ओम फट् स्वाहा! ‘पावरी’ करू नका, कोरोना वाढतोय! तात्या विंचूने नागरिकांना दिला संदेश

लोकांचा निष्काळजीपणा वाढत चाललाय तसा कोरोनाचा धोकाही वाढत चाललाय. कित्येक जण मास्क न लावता, गर्दी करून कोरोनाचा प्रसार करण्यात हातभार लावत आहेत. अशा लोकांना तात्या विंचूने धोक्याचा इशारा दिला आहे. पावरी करू नका, कोरोना वाढतोय, असं तात्या विंचू सांगतोय.

प्रसिद्ध शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि सत्यजित पाध्ये यांचा तात्या विंचू बाहुला खूप लोकप्रिय आहे. तात्या विंचू मनोरंजनाबरोबर जनजागृती करण्याचे काम करतो. सामाजिक संदेश घेऊन आपल्या भेटीला येतो. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तात्या विंचूने कोरोनाविषयक जागृती केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तो संदेश घेऊन आलाय. यावेळी सोशल मीडियावर सध्या ज्या ‘पावरी’चा धुमापूळ सुरू आहे, त्याचा आधार घेऊन तात्या आपल्याला काहीतरी सांगताना दिसतोय.

‘नमस्कार मी तात्या विंचू. ये हमारी ‘पावरी’ हो रही है. पार्टी कसली करताय. कोरोनाच्या केसेस वाढत चालल्यात. वॅक्सिन आली तरी पार्टी करून गर्दी करू नका. नाहीतर कोरोनाचा आत्मा तुमच्यात आणि तुमचा आत्मा बाहेर. ओम फट स्वाहा,’ असं तात्या सांगताना दिसतोय.

पावरीची नेमकी भानगड काय?

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दनानीर मुबीर या तरुणीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत ती आपल्या मैत्रीणींसोबत पार्टी करत होती. या व्हिडीओत ती ‘ये हमारी कार है, ये हम है, और ये हमारी पावरी हो रही है’, असं म्हणताना दिसली. ‘पार्टी’चा उल्लेख ‘पावरी’ असा केल्याने सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली गेली. रणवीर सिंग, शाहीद कपूर, राज पुंद्रा आदी सेलिब्रेटींनीही ‘पावरी’चे व्हिडीओ शेअर केले आहेत.

 सोशल मीडियावर गाजलेल्या ‘पावरी’ व्हिडीओचा संदर्भ घेऊन कोरोनाविषयक जनजागृतीसाठी तात्या विंचूचा व्हिडीओ तयार केलाय. बोलक्या बाहुल्या हा सामाजिक संदेश प्रभावीपणे लोकांपर्यंत  पोचवण्याचं खूप चांगलं माध्यम आहे.

सत्यजित पाध्ये, शब्दभ्रमकार

आपली प्रतिक्रिया द्या