नव्या मोसमाची धडाकेबाज सुरुवात करू, अजिंक्य रहाणेचा निर्धार

167

सामना ऑनलाईन, पुणे

गत मोसमातही आम्ही चांगले खेळलो, पण अनेक लढतींचे विजयात रूपांतर करण्यात कमी पडलो. मात्र भूतकाळातील कामगिरी विसरून नव्या मोसमाची धडाकेबाज सुरुवात करण्यासाठी आम्ही सज्ज झालोय, असा इशारा आयपीएलमधील ‘रायझिंग पुणे सुपरजायंट’ संघाचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे याने सोमवारी पुण्यात दिलाय.

सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स, बंगळुरू यांच्यातील लढतीने बुधवारी (दि. ५) हैदराबादमध्ये ‘आयपीएल’च्या दहाव्या सत्राचे ‘रन’शिंग फुंकले जाणार आहे. त्यानंतर पुण्याची सलामी गुरुवारी (दि. ६) घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. स्पर्धेच्या विजयी प्रारंभासाठी पुणे संघाचा सराव जोरदार सुरू आहे.

पत्रकारांशी दिलखुलासपणे संवाद साधताना अजिंक्य रहाणे म्हणाला, ‘खरे तर मागील वर्षीही आमच्या पुणे संघने चांगला खेळ केला. पण आम्ही थोडक्यात पराभूत झालो. एक-दोन षटकांतील खेळाने सामन्यांचे निकाल फिरले. पण खेळ म्हटले की जय-पराजय आलाच. मात्र आता या सर्व गोष्टी इतिहासजमा झाल्या आहेत. मोसमाचा प्रारंभ चांगला होणे महत्त्वाचे आहे. त्यावर आमचा भर असेल.

कर्णधार विराट कोहली जायबंदी झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत अजिंक्यने हिंदुस्थानचे नेतृत्व केले. याबद्दल बोलताना तो म्हणाला, खांद्याच्या दुखापतीमुळे निर्णायक सामन्यात विराट खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ‘टीम इंडिया’ला मोठा धक्का बसला होता. मात्र आम्ही यातून बाहेर पडून खेळावर लक्ष केंद्रित केले. नेतृत्वाचा विचार करता विराट आणि माझी शैली वेगळी आहे. अचानक नेतृत्वाची जबाबदारी आल्यावर संघसहकाऱ्यांचा विश्वास कायम ठेवणे, त्याची लय बिघडू न देणे या गोष्टींवर मी अधिक भर दिला. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी आपापली जबाबदारी चोखपणे बजावली. त्यामुळे हिंदुस्थानला सलग सातवा मालिका विजय साजरा करता आला, असेही अजिंक्यने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या