नादब्रह्मातील संचित

829

<< संगीत सान्निध्य >> सारंगी आंबेकर

मुबलक संगीत कानावर पडत असताना त्यातल्या वलयांकित व गुणी सिद्धहस्त क्वचित यशाचे माप पदरी न पडलेल्या प्रतिभावान कलाकारांविषयी लिहून देवधरांनी सांगितीक दस्ताऐवजात ‘न भूतो न भविष्यती’ अशी भर घातलेली आहे. यापैकी एक म्हणजे सारंगीनवाज उस्ताद बुंदूखाँ. ‘‘गंडा बांध तर विद्या देतो’’ याच्या पलिकडेही काही अवलिये होते जे लायक विद्यार्थी दिसताच स्वतःजवळील भांडार विनासंदेह रिते करीत. देवधर व बंदूखाँ यांचा योग अशा धर्तीचा असावा. जी रसनिष्पती एका स्वराने होते, तेथे दोन स्वर खर्च करायचे नाहीत.’’ एकसुद्धा मुरकी न घेता अस्ताई म्हणणे’’ ‘चुना चुनी, डावपेच फुलबाजा, चित्कारसारख्या तानाची माहिती’’ ‘‘गायकाची बैठक व अविर्भाव’’, ‘आडाचौताल मध्ये तालाच्या झोकाने कसे फिरावे’’ अशा अनेक गोष्टी सप्रयोग शिकवतानाचे खाँसाहेब देवधरांच्या लेखणीने पाहणे निःसंशय आनंददायी होते.

आफताब-११ – मौसिकी उस्ताद फैय्याज खाँसाहेब हे ज्ञात गवय्यांपैकी ‘हालअपेष्टा, खडतर गुरूसेवा, शेवटी यश’’ या त्रिकूटाला सर्वस्वी अपवाद ठरलेले वडिलांकडून ‘‘रंगीले’’ या प्रसिद्ध रचनाकाराचे पणतू व आईकडून आग्रा घराण्याचे संस्थापक ‘गग्गे खुदाबक्ष’ यांचे पणतू लागत. घरंदाज तालीम, तत्कालीन संगीत महर्षींचे गाणे ऐकण्याचे भाग्य याला फैय्याजखाँनी मेहनत, सौंदयसृष्टी यांची जोड देऊन धृपदधमारपासून ख्याल, ठुमरी, गझल या सर्वांच्या आधारे ‘‘चतुरंग गवई’’ अशी मजल मारली. ‘प्रेमपिया’ नावाने रचलेल्या असंख्य बंदिशी व आग्रा घराण्याच्या गायकीला चढवलेला कळस येणाऱ्या पिढ्यांसाठी ठेवणाऱ्या फैय्याज खाँसाहेबांचे संचित फार मोठे आहे.

प्रो. स्क्रिझींसोबत देवधरांनी ज्या ऋषीतुल्य गुरूला हे पुस्तक अर्पण केलं आहे. पं. खाँसाहेब सिंदेखाँ! या लिखाणातली खेच अशी आहे की वाचून सुन्न होण्याखेरिज दुसरा पर्याय नसावा. देवधरांनी बाबा सिंदेखाँकडून बंदिशी शिकताना निवडलेला नोटेशनचा पर्याय, त्यावरील स्वतः देवधरांचं चिंतन खाँसाहेबांच्या तालमीविषयी पूर्वजांविषयींचे कथन, सिंदेखाँच्या गायकीचे ‘लयकारीचे जोर, कण भरण्याची तऱ्हा, समेवर बोल पकडून येण्याची रीत, चीज धरण्याची शैली’ हे विशेष व त्यांच्या अद्वितीय मैफलीची साक्ष देणारे लोक या सर्वाला मला विशेषण चिकटवण्यापेक्षा इथे अवकाश घेणे अधिक समर्पक वाटते.

‘सूरश्री बाई केसरबाई’ हा एकमेव लेख मुलाखतीच्या स्वरूपात आलेला आहे. केसरबाईंचे शिक्षण, अल्लादियाँखासाहेब व त्यांचे ऋणानुबंध, काही रागांवरील केसरबाईंचे विवेचन हे सर्व वाचल्यावर भोगूबाईंनी म्हटल्याप्रमाणे ‘खाँसाहेबांचे स्मारक गुरुभगिनी केसरबाई आहेत तोवर त्याचं थोडेबहुत स्मारक दिसत आहे.’ यातील सार्थकता लक्षात येते.

अलाहाबाद परिसरात ख्यातकीर्त असलेले पं. भोलानाथ भट्ट यांच्याविषयी लिहून देवधरांनी रसिकांना उपकृत केले आहे. केवळ यशात परिवर्तित झालेल्या गुणवत्तेचे, ज्ञानाचे आलेख न मांडता संगीतसाधनेत हयात वेचलेल्या अभागी कलाकारांचा केलेला उचित सन्मान हे ‘थोर संगीतकार’चे फार मोठे यश आहे. खाँसाहेब बडे गुलामअली खाँ यांच्या सौंदर्यपूर्ण गाण्याचे, त्यांच्या मनस्वी, कलंदर वृत्तीचे आणि देवधरांशी जुळलेल्या स्नेहाचे वर्णन परिपूर्ण आहे व हिंदुस्थानी संगीतात कणयुक्त स्वरांचं महत्त्व, आवाजाचा  लगाव, साधे ते बिकट, गुंतागुंतीचे पलटे, मशिदीबाहेरचा रियाझ हे सर्व सांगताना खाँसाहेब कुठलाही अभिनिवेश बाळगत नाहीत. आज इतक्या वर्षांनंतरही खुद्द कलाकारांमध्ये ‘बडे गुलामअली खाँसाहेबांच्या’ गाण्याचं असलेलं गारूड समजावून घ्यायला देवधरांचा लेख मोलाची मदत करील.

आज इलेक्ट्रॉनिक तानपुरा व मोबाईलवरील तानपुरा (application) अॅपच्या जमान्यात दोन तानपुऱ्यांत बसून गायची मजा ज्यांना कळली अशा समस्त कलाकार व रसिकांतर्फे ‘महाराष्ट्रातील तंतुवाद्याचे आद्य प्रवर्तक मरहूम फरीदसाहेब सतार मेकर’ हा लेख लिहिल्याबद्दल देवधरांचे अभिनंदन करते. साधारण १९४५-५० चा काळ, तंबोऱ्यासाठी लागणाऱ्या लाख, पॉलिशपेपर, भोपळा, रंग यांची जुळवाजुळव, जव्हारी खोदण्याची कला व त्यात लगन ठेवून वाद्यनिर्मितीत मिळवलेले नैपुण्य हे वाचून आगळय़ा तऱ्हेने नादब्रह्माची उपासना करणाऱ्या फरीदसाहेबांना लाख सलाम.

सरधोपट आयुष्याला स्वेच्छेने नाकारत ‘अश्वविद्या-विशारद’ हद्दूखाँसाहेबांकडून कष्टपूर्वक खानदानी तालीम हासील करणारे, हिंदुस्थानातील पहिल्यावहिल्या सर्कशीचे मालक आणि भूगंधर्व रहिमतखाँसाहेबांना बनारस येथून आणून महाराष्ट्रास त्यांच्या गाण्याचा लाभ करून देणारे पं. विष्णुपंत छत्रे यांच्या विषयीचा लेख वाचताना आश्चर्योद्गार काढायचे भानही राहत नाही. स्वतः धृपदे, धमार, ख्याल यात अस्सल तालीमदार असूनही अधिक मैफली मारण्यापेक्षा भूगंधर्वांची देखभाल केली त्या पं. विष्णुपंत छत्र्यांना अभिवादन!

गायन, सारंगी व तबला या तिन्हीत महारत हासील केलेले लयभास्कर, खाप्रूमामा ऊर्फ लक्ष्मणराव पर्वतकर हे ‘थोर संगीतकार’मधील देवधरांनी उलगडलेले अखेरचे अवलिया! प्रा. बी. आर. देवधरांची बहुश्रुतता, गुणांची पारख आणि उदार दृष्टिकोन याचा परिपाक म्हणजे थोर संगीतकार होय. संगीताच्या या महासागरामध्ये आपले भाग ठरल्यावर निष्ठेने मार्गक्रमण करून मजा देणे-घेणे याचे सर्वोत्कृष्ट दाखले देणारं हे पुस्तक जरूर वाचावं.

याचाच पुढचा भाग म्हणून देवधरांचं ‘थोर संगीतकारांची परंपरा’ हेही अभ्यासक व रसिकांना पर्वणीच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या