नाशिक – पॉलिसीच्या बहाण्याने एचएएल कर्मचाऱ्याची फसवणूक

पॉलिसी देण्याच्या बहाण्याने पाच भामट्यांनी एका एचएएल कर्मचाऱ्याची सहा लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. सहा लाख रुपयांवर तुम्हाला एक लाख रुपये अधिक मिळतील हे समोरच्या व्यक्तीने त्यांना पटवून सांगितले आणि त्यावर त्यांचा विश्वास बसला. त्यांनी ती रक्कम त्यांच्या स्वाधीन केली. मात्र दिलेली रक्कम परत मिळत नसल्याचे पाहून अखेर या कर्मचाऱयाने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोडचे संदीप गजानन तितारे हे एचएएलमधील कर्मचारी आहेत. त्यांना 16 मे रोजी अशोक महाजन या व्यक्तीने फोन केला होता. गुंतवणुकीसाठी एचडीएफसी पॉलिसी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून लाखो रुपये लुबाडण्यात आले. अशोक महाजनसह प्रिया शर्मा, प्रतिभा शर्मा, सुभाष, रोहन या नावांच्या व्यक्तींनीही त्यांच्याकडून वेळोवेळी सहा लाख दहा हजार रुपये घेतले. त्या बदल्यात 1 ऑक्टोबरपर्यंत सात लाख तीस हजार रुपये देण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आले. लाखो रुपये त्यांनी त्या भामटय़ांना दिले. मात्र आजपर्यंत मूळ रक्कमही परत मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तितारे यांनी शुक्रवारी उपनगर पोलीस ठाणे गाठून या पाचही जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या