ठसा – सई परांजपे

1168

>> प्रशांत गौतम

प्रख्यात रंगकर्मी, चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा अनुवादासाठी दिला जाणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकताच घोषित झाला. त्यांनी चतुरस्र अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्या आत्मचरित्राचा ‘आणि मग एक दिवस’ या नावाने मराठीत अनुवाद केला आहे. हिंदी चित्रपट क्षेत्रातील कसदार अभिनेते नसिरुद्दीन शहा  यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीचा आत्मकथनात्मक प्रवास ‘ऍड देन वन डे’ या पुस्तकात विस्ताराने मांडला आहे. त्याचा मराठी अनुवाद सई परांजपे यांनीच करावा, अशी खुद्द शहा यांचीच इच्छा होती. त्याच पुस्तकाची निवड साहित्य अकादमीच्या अनुवादासाठी झाली आहे. सांगली येथे पुढील मार्च महिन्यात सांगली येथे भरणाऱया 100 व्या अ.भा. मराठी नाटय़ संमेलनाच्या उद्घाटनाचाही सन्मान त्यांना लाभला आहे. प्रख्यात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हे नाटय़ संमेलन अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मराठी लेखिका, नाटककार, बालनाटय़कार, पटकथाकार चित्रपट, दिग्दर्शक, निर्मात्या अशा क्षेत्रात सई परांजपे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा झालेला बहुआयामी प्रवास आज वयाच्या 81 व्या वर्षीही दमदार सुरू आहे. त्यांच्या लेखणीला सखोलता प्राप्त होत गेली. अल्पावधीतच त्या यशस्वी व लोकप्रिय लेखिका, बालनाटय़ लेखिका, नाटककार, पटकथाकार, निर्मात्याही झाल्या. साहित्य लेखनासोबतच चित्रपट, नाटक या क्षेत्रात केलेल्या मौलिक कार्यामुळे चर्चेत आल्या. एक तमाशा सुंदरसा, गीध, जादूचा शंख, झाली काय गंमत, धिक ताम, पत्तेनगरी, माझा खेळ मांडू दे, सख्खे शेजारी ही बालनाटय़े, कथा, चष्मे बहाद्दूर, चुडिया, दिशा, साज, स्पर्श यासारखे दिग्दर्शित केलेले चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. आलबेल (नाटक) जादूचा शंख (बालसाहित्य) जास्वंदी (बालनाटय़), भटक्याचे भवितव्य (बाल साहित्य मुलांचा मेवा (बाल साहित्य), शेपटीचा शाप (बाल साहित्य), सख्खे शेजारी (नाटक), सय-माझा, कला प्रवास, सळो की पळो (बाल साहित्य) अशी साहित्य संपदा सई परांजपे यांच्या नावावर आहे. सई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘स्पर्श’साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार चुडियासाठी राष्ट्रीय पुरस्कार 2006 साली पद्मभूषण सन्मान तसेच कला महर्षी बाबुराव पेंटर, राजा परांजपे, आरती प्रभू, मसापचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा साहित्य पुरस्कार त्यांना लाभला. चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या दोन वेळा अध्यक्षपद भूषवण्याचा सन्मान त्यांना लाभला. रॅग्लर परांजपे हे सई परांजपे यांचे आजोबा, पद्मभूषण शकुंतला परांजपे या मातोश्री होत. आपल्या आईच्या कार्यप्रवासावर आधारित त्यांनी ‘पर्स्वेशन’ या नावाचा लघुपट बनवला. सई परांजपे यांच्या बहुआयामी वाटचालीत साहित्य अकादमीच्या अनुवाद पुरस्कार सन्मानाने भर पडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या