बांबूपासून शोभिवंत वस्तू, पालघरमधील आदिवासी महिला होतायत आत्मनिर्भर

पेन स्टॅण्ड, टी कोस्टर, ट्रे, गिफ्ट बॉक्स, मोबाईल होल्डर, आकाशकंदील, राखी अशा आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेल्या ईकोफ्रेंडली वस्तूंना ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स साईटवर मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे, बांबू हस्तकलेमुळे पालघर जिह्यातील आदिवासी महिला आत्मनिर्भर झाल्या असून त्यांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होत आहे. त्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

‘नारी सक्षम तर परिवार आणि समाज सक्षम, समाज सक्षम तर राष्ट्र सक्षम’ या विचाराने प्रेरित होऊन गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ‘सेवा विवेक’ या संस्थेची वाटचाल सुरू आहे. आदिवासी महिलांना रोजगार मिळाला तर कुपोषण, आरोग्य, शिक्षण या समस्या संपुष्टात येतील. म्हणूनच आदिवासी महिला आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी या संस्थेतर्फे पालघरमधील आदिवासी महिलांना मोफत बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात येते. बांबूपासून शोभिवंत वस्तू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल संस्थेच्या वतीने महिलांना पुरवला जातो. त्यानंतर तयार झालेल्या वस्तू बाजारपेठेत आणि ई-कॉमर्स साईटवर विकल्या जातात. यानिमित्ताने आदिवासी महिलांची कला जगभरात पोहोचत आहे. चांगले उत्पन्न मिळत असल्याने आदिवासी महिला घरची जबाबदारी स्वीकारून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहे.

‘सेवा विवेक’ या संस्थेतच प्रशिक्षण घेऊन मग प्रशिक्षक झालेल्या 10 ते 12 महिलांनी आतापर्यंत शेकडो आदिवासी महिलांना या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. आतापर्यंत संस्थेतर्फे प्रशिक्षणाच्या 17 बॅच आयोजित केल्या असून त्या माध्यमातून 250 हून अधिक महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले होते.

सेवा विवेक या संस्थेतून मी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण घेतले. आज मी पालघर जिह्यातील शेकडो महिलांना प्रशिक्षण देत आहे. बांबू हस्तकलेमुळे मला रोजगार मिळाला. माझ्या लग्नाच्या खर्चासाठी आई-वडिलांना मदत केली, लग्न झाल्यावर नवऱयाच्या मदतीने स्वतःचं आम्ही घर घेऊ शकले. बांबू हस्तकला जास्तीत जास्त महिलांना शिकवून त्यांचे सक्षमीकरण करण्याचा माझा प्रयत्न राहील.
 निर्मला दांडेकर, प्रशिक्षक अधिकारी