घरंदाज गायकी, एक मैलाचा दगड !

533

<< संगीत सान्निध्य  >> सारंगी आंबेकर

हिंदुस्थानात पूर्वापारपासून संगीत कला गुरुमुखातून ग्रहण केली जाणारी अर्थात मौखिक परंपरेची कास धरणारी आहे. पण संगीतज्ञ अशोक रानडे म्हणतात त्याप्रमाणे ‘लिहिता येत नाही वा लिहिण्याची सामग्री आसपास तयार होत नाही म्हणून मानव समूह जी संपर्कक्रिया अनुसरतात ती मौखिक परंपरा होय. मात्र तरीही सर्व काही लिहून ठेवण्याचा हव्यास धरावा!’ इथे  रानडय़ांना अभिप्रेत असलेले तारतम्य ठेवून ज्या मोजक्या संगीतज्ञांनी लेखनाद्वारे गुरुखेरीजही ज्ञानार्जनाच्या वेगळय़ा वाटा निर्माण केल्या ते म्हणजे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे हे होत. याच प्रवाहातील महत्त्वाचे नाव म्हणजे संगीतज्ञ वामनराव देशपांडे. पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले वामनराव देशपांडे यांनी ग्वाल्हेरच्या यादवराव जोशी व शंकरराव कुलकर्णी तर किराण्याच्या सुरेशबाबू माने यांच्याकडून तालीम घेतली होती. जयपूर घराण्याच्या नथ्थन खाँ, मोगूबाई कुर्डीकरांच्या तालमीमुळे सर्वच घराण्यांचे प्रयोजन, उगम, धारणा, सौंदर्यशास्त्र निकष यांचे तुलनात्मक विश्लेषण यात शास्त्र व क्रियात्मक बाजूंचा समन्वय आढळतो.

सुगम किंवा सिनेसंगीताची अफाट लोकप्रियता शास्त्रीय संगीताला लाभणे कठीण असले तरी या वाटेवरच्या हौशानवश्यांनाच नव्हे तर आस्वादक अभ्यासक यांनाही संगीताची थोडीफार जाण येईल व खुद्द कलाकारांनाही विचार करायला प्रवृत्त करेल असे भांडार वामनरावांनी ‘घरंदाज गायकी’ या पुस्तकाद्वारे खुले केले. मे १९६१  साली आलेल्या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे रसिकांनी उदंड स्वागत केले. दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत काही ठळक आक्षेपांचा परामर्शही वामनरावांनी घेतला आहे. मूळ आवृत्तीला असलेली प्रो. बी. आर. देवधरांची प्रस्तावना पुस्तकातील बलस्थानांचा उचित पुरस्कार करते.

‘संगीतातील घराणी’ हा बुजुर्गांपासून ते नवोदितांपर्यंत अस्मितेचा विषय असला तरी घराण्यांचे उगम, त्यांनी अंगिकारलेल्या गायकीचे नियम व शिस्त ही त्यात भर पडत जाणाऱया प्रत्येक कलाकाराबरहुकूम विस्तारत जाते. कलाकाराच्या आवाजामुळे येणाऱया मर्यादा किंवा अटकावच नसलेल्या आवाजामुळे गायकीला घेता येणारी झेप हे दोन्हीही घराण्यांध्ये सतत नवचैतन्य फुंकत असते. तर एकाच घराण्याच्या दोन गुरूंकडून संक्रमित होणारी गायकीही आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवते. असे असताना घराण्याविषयीची चर्चा म्हणजे ‘ऋषीचे कूळ किंवा नदीचे मूळ’ शोधण्याइतके जटील होऊन बसते. हा रंजक पण स्फोटक बनू शकेल असा विषय वामनरावांनी अप्रतिमरीत्या हाताळला आहे यात शंका नाही.

प्रास्ताविकात हे ‘घराणे’ पद प्राप्त होण्यासाठीच्या पात्रताविषयीचे कथन आहे. दुसऱ्या प्रकरणात आग्रा किराणा, जयपूरसारख्या घराण्यांनुरूप आवाजाच्या लगावाची चर्चा करताना वामनरावांनी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘गुरूचा आवाज कोणत्याही वैयक्तिक, शारीरिक अगर अन्य कारणाने दोषयुक्त असला तर निदान शिष्याने तरी तो दोष टाळण्याचा प्रयत्न करू नये काय?’

‘बंदिश’ व ‘अंतर्गत कायदे’ या प्रकरणात वामनरावांनी ख्यालगायकीच्या प्रक्रियेतील पाच महत्त्वपूर्ण घटक बंदिशीची मांडणी – स्थाई व अंतरा, आलापी, बोलआलाप, बोलतान व तान यांची सखोल चर्चा केली आहे. ख्यालात उत्कंठा निर्माण करताना लय व स्वर यांच्या परस्पर संबंधातून चल किंवा उपज अंग कसे केले जाते याविषयी सर्वसामान्य रसिकालाही कळावे अशातऱहेने त्यांनी विषय हाताळला आहे. स्वर आणि लय या दोन मुख्य घटकांच्याच आधारे ‘दोन टोकांची दोन घराणी’, ‘सुवर्णमध्यातील घराणी’, ‘पतियाळा’ व बडे गुलामअली खाँ, ‘इंदोर आणि आमीरखाँ’ या प्रकरणांमध्ये आग्रा, जयपूर, ग्वाल्हेर, किराणा, पतियाळा आणि इंदोर या घराण्यातील कलाकार व त्यांच्या गायकीचा परिचय वाचकाला घडतो. ‘संभाव्य आक्षेप’ या प्रकरणात लेखक स्वर व लयीचा मेळ साधून त्यांची स्थाने निश्चित करणारी एक आकृती देतात.

घराण्यांच्या समृद्ध गायकीचा असा ढोबळ विचार स्वर, लय व बंदिशीच्या आंतरसंबंधांना संपूर्णतः विशद करू शकत नसला तरी या गहन विषयाला समजून घेण्यास नक्की हातभार लावतो. त्याचमुळे ‘घराण्यांच्या मर्यादा’ व ‘नवीन घराण्यांची संभाव्यता’ यांचाही अभ्यास अपरिहार्य ठरतो. पुस्तकातील शेवटचे प्रकरण ‘घरंदाज गायकीचे भवितव्य’ हा तर माझ्या मते प्रत्येक तपानंतर नव्याने मूल्यमापन होण्याइतका बदलता व नवी आव्हाने असणारा विषय ठरावा. पुस्तकात परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेले वामनरावांचे ‘संगीत आणि शब्द’, ‘हिंदुस्थानी संगीतातील नवप्रवाह’, ‘कार्ल सी शोअर, बाणी आणि घराणी’, ‘गेल्या पन्नास वर्षांतली संगीताची वाटचाल’ हे लेख अभ्यासूंना गेल्या शतकातली शास्त्रीय संगीताची जडणघडण समजून घ्यायला सहाय्यक ठरावेत.

‘घरंदाज गायकीने’ लक्षात आणून दिलेले घराण्यांच्या प्रयोजनाचे गांभीर्य लक्षात घेता आजच्या काळात जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे एकाहून अधिक गुरू व पर्यायाने घराणेदार गायकीची दारं खुली असताना या संपूर्ण विषयाला एक वेगळे परिमाण मिळालेले आहे.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या