चला, श्रावण महोत्सवात सहभाग घेऊया, 1 ऑगस्टपासून स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात

138

सामना प्रतिनिधी । मुंबई

श्रावण महिन्याची चाहूल लागली की समस्त महिलांना वेध लागतात श्रावण महोत्सवाचे. सर्वसामान्य गृहिणींची पाककला लोकांसमोर यावी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन्स या संस्थेतर्फे गेली तीन वर्षे श्रावण महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदाही श्रावण महोत्सव 2019 या स्पर्धेची प्राथमिक फेरी 1 ऑगस्टपासून सुरू होत असून स्त्रियांसोबत पुरुषांनाही स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. दैनिक ‘सामना’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे.

श्रावण महोत्सव ही स्पर्धा मुंबई आणि परिसरात 10 ठिकाणी घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा महिला आणि पुरुष दोघांसाठी खुली असणार आहे. विविध प्रकारचे पराठे किंवा थेपले (गोड किंवा तिखट) असा या वर्षीच्या प्राथमिक फेरीचा विषय आहे. प्राथमिक फेरीत स्पर्धकांनी पदार्थ घरून करून आणायचा आहे. त्याची सजावट स्पर्धेच्या ठिकाणी करायची आहे. प्रत्येक सेंटरवरून पाच महिलांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाईल. अंतिम फेरीत प्रत्येक स्पर्धकाचा स्वतंत्र सहभाग असेल.

प्राथमिक फेरीचे मुख्य परीक्षक शेफ तुषार प्रीती देशमुख आणि न्युट्रीशनिस्ट नमिता नानल आहेत. त्याचबरोबर एक परीक्षकांचे पॅनेलही प्राथमिक फेरीचे परीक्षण करेल. पॅनलमध्ये पितांबरीतर्फे शिवानी नेमावरकर, तन्वी हर्बल्सतर्फे डॉ. मानसी आणि डॉ. रुचा, माधवबाग आणि पूर्णब्रह्मतर्फे अधिकारी स्मिता सरजोशी, कला जोशी, शुभांगी देवचकेस स्वाती जोशी, श्रीया जोशी या मान्यवरांचा समावेश असेल.  अंतिम फेरीचे मुख्य परीक्षक डॉ. विठ्ठल कामत असतील.

भरघोस बक्षिसे, आंतरराष्ट्रीय टूर आणि रोजगाराची संधी

प्रत्येक केंद्रावरून निवडून आलेल्या स्पर्धकांना बक्षीस म्हणून तसेच उपस्थित स्पर्धकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून पितांबरी, तन्वी हर्बल्स, व्हॉयला फॅशन ज्वेलरी, विको, आस्वाद, फॅमिली स्टोअर, पूर्णब्रह्म या दर्जेदार ब्रॅण्डतर्फे गिफ्ट हॅम्पर्स, माधवबागतर्फे फ्री कुपन्स, एस्सेल वर्ल्डचे फ्री पासेस अशी अनेक बक्षिसे मिळणार आहेत.  श्रावण महोत्सवाच्या महाअंतिम सोहळ्यात पूर्णब्रह्मच्या जयंती कथाले थेट प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. तसेच पूर्णब्रह्मच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराची संधीदेखील उपलब्ध करून देणार आहेत. त्याचबरोबर गाणी, खेळ, कलाकारांशी गप्पा असा रंगतदार सोहळा रंगणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या