परतवारीची वैराग्यकथा

नमिता वारणकर,namita.warankar@gmail.com

अभंग, हरिपाठ, गौळणी, भारुडे म्हणत रथ, वाजंत्री, घोडे अशा सर्व लवाजम्यासह पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारकरी माघारी फिरतो…‘जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’, असे म्हणत त्याचा परतीच्या  प्रवासाला सुरुवात होते…  गावोगावी होणारे स्वागत, आदरातिथ्य, सेवाभाव, उत्साह परतीच्या प्रवासात तुलनेनं कमी असला तरी नवी ऊर्जा देणारा आणि स्फूर्तिदायी असतो… परतवारीत फक्त दहा दिवसांतच केल्या जाणाऱया प्रवासातही अद्वितीय अनुभव येतात.

उत्सुकतेपोटी लेखक सुधीर महाबळ सलग 13 वर्षे परतवारीचा प्रवास करत आहेत. नवं काहीतरी गवसणारा, स्वतःत अफाट उत्साह भरून राहणाऱया या प्रवासात त्यांना आलेले अनेक चांगले-वाईट अनुभव… साक्षात माऊलीशी संवाद साधणारी अनेक मने… थक्क करणारा निसर्ग त्यांनी या प्रवासात उलगडला… यातून ‘परतवारी’ या पुस्तकाचे लिखाण त्यांच्या हातून झाले. आपल्या या परतवारीच्या शोधाविषयी ते सांगतात, 2000 साली जायची वारी केली होती. तेव्हा सगळे जण रथ, पालखी, वारीचं सामान  ट्रकमध्ये भरून परतत असतील असं मला वाटायचं. तेव्हा जिज्ञासेपोटी सहज चौकशी केल्यावर कळलं की, परत जातानाही चालतच जातात. तेव्हा मला आश्चर्य वाटलं. या प्रवासाचंही शिस्त आणि वेळापत्रक ठरलेलं असतं. तेही वर्षानुवर्ष परंपरेने जसच्या तसं सुरू आहे. विशेष म्हणजे याबद्दल कोणालाही फारशी विशेष माहिती नाही.

या परतवारीपासून वारकरी अनभिज्ञ आहे असे नाही, पण वारीसाठी म्हणून घरातून बाहेर पडल्यास लोकांना महिना झालेला असतो. शेतीची कामं असतात आणि एकादशीचं पांडुरंगाचं दर्शन झालेलं असतं. त्यामुळे साहजिकच ते लगबगीने आपल्या पद्धतीने घरी निघून जातात. अंतर आणि रस्ता तोच असतो. तरीही 20 दिवसांचं अंतर 10 दिवसात कापलं जातं. त्यामुळे दिवसाची चाल वाढते. जाताना लाखो लोक असतात. त्यांच्यासाठी मदतीचे हजारो हात अखंड सेवारत असतात. त्यामानाने परतीच्या प्रवासात तसं काहीही नसतं. जशी जाताना वारीत राहण्यासाठी तंबूची सोय केलेली असते तशी राहण्याची, जेवणाचीही सोय नसते. मात्र असे असले तरी 2005 सालापासून आजतागायत सखाराम भोईर हे बांधकाम व्यावसायिक स्वतः पुढाकार घेऊन  सर्व परतीच्या वारकऱयांना दोन वेळचं सुग्रास अन्न विनामूल्य देतात. माऊलीला दशमीला पंढरपूरहून आळंदीला नेलं की, एकदशी आळंदीत करून मग ते आपल्या गावी पोहोचतात. तसेच परतताना आळंदी यायच्या आधी एक किलोमीटर आधी माऊलीची दृष्ट काढली जाते. कारण महिनाभर माऊली बाहेर असते. त्यानंतर सूर्यास्तावेळी इंद्रायणी पार करून माऊली आळंदीत विसावते. हा अतिशय विलोभनीय सोहळा असतो.रात्रीच्या अंधारात चालताना निसर्ग वेगळा दिसतो. झुंजुमुजु पहा, तांबड फुटणं, कोंबडा आरवणं, गाईच्या गळ्यातील घंटां प्रसन्न करणारा आवाज, चंद्राआड लपलेलं आभाळ, चंद्राचे वेगवेगळे विभ्रम असा निसर्गाचा समृद्ध अनुभव येतो.

ऐश्वर्यवारी ते वैराग्यवारी

जायची वारी ऐश्वर्यवारी असली तरी परतताना सुधीर महाबळ यांना  ती वैराग्यवारी वाटते, कारण सर्व माध्यमांकडून जायच्या वारीला प्रसिद्धी मिळते. परतताना मात्र काहीच लिहून येत नाही. परतवारीच्या प्रवासात मध्यरात्री अडीच वाजता निघावं लागतं आणि सूर्यास्त होईपर्यंत ठरलेल्या ठिकाणी पोहोचायचं असतं. साधारणपणे 35 ते 40 किलोमीटरपर्यंत रोज चाल होते. जायच्या वारीत उभं-गोल रिंगण, चौघडा, धावा असे कार्यक्रम असतात. परंतु परतीच्या वारीत असं काहीच नसतं. ही सर्व वैराग्याची लक्षण वाटतात.