आष्टी – गवंड्याच्या डोक्यात दगड घालून मजुराने केला खून, आष्टी तालुक्यातील थरारक घटना

प्रातिनिधिक फोटो

गवंड्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना आष्टी तालुक्यातील देवीनिंमगाव येथे घडली आहे. ईश्वर दत्तु नवसुपे ( 27 ) असे मृत गवंड्याचे नाव आहे ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

आष्टी तालुक्यातील देविनिमगांव येथील वाळके अनारसे वस्तीवर एका घराचे बांधकाम सुरु आहे. हे काम मंगरूळ येथील गवंडी ईश्वर दत्तु नवसुपे आणि मजूर कांतीलाल मारूती काकडे करत आहेत. दोघेही बुधवारी काम आटोपून बांधकावरच झोपले होते. गुरूवारी पहाटे साडेसहाच्या दरम्यान मजूर कांतीलाल काकडे याने गाढ झोपेत असलेल्या  ईश्वर नवसुपे यांच्या डोक्यात दगड घातला. यात नवसुपे गंभीर जखमी झाले. यानंतर मजुराने घराच्या मालकाच्या चारचाकी कारवरही दगडफेक केली.

घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस उपनिरीक्षक राहुल लोंखडे, पोलिस हवालदार राजेंद काकडे, पोलिस कर्मचारी चंद्रकांत काळकुटे, गंगाधर अॅग्रे, संतोष सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी कांतीलाल काकडे यास पोलिसांनी ताब्यात घेत गंभीर जखमी ईश्वर यास लागलीच अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र डाॅक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गोरख नारायण पाचारणे यांच्या फिर्यादी वरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या