बेल्जियमचा ‘थ्री स्टार’ विजय! रशियाची सलामीच्या लढतीत 0-3ने हार

फिफा रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या बेल्जियम फुटबॉल संघाने युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमधील सलामीच्या लढतीत रशियाचा 3-0 अशा फरकाने धुक्वा उडवला आणि ब गटात तीन महत्त्वाच्या गुणांची कमाई केली. स्टार फुटबॉलपटू रोमेलू लुकाकू याने दोन गोल करीत बेल्जियमच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. थॉमस म्युनियर याने एक गोल केला.

एरिकसनमुळे लुकाकूच्या डोळ्यांमध्ये अश्रू

डेन्मार्कचा फुटबॉलपटू ख्रिस्तीयन एरिकसन फिनलँडविरुद्धच्या लढतीत मैदानातच कोसळला. मेडिकल टीमकडून मैदानात उपचार करण्यात आल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. याप्रसंगानंतर बेल्जियम व रशिया यांच्यामधील लढत पार पडली. या लढतीत रोमेलू लुकाकू याने दोन गोल करीत बेल्जिमयला विजय मिळवून दिला. रोमेलू लुकाकू व ख्रिस्तीयन एरिकसन हे दोघेही इटलीतील इंटर मिलान या क्लबमधून एकत्र खेळतात. दोघेही चांगले मित्रही आहेत. त्यामुळे लढतीआधी रोमेलू लुकाकूच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. लढतीनंतर तो म्हणाला, ख्रिस्तीयन इरिकसन याच्यासोबत कुटुंबापेक्षा जास्त वेळ घालवलाय. त्यामुळे मनात त्याच्या प्रकृतीबाबत भीती निर्माण झाली. डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. त्याप्रसंगी मैदानात लढत खेळणे अवघड होते. मी सातत्याने त्याचाच विचार करीत होतो. तो लवकरात लवकर बरा व्हावा असेच मनापासून वाटत आहे, असे भावुक उद्गार त्याने या वेळी काढले.

बचावात चुका

रशियाच्या फुटबॉलपटूंनी या लढतीत बचावात अक्षम्य चुका केल्या. याचा फटका त्यांना बसला. लिएंडर डेनडोंकर याच्याकडून आलेला फुटबॉल आंद्रे सेमायओनोव याला व्यवस्थित हाताळता आला नाही. रोमेलू लुकाकूने याचा फायदा घेत बेल्जियमला पहिला गोल करून दिला. त्यानंतर 34व्या मिनिटाला रशियाचा गोलकिपर अँटोन शुनीन याच्याकडून चूक झाली आणि थॉमस म्युनियरने बेल्जियमसाठी दुसरा गोल केला. 88व्या मिनिटाला रोमेलू लुकाकूने अप्रतिम फिनिशिंगच्या जोरावर बेल्जियमचा तिसरा गोल केला.

10 लढती पराभवाविना

बेल्जियमची विजयी घोडदौड युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमधील सलामीच्या लढतीनंतरही सुरूच राहिली. बेल्जियमने मागील 10 लढतींमध्ये पराभवाचा चेहरा पाहिलेला नाहीए. मागील 24 लढतींमध्ये बेल्जियमला फक्त एकाच लढतीत हार सहन करावी लागली आहे. तसेच मागील 31 लढतींमध्ये बेल्जियमने किमान एक गोल तरी केला आहे.

बेल्जियम-रशिया लढतीची आकडेवारी

बेल्जियम रशिया
गोल 3 0
शॉट 9 5
शॉट ऑन टार्गेट 4 1
बॉलवरील ताबा 62 38
ऑफसाईड 0 4
कॉर्नर्स 2 4
यलो कार्ड 0 0
रेड कार्ड 0 0

आपली प्रतिक्रिया द्या