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हास्तरीय स्तोत्रपठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर वेदमूर्ती सचिन भाटवडेकर यांनी संस्कृत, संस्कार आणि संस्कृती यावर  मार्गदर्शन केले.

शनिवारी रात्री हास्य कवी अशोक नायगावकर यांचा ‘हास्याचा नायगारा’ हा हास्यकवीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. रविवारी कार्यक्रमाची सुरुवात योगासनाने झाली. दुपारी विद्यावाचस्पती गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आप्पासाहेब जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ योगाचार्य परशुराम साधले यांना देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलताना सरजोशी म्हणाले, चार वर्षे अध्यक्षपदाचा कार्यकाळ पार पाडताना मालवण तालुक्यासह अन्य तालुक्यातील युवा सहकारी व ज्येष्ठांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभले असल्याचे सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या