बोलीभाषेतून सांस्कृतिक मनोरंजन

<< जे . डी . पराडकर >>

संस्कृतीचा वारसा पुढे न्यायचा असेल तर तो सर्वांना समजेल आणि उमजेल अशा भाषेत असला तर त्याचा आनंद सर्वांनाच घेता येतो. बोलीभाषा ही तळागळापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे आपलेपणा जोपासला जातो. भाषेबरोबरच अभिनयाची जोड देत सांस्कृतिक कार्यक्रमांची रचना केली तर ती अधिक प्रभावशाली ठरते. ‘कोकणचा बाज, संगमेश्वरी साज’ हा असाच एक बोलीभाषेतील कार्यक्रम कोकणवासीयांवर अधिराज्य गाजवतोय. संगमेश्वरी बोलीभाषा या मनोरंजनात्मक कार्यक्रमातून सर्वांसमोर पोहोचवत या भाषेचे जतन करण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जात आहे .

सुनील बेंडखळे आणि प्रभाकर डाऊल यांनी आपल्या सहकाऱयांसह कोकणात आपल्या गोडव्यासाठी आणि वेगळ्याच ठसक्यासाठी ओळखल्या जाणाऱया संगमेश्वरी बोलीभाषेचा प्रसार, प्रचार आणि या भाषेचे जतन व्हावे यासाठी या भाषेला मनोरंजनाच्या माध्यमातून व्यासपीठ देण्याचा प्रयत्न सुरू केला. संगमेश्वरी बोलीभाषेत लेखन करणारे गिरीश बोंद्रे आणि आनंद बोंद्रे यांची मदत तसेच मार्गदर्शन घेत त्यांच्या लेखनावर आधारित ‘कोकणचा बाज, संगमेश्वरी साज’ हा धमाल विनोदी कार्यक्रम तयार केला. या कार्यक्रमातील प्रत्येक प्रसंग केवळ हसवत ठेवतो असं नव्हे तर कोकणवासीयांच्या स्वभावाचे पैलू उलगडण्यास मदत करतो. प्रश्नाचं उत्तर उलट प्रश्न विचारून देण्याची संगमेश्वरी बोलीची खासियत आहे. प्रथम दर्शनी कोणाला हा उध्दटपणाही वाटू शकतो, पण प्रश्नाचं उत्तर उलट प्रश्न विचारून देण्यामागे अविश्वास दाखविल्याचा अपमान अधोरेखित केला जातो. ही भाषा तिरकस असली तरी या बोलीभाषेचा वापर करणारी मंडळी सरळ, साध्याभोळ्या स्वभावाची आणि आत्मीयता दर्शविणारी असतात.

या बोलीभाषेतील मनोरंजनात्मक कार्यक्रमात प्रेक्षक तीन तासांपेक्षा अधिक काळ आपल्या जागेवर खिळून राहतात आणि केवळ हसत हसत कार्यक्रमाचा आनंद लुटतात. प्रभाकर डाऊल, सुनील बेंडखळे आणि त्यांच्या सहकाऱयांनी या कार्यक्रमात अडवीतला बाण, सारवलेला रावण, वाघाची पंचाईत, सखूचा जावई असे छोटे छोटे विनोदी प्रसंग उपस्थित प्रेक्षकांना हास्यकल्लोळात न्हाऊन टाकतात. याच कार्यक्रमात जाखडी, नमनमधील काही प्रसंग प्रेक्षकांना कोकणच्या सांस्कृतिक ठेव्याचा खराखुरा आनंद मिळवून देतात. समर्थकृपाच्या माध्यमातून रंगभूमीवर आणलेल्या या कार्यक्रमाला राजाश्रय मिळाला तर लोकाश्रय नक्कीच मिळेल यात शंका नाही. संगमेश्वरी बोलीभाषेत असणारा गोडवा सर्वांपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा समर्थकृपाचा प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या