ठाणे पालिकेची ऍक्सिस बँकेतील खाती बंद

राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार ऑक्सिस बँकेऐवजी राष्ट्रीयीकृत बँकेतून काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची बातमी आली असतानाच आता ठाणे महानगरपालिकेनेदेखील एक पाऊल पुढे टाकले आहे. पालिकेच्या विविध खात्यांतील ऑक्सिस बँकेतील खाती बंद करून ती सरकारी बँकेत आता उघडली जाणार आहेत. यापुढे फक्त सरकारी बँकांशीच व्यवहार करावेत, असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले असल्याचे समजते.

ठाणे महानगरपालिकेत परिवहन, शिक्षण, महिला व बालकल्याण, आरोग्य, अतिक्रमण, स्थावर मालमत्ता, विद्युत, शहर विकास असे विविध विभाग आहेत. त्यातील बहुतांश सर्व विभागांचे व्यवहार हे ऑक्सिस बँकेतून चालतात. मात्र पैशांचे व्यवहार पारदर्शीपणे व्हावेत यासाठी सर्व विभागांनी ही खाती बंद करून राष्ट्रीयीकृत बँकेद्वारे पैशांची देवाणघेवाण करावी, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

प्रशासनानेदेखील महापौरांच्या सूचनेला अनुकूलता दर्शवली असून लवकरच याबाबत अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिकेतील आर्थिक व्यवहार तसेच विविध प्रकारची खाती याविषयी कोणाच्याही मनात शंका निर्माण होऊ नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी बँकेतून आर्थिक व्यवहार करण्याची प्रक्रिया लवकरच  सुरू होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून प्रेरणा 

राज्य सरकारचा कारभार पारदर्शी असताना पोलिसांचे पगार फक्त ऑक्सिस बँकेतून कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापुढे पोलिसांचे पगार सरकारी बँकेतूनच होतील, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यातूनच ठाणे महापालिकेलाही प्रेरणा मिळाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या