खिडकीबाहेरचं जग

279

>> मलिका अमरशेख

खिडकीबाहेरलं जग फार सुंदर असतं… रंगीत न् जिवंत अनुभव देणारं… हिरवी पानं अन् केशरी, नारंगी, लाल पिवळी, अनंत रंगांची डोलणारी फुलं त्याचा सुगंध. अगदी मातीतून येणाऱया मदमस्त कस्तुरीमृगागत वेड लावणारा… पण या खिडक्या उघडल्या पाहिजेत. प्रत्येक भिंतीतल्या अन् मनातल्याही…

शब्द धावत पळत आले… दारातच धापा टाकत थांबले… वृद्धाश्रमात थकलेले उदास म्हातारे खिन्नपणे बसावेत तसे अनेक अनुभव आरामखुर्चीवर बाकावर बसलेले… भुवया उंचावत त्यांनी शब्दांकडे पाह्यलं…

‘‘येऊ का आत?’’ शब्दांनी काकुळतीनं विचारलं… अनुभवानं गंभीर विचारी नजरेनं एकटक पाह्यलं… न बोलताच आत येण्याची खूण केली. सुटकेचा निःश्वास टाकत शब्द आत दाखल झाले.

खिडकीच्या कट्टय़ावर एक स्वप्न पाय हलवत मजेत बसलेलं… खिडकीच्या बाहेर फुलांवर एक रंगीत फुलपाखरू तरंगत फुलांच्या नाजूक तलम पाकळय़ांवर नाचत होतं… शब्दांनी टाळय़ा पिटल्या… खुदुखुदु हसले… अनुभव काही हसला नाही… लहान अल्लड पोरांच्या उल्हासाकडे परस्थ दूरस्थ तटस्थ पहावं एखाद्या नैराश्यग्रस्त माणसानं तसं पहात राहिला. नंतर त्यानं नजर वळवून पाह्यलं… सत्याची कुरूप जख्ख म्हातारी पांढरेशुभ्र केस विंचरीत घराच्या पायरीवर बसलेली. अनेक वर्षे ती आहे तशीच… लोक पाहून दचकायचे, तिला टाळायचे, पण ती टकटकीत नजरेनं, चेटूक नजरेनं बघत रहायची लोकांना… ‘टाळताय् का मला? पण मला बघण्याशिवाय पर्याय नाहीय्… मी आहे अशीच राहणाराय्…’ अशा नजरेनं जाळायची लोकांना, पण शब्द किंवा स्वप्नाला काही फरक पडत नव्हता. सत्याची कठोर कर्कश म्हातारी न् अनुभवांचा मख्ख म्हातारा यांच्या अस्तित्वानं त्यांना काहीच फरक पडला नव्हता. निरागस अल्लड पोरांगत ते हर क्षणाला उत्सुक, कुतुहलानं खिडकीबाहेरच्या जगाला निरखत होते.

खिडकीबाहेरलं जग फार सुंदर होतं… ते रंगीत न् जिवंत होतं… हिरवी पानं किलबिलत ‘या या’ करत बोलावत होती. केशरी, नारंगी, लाल पिवळी, अनंत रंगांची फुलं पाकळय़ांची तलम वस्त्रांची टोकं धरून गात डोलत होती. पिवळीधम्मक उन्हं पडून माती सोनेरी सोनेरी चमकत होती. तरुणीच्या नितळ चमकणाऱया कांतीगत… न् मातीतून येणारा मदमत्त गंध कस्तुरीमृगागत वेड लावणारा…

खिडकीतून बाहेर दिसणाऱया झाडांवर छोटी छोटी घरटी होती. सुबक विणलेली… एखाद्या कुशल गृहलक्ष्मीनं बाळासाठी विणावी अंगडीटोपडी तशी ती घरटी… त्यात छोटी पिल्लं… आशा… अपेक्षा… आकांक्षा. इवली लाल चोच उघडून ती चिवचिवत हाक मारत होती… केवढं तरी अद्भुत गारूड करणार होतं बाहेर…

‘‘तू कधी गेलायस् बाहेर या खिडकीच्या?’’
शब्दांनी स्वप्नाला विचारलं.
‘‘नाही.’’
‘‘का नाही.’’
‘‘ते इथनच छान दिसतं.’’
‘‘पण बाहेर जाऊन आपण झाडांवर चढू… फुलपाखरांना पकडू… फुलं तोडू…’’ शब्द उत्सुक झाले. स्वप्नानं मान हलवली…
‘‘बाहेर गेलो की, सगळा काळा अंधार… खूप भीती वाटावी असा काळोख… त्या फांद्या काळी लांब नख असलेली बोटं होतात… हा आता असलेला चिवचिवाट, किलबिल बंद होऊन वटवाघूळ घुबडांचे चित्कार, कलकलाट सुरू होतो…’’
स्वप्नानं सांगितलं न् शब्दांचे चेहरे आक्रसले…
‘‘पण… हे तर सगळं खरं न् सुंदर आहे.’’
‘‘इथूनच  दिसतं खरं न् सुंदर… बाहेर पडलं की कळेल…’’
स्वप्नाच्या म्हणण्यावर पहिल्यांदाच अनुभवाच्या उदास म्हाताऱयानं मान हलवली न् पहिल्यांदाच त्यानं तोंड उघडलं…
‘‘बाहेरचं जग पाशवी… सैतानी… घराबाहेर स्वप्नं दिसली की, घार झडप घालून जसं कोंबडीच्या पिलांना उचलते तशी झडप घालून स्वप्नांना पंज्यात पकडते… मारून टाकते… कित्येक स्वप्नांना मारलंय् त्यांनी… आजवर…’’
शब्द घाबरेघुबरे झाले… मोठमोठय़ा गरीब भयचकीत डोळय़ांनी त्यांनी स्वप्नाचा हात धरला.
‘‘नको नको… आम्ही नाही जाणार खिडकीबाहेर…’’शब्द ओरडले.
‘‘बंद करा ती खिडकी’’ सत्य नावाची ती खडूस म्हातारी पायरीवरून ओरडली…
‘‘जाऊ दे… तेवढंच दृष्टिसुख…’’
अनुभव सुरकतलेला चेहरा चोळत म्हणाला.

शब्द आता घरभर फिरू लागले.. त्यांची इवली इवली पावलं घराच्या जमिनीवर उमटू लागली… विवर्ण भिंतीच्या चेहऱयावर शब्दांनी अनेक चित्रं काढली. मोर, हत्ती, फुलं, फुलपाखरू, घरटं, झाड, सूर्य… घराच्या भिंतींवर अनेक खिडक्या उघडल्या… प्रत्येक खिडकीत एक जिवंत रंगीत चित्र… एक वेगळं सुंदर जग… त्या खिडक्यांना झडपा नव्हता… आता त्या खिडक्या कधीही बंद न होणाऱया… न् प्रत्येक खिडकीतलं वेगळं जग कायम कायम राहणारं… स्वप्न हसलं… प्रत्येक खिडकीत ओठंगून हसत पाहू लागलं… भिंतींनी डोळे मिचकावले… अनुभवाचा म्हातारा उठून उभा राहिला… भूतकाळाची काठी आपटत आत जात म्हणाला, ‘‘आता खूप खिडक्या उघडल्या… आता मी झोपतोय्… खूप वर्षे जागा आहे… तसं पण खिडक्याबाहेरचा उजेड मला सोसवत नाही… पण तुम्ही पहा… खिडक्या उघडल्याच पाहिजेत. प्रत्येक भिंतीतल्या खिडक्या उघडल्या पाहिजेत… प्रत्येक भिंतीतल्या…’’
… हळूहळू खिडक्या… भिंती-घर हिरवं, रंगीत, जिवंत होत गेलं… चित्राआत आणि एक चित्र असावं तसं…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या