ठसा – प्राचार्या अनुराधा गुरव

1246

>> प्रशांत गौतम

साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या लेखन कार्याची नाममुद्रा उमटवणाऱ्या लेखिका विचारवंत प्राचार्या अनुराधा गुरव यांचे कोल्हापूर येथे नुकतेच निधन झाले. कवयित्री, लेखिका, समीक्षक, समाजसेविका हेही त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर तर होतेच; पण नवोदित लेखक, कवीसाठी, त्यांच्या लेखनासाठी सदैव प्रोत्साहनही असायचे. साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रात मौलिक योगदान देणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. गुरव यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात बाळे या गावी १९४१ साली झाला. शिक्षण आणि साहित्य क्षेत्राची त्यांना शालेय वयापासून आवड असल्याने पुढील काळातही तेच त्यांचे कार्यक्षेत्र झाले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले, त्यानंतर गुरव यांनी डॉ. डी. वाय. पाटील डी.एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणूनही सेवा बजावली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक म्हणून काही काळ त्यांनी सेवा बजावली. समुपदेशन मग ते वैवाहिक असो की शिक्षण विषयक असो. तिथे संबंधितास योग्य सल्ला देऊन मार्गदर्शन करायचे असते. अनुराधा गुरव यांनी त्या कार्यातही महत्त्वाचे योगदान देऊन मार्गदर्शकाची भूमिका बजावली.

शिक्षण, प्रौढशिक्षण, समाजकार्य असे त्यांचे कार्यक्षेत्र राहिल्याने त्या क्षेत्रात कार्य करताना आलेलेच अनुभव त्यांच्या साहित्य क्षेत्रात आल्याने साहित्य निर्मितीस शैक्षणिक, सामाजिक, अधिष्ठान प्राप्त होत गेले. त्यातून तीस कथा संग्रह, तेरा कादंबऱ्या, एकांकिका, तीसेक बाल साहित्याची पुस्तके, नव साक्षरांसाठी ४३ पुस्तके तर शैक्षणिक साहित्य विषयक बारा पुस्तके अशा विपुल पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. प्रौढ शिक्षण नवसाक्षरांसाठी अधिकारी म्हणून कार्य करताना त्याविषयी त्यांना लिहिण्याची अपरिहार्यता वाटू लागले. शिक्षण क्षेत्रात कार्य करीत असताना सकस आणि दर्जेदार बालवाङ्मय निर्मितीची त्यांना ओढ निर्माण झाली आणि त्यामुळेच त्यांना प्रौढ आणि बालसाहित्य या क्षेत्रात प्रायोगिकतेने लेखन करता आले. सातारा येथील लेखिका सावित्री जगदाळे त्यांच्या सहवासात आलेल्या एका नवोदित लेखिका, वाचन-लेखन निमित्ताने परस्परांची ओळख झाली, पुढे ओळखीचे रूपांतर अतूट स्नेहामध्ये निर्माण झाले, एवढे की बघता बघता सावित्री अनुराधाबार्इंच्या मानसकन्याही झाल्या. अनुराधाबार्इंच्या प्रोत्साहनामुळे सावित्रीनी झपाटून लिखाण केले. साहित्य, कथा, बालसाहित्य, कविता क्षेत्रात वैविध्यपूर्ण लेखन केले, ते गुरव यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे सावित्रींचे पती हणमंतराव जगदाळे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, ‘तळातून वर येताना’ हे त्यांचे आत्मकथन पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले. पोलीस खात्यातील प्रामाणिक व अस्सल अनुभव असणाऱ्या या आत्मकथन संग्रहास अनुराधा गुरव यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना देऊन त्यांच्या लेखनासाठी प्रेरणा दिली. त्यात त्या म्हणतात, ‘पोलीस खात्यामध्ये बाळमुठीतून मुठीत काही घेण्याचा जिद्दीचा प्रवास कसा सुरू झाला याची अनोखी कलम बहादुरी हणमंतराव जगदाळे यांच्या ‘तळातून वर येताना’ या आत्मकथनात मनाचा ठाव घेते. आत्मकथनाचे शीर्षकच आशयघन असून, त्यातून सर्वकाही व्यक्त होते.’ वैशिष्ट्यपूर्ण साहित्य लेखन करणाऱ्या गुरव यांनी विविध प्रकारात भरभरून लेखन तर केलेच तसेच विधिसेवा प्राधीकरण, बाल न्याय मंडळ, कौटुंबिक प्रश्न निर्मूलन, लोकन्यायालय, बाल न्यायालय अशा विविध समित्यांमध्ये, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनात सल्लागार म्हणून पंचवीसेक वर्षे काम केले. नागरिकांचे प्रश्न समजावून घेतले. आपुलकी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपले समाजकार्य चालूच ठेवले. या विविध क्षेत्रांतील मौलिक कार्याचा सन्मान दक्षिण महाराष्ट्र सभा, कोल्हापूर यांचा पुरस्कार श्री. दा. पानवलकर साहित्य पुरस्कार वुमेन्स फाऊंडेशनचा सन्मान प्राप्त झाला, तसेच अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. अनुराधा गुरव यांच्या निधनामुळे शिक्षण आणि साहित्य क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या