धुमकेतू येतोय…!

337

नितीन फणसे

नासाच्या संशोधकांनी शोधून काढलेला एक दुर्मिळ धूमकेतू या आठवडय़ात प्रथमच दुर्बिणीच्या सहाय्याने पाहता येणार आहे. ‘धूमकेतू सी – २०१६ यू-१’ असं नाव असलेला हा धूमकेतू दक्षिणेकडे जात असून १४ जानेवारीला तो सूर्याच्या अगदी जवळ असलेल्या बुधाच्या कक्षेत जाणार आहे. विशेष म्हणजे तेथून तो हजारो वर्षांसाठी आपल्या सूर्यमालेच्या बाहेर निघून जाणार आहे. त्यामुळे आताच तो पाहून घेण्याची एकमेव संधी उपलब्ध झाली आहे. अमेरिकेतील जेट प्रपल्शन लॅबोरेटरीजने या धूमकेतूविषयी माहिती दिली.

धूमकेतू दुर्बिणीतून का होईना, पण जवळून न्याहाळता येण्याची ही पहिली आणि अखेरची संधी आहे असंच म्हणावं लागेल. धूमकेतू हा दगड, धूळ, बर्फ आणि गॅस या सगळ्यांचं मिश्रण असलेला आगळावेगळा खंड असतो. इतर ग्रहांप्रमाणेच तो सूर्याभोवती फिरतो. छोटे धूमकेतू सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ६ ते २०० वर्षे घेतात, पण काही धूमकेतूंचा मार्ग खूप मोठा असल्याने ते हजारो वर्षांतून एकदाच दिसतात. आतापर्यंत धूमकेतूंचे जेवढे संशोधन झाले आहे त्यानुसार त्यात दगड, धूळ, बर्फ, सिलिकेट आणि कार्बनिक पदार्थांबरोबरच कार्बन-डाय-ऑक्साईड, मिथेन, अमोनिया असे काही विशिष्ट वायूही आढळले आहेत.

धूमकेतूचे प्रामुख्याने नाभी, कोमा आणि शेपूट असे तीन भाग पडतात. त्याच्या नाभी म्हणजे बेंबीच्या भागात दगडधोंडे आणि बर्फाचे मोठमोठे तुकडे असतात. या नाभीच्या चारी बाजूने वेगवेगळे वायू आणि धुळीचे आवरण असते. नाभी आणि कोमा या धूमकेतूच्या दोन भागांतून निघालेल्या वायू आणि धुळीमुळे शेपटाचा आकार तयार होतो. धूमकेतू ज्यावेळी सूर्याच्या जवळ येतो तेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे त्याच्या नाभीवरील गॅस आणि बर्फाचे बाष्पीभवन होते. त्यामुळे कोमाचा आकार वाढून तो कोटय़वधी मैलांचा होतो. कोमामधून हा गॅस आणि धूळ सूर्याच्या उलटय़ा दिशेकडे वाहतात. त्यामुळे धूमकेतूला शेपटासारखा आकार असल्याचे वाटते. शेपटाचा हा आकार हळूहळू वाढतच जातो.

धूमकेतूची नाभी (बेंबी) १०० मीटर ते ४०  किलोमीटरपर्यंत मोठी असू शकते. टेम्पल-१ नावाच्या धूमकेतूच्या बेंबीचा व्यासच जवळपास ६ किलोमीटर आहे. कमी द्रव्यमान नसल्याने नाभीला विशिष्ट आकार नसतो. तरीही तो एखाद्या बर्फाच्या गोळ्यासारखा दिसतो. धूळ आणि गॅस भरपूर असल्याने धूमकेतूच्या चारी बाजूचे वातावरण कमजोर असते. म्हणून त्याला ‘कोमा’ असं म्हटलं जातं. संशोधकांच्या मते आपल्या सूर्यमालेच्या बाहेर असंख्य धूमकेतू असू शकतात, पण पृथ्वीवरून त्यांचा अंदाज घेता येणं अशक्य आहे. मात्र त्यातले काही धूमकेतू आपल्या सूर्यमालेत प्रवेश करतात तेव्हा त्यांचा अभ्यास करता येतो.

आपली प्रतिक्रिया द्या