घोंगडी.com

नमिता वारणकर,[email protected]

घोंगडी विणण्याच्या ग्रामीण कलेला आधुनिकतेची जोड देण्यासाठी करमाळा तालुक्यातील निरज बोराटे आणि तुषार पाखरे हे अभियांत्रिकी शाखेतले पंचविशीतले तरुण मेहनत घेत आहेत. यासाठी त्यांनी चक्क www.ghongadi.com’ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

तळी, भंडारा, जागरण, गोंधळ, महापूजा असा महाराष्ट्राचा सांस्कृतिक, पारंपरिक वारसा जपणारी घोंगडी… सत्यनारायण घालताना तर घोंगडीवर बसण्याचा गावात मान असतो. लग्न-साखरपुडय़ाच्यावेळी होणाऱया बैठकांना घोंगडीवर प्रतिष्ठेचे मानले जायचे… ग्रामीण भागातील धनगर समाज आजही त्यांच्या प्रथेप्रमाणे काठी नि घोंगडं घेऊन जत्रेला जाताना मोठय़ा प्रमाणात आढळतो…इतकेच नाही तर गुरुचरित्राचा अध्याय, शिवकालातही घोंगडीचा वापर केल्याचा उल्लेख आढळतो… ऋतुमानाप्रमाणे शरीरात आवश्यक ते परिणाम घडवून आणणारी… पुरातन काळापासून वापरात असलेल्या घोंगडीचे आरोग्यदृष्टय़ाही अनेक फायदे आहेत…मात्र आज मेंढय़ांच्या लोकरीपासून तयार होणारी घोंगडी विकत मिळणं दुर्मिळ झालं आहे. तिचा पारंपरिक वापर लुप्त होत आहे…याकरिता घोंगडी विणण्याच्या ग्रामीण कलेला आधुनिकतेची जोड देण्यासाठी करमाळा तालुक्यातील निरज बोराटे आणि तुषार पाखरे हे अभियांत्रिकी शाखेतले पंचविशीतले तरुण मेहनत घेत आहेत. यासाठी त्यांनी चक्क ‘ww.ghongadi.com’ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. ज्याद्वारे ग्राहक त्यांना हव्या त्या प्रकारची घोंगडी घरपोच मागवू शकतात.

ghongdi-cccom

गावातील घोंगडी विणणाऱया कलाकारांचे वय आता ५५ ते ६० च्या दरम्यान आहे. पारंपरिक खड्डामागावर घोंगडय़ा विणणाऱया कलाकारांची संख्या कमी होत आहे. त्यांच्या मुलांना ही कला अवगत नाही. विणलेल्या घोंगडय़ा शहरात, गावोगावी नेऊन विकायच्या एवढेच यांना माहीत. सध्या उपलब्ध असलेली विक्रीची साधनेही त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे घोंगडीचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी या कलेचा २ वर्षे अभ्यास करून या कलाकारांना मदत करायची आणि गावातील सांस्कृतिक कलेचा प्रचार करायचे ठरवले, असे हे तरुण सांगतात.

 रोजगाराला आधुनिकतेचा साज

लोकरीपासून गादी, उशी, लोड, गालिचा, जाजम, आसनपट्टी, कानटोपी, हातमोजे अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. यामुळे कला टिकतेच. गावातील स्त्री-पुरुषांना रोजगार मिळतो आणि त्यांच्या कलेतील कौशल्यही वाढीस लागते.

घोंगडीचे भविष्य

व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई आणि इतर काही शहरात बऱयाच जणांना घोंगडीचे महत्त्व माहीत नाही, हे सर्वेक्षणामुळे लक्षात आले. त्यामुळे ही कला टिकून राहावी आणि या कलेवर जे अवलंबून आहेत याचा त्यांना थेट फायदा व्हावा यासाठी सातारा, सोलापूर, सांगली येथील कलाकारांचा आम्ही शोध घेत आहोत. महाराष्ट्राला प्रत्येक घोंगडी विणणारा कलाकार घोंगडी डॉट कॉमला जोडला जावा तसेच १०० वर्षांनंतरही लोकांना घोंगडी माहीत व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे ध्येय निरज बोराटे आणि तुषार पाखरे जपत आहेत.

 घोंगडी कशी तयार होते…

सर्वप्रथम मेंढय़ांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजतात. यातील काळी-पांढरी लोकर वेगळी केली जाते. यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ यावा, मजबुती यावी आणि घोंगडी विणणं सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या बियांची खळ लावली जाते. त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क मिसळला जातो. साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात असे, पण आता मात्र मागणीनुसार ६ किंवा १० फुटांची घोंगडी विणली जाते. एका घोंगडीसाठी अडीच ते तीन किलो लोकर लागते. सध्या बिकानेरी मेंढय़ांच्या लोकरीपासून घोंगडी बनवली जाते, कारण ती जास्त मऊ असते. सध्या जांभळा, नारिंगी, निळा, क्रिम अशा वेगवेगळ्या रंगातही घोंगडी आधुनिक रूप दिलं जातंय.

खड्डामाग…

खड्डामाग हा मागावरील विणकामाचा प्राचीन प्रकार. खड्डामाग, हातमाग, मशीनवरील माग, एअरजेट माग अशा काही पुरातन आणि आधुनिक पद्धती आहेत. खड्डामागात जमिनीत अडीच फूट खोल खड्डा खणला जातो. त्या खड्डय़ात रोवलेल्या लाकडी खुटय़ाला बांधलेल्या हातमागावर घोंगडी विणली जाते. खड्डामागावर विणलेली घोंगडी ४० वर्षे टिकते. विशेष म्हणजे अडीच फूट खोल खड्डय़ात बसून कलाकार घोंगडी विणतात. त्यांना खुटेकर आणि जे शेळ्यामेंढय़ांचे पालन करतात त्यांना हटकर म्हणतात.

घोंगडी किंवा जाजमाचे फायदे

पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. यामध्ये जाजम वापरणे जास्त योग्य ठरते.

निद्रानाशाची व्याधी कमी होऊन शांत झोप लागते.

रक्ताभिसरण आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.

कांजण्या गोवर,तापातही घोंगडीचा वापर करतात.

घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. .

उन्हाळ्यात थंडावा देते.

साप, विंचू, मुंगी, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.

अर्धांगवायूचा धोका टळतो. मधुमेह कमी होतो.

 

आपली प्रतिक्रिया द्या