ज्या कंपन्या कोविड सेंटर उभारणार नाहीत त्या कंपन्या बंद करू, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

रत्नागिरीतील कंपन्याना कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घरडा, सुप्रिया केमिकल्स आणि फिनोलेक्सने चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र जेएसडब्ल्यू, गद्रे मरीन आणि एमआयडीसीतील काही कंपन्यांनी अद्याप काही केले नाही. ज्या कंपन्या कोविड सेंटर सुरू करणार नाही त्या कंपन्या बंद करू, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिला.

जिल्ह्यात कोविड रूग्ण संख्या वाढत असताना कंपन्यांनी कोविड सेंटर उभारावीत असे आवाहन केल्यानंतर घरडा केमिकल्स,सुप्रिया केमिकल्स आणि फिनोलेक्स कंपनीने चांगला प्रतिसाद दिला. मात्र जेएसडब्ल्यू कोविड पेशंट रत्नागिरीत पाठवत होते. आम्ही जेएसडब्ल्यू कंपनीला स्वता टेस्टिंग सुरू करण्याच्या आणि कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

सध्या जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची चाचणी सुरू असून प्लॉंट मधील ऑक्सिजन तपासणीसाठी गुड़गावला पाठविण्यात येणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल. कंपन्याकडील ऑक्सिजन घेण्यात आला असून 1 हजार जम्बो सिलिंडर आणि ड्युरा सिलिंडर ताब्यात घेण्यात आले आहेत.

चिपळूणात घरडा केमिकल्स 70 ऑक्सिजन बेड सुरू करत असून दापोलीतील कृषीभवन येथे 30 ऑक्सिजन बेड सुरू करण्यात येणार आहेत.जिल्हा शासकीय रूग्णालयात 60 ऑक्सिजन बेडचे काम सुरू करण्यात आले आहे. महिला रूग्णालय, दापोली, कळंबणी आणि कामथे येथे ऑक्सिजन प्लॉंट उभारणार आहेत. राजापूर येथे होणाऱ्या कोविड हॉस्पिटल मधील ऑक्सिजन प्लॉंट फिनोलेक्स उभारणार असल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट केले.

टोसिलिझम्ब इंजेक्शन देण्यास टास्क फोर्सची बंदी

ॲपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी येथून काही रूग्णांना टोसिलिझम्ब इंजेक्शन लिहून दिल्याची माहिती पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना दिली असता महाराष्ट्र शासनाच्या टास्क फोर्सनेच टोसिलिझम्ब इंजेक्शन देऊ नका असे सांगितले आहे, असे सांगताना ॲपेक्स हॉस्पिटलवर यापूर्वीच कारवाई करत आम्ही त्यांचा दर्जा कमी केला असल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या