‘क्लेश’ नको म्हणून शेट्टींच्या यात्रेला सदाभाऊंची दांडी

316

सामना ऑनलाईन, पुणे

शेतकऱ्यांच्या प्रश्नी महात्मा फुले वाड्यातून आसूड कडाडून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुणे ते राजभवन ‘आत्मक्लेश पदयात्रा’ आजपासून सुरू झाली. मात्र राजू शेट्टी यांचे सहकारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत या यात्रेत सहभागी झाले नाहीत. शेट्टी आणि खोत यांच्यातील वाद उघड झाला आहे. म्हणूनच उगाच ‘क्लेश’ नको यासाठीच खोतांनी यात्रेला दांडी मारल्याची चर्चा आहे.

कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, या प्रमुख मागण्यांसाठी काढलेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव, लक्ष्मणराव वडले, पृथ्वीराज जाचक, सतीश काकडे, रविकांत तूपकर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, विविध संघटना, तृतीयपंथी संघटनेच्या लक्ष्मी त्रिपाठी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले या पदयात्रेत सामील झाली. ही पदयात्रा ३० मे रोजी मुंबईत राजभवनावर धडकणार आहे.

खासदार शेट्टी म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारशी चर्चेचे सर्व पर्याय थकले आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्याचे काय झाले, याबद्दल बोलण्यास ते तयार नाहीत. खोटे स्वप्न सरकारने दाखविले. त्यात आम्हीही दोषी असल्याची भावना आमची आहे. म्हणून ‘आत्मक्लेश’ करून प्रायश्चित्त घेत आहोत. मन शुद्ध झाल्यानंतर जे बाहेर येईल ते सर्वांना कळेल.

भाजपला आम्ही सत्ता दिली; त्यांना सत्तेचा माज आलाय!
‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट वाढवू, असे खोटे स्वप्न भाजपने दाखविले. पण तीन वर्षांत उत्पन्न सोडा, कर्ज दुप्पट झाले. सरकारने शेतकऱ्यांना फसविले. त्यांचा विश्वासघात केला. भाजपला आम्ही सत्ता दिली. त्यांना सत्तेचा माज आला आहे,’ अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

पनवेलमध्ये शिवसेनेला पाठिंबा
पनवेल महापालिका निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिवसेनेला पाठिंबा आहे. शिवसेनेसोबत आम्ही ताकदीने निवडणुकीत उभे आहोत, असे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता, सध्या ‘आत्मक्लेश’ करीत आहोत, असे शेट्टी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या