फुलवा…

योगेश नगरदेवळेकर, [email protected]

श्रावण म्हणजे फुलं… अनेकरंगी, बहुरंगी… मनास मोहवणाऱया फुलांविषयी…

तडाखेबाज आषाढसरींनी झोडपून काढल्यावर श्रावणात हा भर ओसरला आहे. ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. आतापर्यंत हिरवीगार झालेली धरती आता वेगवेगळय़ा रंगाचा साज ल्यालेली फुले माळणार आहे. या फुलांच्या तऱहा तरी किती असतात. एकरंगीपासून बहुरंगी आणि अगदी छोटय़ा टिकलीएवढय़ा आकारापासून हातभर फुलणाऱया फुलांपर्यंत.

आपल्या जीवनात या फुलांनी घर केलेले असते. देवाला वाहायला जाणाऱया शांतप्रसन्न चांदणीच्या फुलांपासून  तरुणीच्या केसांत माळल्या जाणाऱया छंद मोगऱयापर्यंत विविध सणांमध्येसुद्धा वैशिष्टय़पूर्ण फुलेच लागतात. गणेशाला लालभडक जास्वंदी तर दसऱयाला झेंडूचे तोरण कम्प्लसरी असते. फुलांनी आपल्या जीवनात वेगळेच रंग भरले आहेत.

काही फुलांचे आकार आणि रंगसंगती वेगळीच असते. बाजूच्या पाकळय़ा फिकट रंगाच्या तर मध्य भाग ठळक डार्क, जेणेकरून कीटक गाभ्याकडे आकर्षिला जाईल आणि परागीभवनाचे काम सुलभ होईल. तिळाच्या झाडांचे फूल याचे फारच छान उदाहरण आहे. नळीसारखा असलेल्या फुलाच्या पुढच्या भागात विमानाच्या रचनेसारखे पट्टे असतात. हे त्या फुलाच्या आतल्या भागाकडे ठळक होत जातात. लँडिंग केलेला कीटक आपसुकपणे आत आकर्षिला जातो आणि नकळत परागीभवनाचे काम करून टाकतो. तेरडय़ाच्या फुलातही ही गंमत पाहायला मिळते. गाभ्याकडे जाणाऱया फिकट रेषा असतात.

कोणते कीटक आपल्याला हवे याबाबत फुले फारच चोखंदळ असतात. कंदीलपुष्प जातीच्या वनस्पतीच्या फुलांचे तोंड ठरावीकच आकाराचे कीटक आत प्रवेश करू शकतील अशा रचनेचे असते.

आपल्याकरिता वास, रंग, आकार हे शोभिवंत म्हणून असतील पण प्रत्येक वनस्पतीसाठी ते पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे अंग असते. यात अगदीच वेगळे असणारे उंबराचे फूल म्हणजे निसर्गाची कमाल आहे. खरे तर इतर फुलांसारखे हे फूल नसतेच तर त्या फळामध्येच असंख्य बारीक फुले असतात. या फळाची फलनाची प्रक्रिया पण अगदीच वेगळी असते. फिगवास्प नावाची माशी आपल्या सोंडेतून फळाच्या आत अंडी टाकते. तेथेच त्यातले कीटक तयार होतात आणि ते फलन घडवून आणतात म्हणून बऱयाच वेळा उंबर उघडले की त्यातून किडे बाहेर पडतात.

 

आपली प्रतिक्रिया द्या