पक्षाघात होऊनही केरळच्या मांझीने तीन वर्षात बनवला २०० मीटरचा रस्ता

सामना ऑनलाईन। थिरुनवंतपुरम 

बिहारच्या दशरथ मांझीने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीवर २२ वर्ष डोंगर फोडून रस्ता बनवला आणि जगासमोर आगळे उदाहरण ठेवले. याच मांझीच्या पावलावर पाऊल ठेवत केरळमध्ये पक्षाघात झालेल्या एका व्यक्तीने व्हील चेअर चालवता यावी यासाठी तब्बल तीन वर्ष खोदकाम करुन २०० मीटर कच्चा रस्ता तयार केल्याचे समोर आले आहे. शशि जी. असे त्याचे नाव आहे.

शशि झाडावरुन नारळ काढण्याचे काम करत होता. त्यातून मिळालेल्या उत्पनावरच त्याचे घर चालत होते. अठरा वर्षापूर्वी झाडावरुन नारळ काढताना त्याचा पाय घसरला आणि तो उंचावरुन खाली पडला. यात त्याच्या मणक्याला मार लागल्याने त्याच्या शरीराची एक बाजू लुळी पडली. यामुळे शशिच्या कुटुंबावर आभाळच कोसळले.

पण तरीही न डगमगता शशिने स्वतःला सावरले आणि जमेल ती लहानमोठी काम करुन तो दिवस ढकलत होता.
त्यानंतर गावात काम मिळवण्यासाठी चालत जाणे शक्य नसल्याने त्याने पंचायतीकडे व्हील चेअरची मागणी केली. पण गावातील रस्ते खडकाळ व ओबडधोबड असल्याने व्हील चेअर देण्यास पंचायतीने नकार दिला. यामुळे बैचेन झालेल्या शशिने स्वताच रस्ता बनवण्याचा निश्चय केला. सुरुवातीला त्याला सगळ्यांनी वेड्यात काढले.पण शशिने कोणाचीच तमा बाळगली नाही.

गेल्या तीन वर्षापासून दिवसरात्र तो कुदळ व फावडा घेऊन रस्ता फोडत आहे.या तीन वर्षात त्याने २०० मीटर कच्चा रस्ता तयार केला आहे. आज शेकडो लोक या रस्त्याचा वापर करत आहेत, पण अद्यापही पंचायतीने शशिला व्हील चेअर न दिल्याने ५९ वर्षांचा शशि जी. व्हील चेअरच्या प्रतिक्षेत आहे.