कळसूबाईच्या अंगणात…

अनंत सोनवणे

कळसूबाई गिर्यारोहकांना खुणावतेच… पण अनेक पक्षी, शेकरू, लहान मोठे प्राणी तिच्या अंगणात मनसोक्त बागडतात….

अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला भूप्रदेश, हिरवीगर्द वनराई, डोंगराच्या कुशीतून जाणाऱया नागमोडय़ा रानवाटा, उंचच उंच डोंगरमाथे, पावसाळय़ात खळाळणारे धबधबे, वाहत्या नद्यांचे प्रवाह… निसर्गावर प्रेम करणाऱया कुणाही व्यक्तीला उत्कट साद घालणारे हे दृश्य आहे कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्याचे. पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर जिह्यातल्या अकोला तालुक्यात हे अभयारण्य आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले हे अभयारण्य त्याच्या जैवविविधतेबरोबरच निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते. मुळा, प्रवरा, आढळा या नद्यांच्या प्रवाहांनी इथला प्रदेश सुजलाम् सुफलाम् बनवला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून उगम पावणाऱया प्रवरा नदीच्या उगमाखाली भंडारदरा धरण बांधण्यात आलंय. या धरणामुळे एक विस्तीर्ण जलाशय तयार झालाय. त्या जलाशयाचे नाव सर आर्थर लेक. हा जलाशय आणि त्याभोवतालचा प्रदेश विविध प्रजातींच्या पक्ष्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरलाय.

नद्या आणि जलाशयाबरोबरच उंचच उंच गिरीशिखरे हे या भूप्रदेशाचे आणखी एक वैशिष्टय़. पश्चिम घाटातले सर्वाधिक उंच शिखर कळसूबाई याच अभयारण्यात येते. या शिखराची उंची आहे १,६४६ मीटर! कळसूबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हटले जाते आणि हे शिखर सर करण्यासाठी इथे ट्रेकर्सचा वर्षभर राबता असतो.

एका वन्यजीवप्रेमीसाठी इतर आकर्षणांपेक्षा इथले निसर्गसौंदर्य आणि इथली जैवविविधता अधिक मोलाची ठरते. कळसूबाई हरिश्चंद्रगडाचे जंगल मिश्र दमट पानगळी प्रकारचे आहे. अशा  प्रकारच्या जंगलात वनस्पती आणि वृक्षांचे वैविध्य इतर जंगलांपेक्षा खूपच आगळेवेगळे असते. साहजिकच हे अभयारण्य वन्यजिवांच्या दृष्टीने एक उकृष्ट अधिवास बनले आहे. महाराष्ट्र सरकारने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार १८८६ साली हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित केला. इतर अभयारण्यांप्रमाणे इथे सफारी प्रचलित नाही. एखादा स्थानिक वाटाडय़ा सोबत घेऊन मस्त पायी भटकत जंगलातल्या प्राणी-पक्ष्यांचे निरीक्षण करता येते. महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला शेकरू या अभयारण्यात पाहायला मिळतो. इथे बिबळय़ाचाही मुक्त वावर आहे. तसेच रानमांजर, कोल्हा, तरस, लांडगा, भेकर, रानडुक्कर, सांबर, साळिंदर, ताडमांजर, उदमांजर, मुंगूस, घोरपड, वानर इत्यादी प्राणी इथे दिसू शकतात.

हे अभयारण्य मुंबई, पुणे, नाशिक, नगर या प्रमुख शहरांपासून जवळ आहे. त्यामुळे वन्यजीवप्रेमींनी येत्या पावसाळय़ात इथल्या भेटीचे नियोजन करायला काहीच हरकत नाही.

कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण…सह्याद्रीचं निसर्गसौंदर्य

जिल्हा…नगर

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…३६१.७१० चौ. कि. मी.

निर्मिती…१९८६

जवळचे रेल्वे स्थानक…घोटी (३५ कि. मी.)

जवळचे विमानतळ…मुंबई (१८५ कि. मी.)

निवास व्यवस्था…महाराष्ट्र पर्यटन विकास

महामंडळाचं पर्यटन संकुल, वन विभाग, पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागाची विश्रामगृहे.

सर्वाधिक योग्य हंगाम…जुलै ते जानेवारी

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही