ठसा – किशोर पाठक

1380

>> प्रशांत गौतम

मराठी साहित्यातील कथा, कविता, कादंबरी, नाटक, बालसाहित्य असे वाङ्मयप्रकार आपल्या शैलीदार लेखणीने वाचकप्रिय करणारे कविमित्र किशोर पाठक गेले. जागतिक कविता दिनाच्या दिवशीच एका कवीचे पैलतीराला जाणे, हे अधिकच क्लेषदायक आहे. ’कवी मेला तेव्हा काय झाले, एक जिवंत धगधगते मरण सरण झाले.’ असं मृत्यूसंदर्भात वर्णन करणारी एक कविता त्यांच्या शेवटच्या कवितासंग्रहात असल्याचे या निमित्ताने आठवले. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यशवंतबुवा पाठक हे त्यांचे ज्येष्ठ बंधू, गतवर्षी 23 मार्च रोजी त्यांचे निधन झाले आणि गेल्या महिन्यात किशोरजींचे निधन झाले. खरे तर हा दुर्दैवी योग समजला पाहिजे. मराठी साहित्याला नाशिकमधील या दोन्ही बंधूंनी आपापल्या साहित्य प्रकारामधून समृद्ध असे लेखन केले. स्वतः पाठक सर्जनशील साहित्यिक असले तरी त्यांचा साहित्य, कला संस्कृती या क्षेत्रात होणाऱया सार्वजनिक समारंभात कार्यकर्ता म्हणून सातत्याने सहभाग राहिलेला आहे. सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि संवाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य मराठी भाषा, साहित्य संवर्धनासाठी नक्कीच पोषक ठरणार आहे. या क्षेत्रातील साहित्य रसिकांशी, वाचकांशी, संस्थात्मक कार्य करणाऱया संस्थांशी अगदी शेवटपर्यंत संपर्क राहिलेला आहे. आपल्या लेखनाच्या माध्यमातून आणि मृदु स्वभावातून माणसा-माणसांना जोडण्याचे महत्त्वाचे काम केलेले आहे. जे आजही या क्षेत्रात काम करणाऱया नव्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. दहा कवितासंग्रह, चार नाटय़कृती, दोन ललित लेखसंग्रह, सात एकांकिका, तीन बालनाटय़, दोन कथासंग्रह, पंधराच्या वर बालकविता संग्रह, दोन समीक्षा संग्रह असे महत्त्वाचे साहित्य प्रकार त्यांच्या नावावर जमा आहेत. ज्याला महाराष्ट्रभरातील शासकीय, निमशासकीय सेवाभावी संस्थांचे अनेक पुरस्कार लाभले. किशोर पाठक यांनी कवितांचे लेखन तर अनेक मान्यवर दिवाळी अंकातून, वाङ्मयीन नियतकालिकांमधून सातत्याने केले. एवढेच नव्हे तर अनेक दैनिकांत सदर लेखनातून त्यांनी वाचकांशी नाळ कायम ठेवली. महाराष्ट्रभरातून त्यांना विविध कार्यक्रमांसाठी निमंत्रणे येत असत. महाराष्ट्रातल्या सर्वदूर भागात त्यांची लोकप्रियता होती. एका फोनवर ते कार्यक्रमास स्वीकृती देत असत. लेखनाच्या माध्यमातून वाचकांशी, संस्थात्मक कामांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी, विविध वाङ्मयीन कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांशी त्यांचे नाते कायम जोडलेले होते. आज असे चित्र दिसते की, लेखक पुस्तकांवर पुस्तके लिहित असतो, त्याला पुरस्कारही मिळत असतात. अशा लेखकांचे सामाजिक दायित्व काय, तर उत्तर फार समाधानकारक मिळत नसते. कारण असा लेखक समाजापासून दूर असतो. त्याला समाजाशी, साहित्य संस्थांशी काही देणे-घेणे नसते. या सर्व प्रकारात किशोर पाठक यांच्यासारखा दिलखुलास आणि दिलदार माणूस अपवाद होता. नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकदा होऊन गेले. त्यानंतर 2005 सालीही शानदार आयोजन झाले होते. संपूर्ण संमेलनाच्या आयोजनात पडद्यामागचा कलावंत म्हणून किशोर पाठक यांनी मोठीच भूमिका बजावली होती. संमेलनाच्या नांदीपासून ते सूप वाजण्यापर्यंत पाठक हे पुलंच्या भाषेत सांगायचे तर ’नारायण’ म्हणून वावरत होते. साहित्य महामंडळाकडे यंदा धाराशीवप्रमाणेच नाशिक येथील ’सावाना’ म्हणजे किशोर पाठक यांच्या सार्वजनिक वाचनालय, नाशिकचे आग्रहाचे निमंत्रण होते. पण हे संमेलन मराठवाडय़ात आणि तेही धाराशीवसारख्या भागात पहिल्यांदा होत असल्याचे पाहून महामंडळास दिलेले निमंत्रण निमंत्रक संस्थेने मोठय़ा मनाने मागे घेतले. त्या कामी किशोर पाठक यांची पडद्यामागची भूमिका होती. असा सर्वांभूती प्रेम, आत्मीयता असणारा कविमित्र आज आपल्यात नाही, याची हळहळ साहित्य क्षेत्रास वाटणे स्वाभाविकच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या