भातशेतीत साकारला काळा चित्ता

मेधा पालकर

पॅडी आर्ट… जपानमधील शेतीत साकारली जाणारी कला… वनस्पतीतज्ञ श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांनी पुण्यात भातशेतीत या कलेच्या माध्यमातून काळा चित्ता साकारला आहे…

सह्याद्रीच्या दऱयाखोऱयातील फुलांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले पुण्यातील हौशी वनस्पतीशास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांच्या प्रयत्नांतून सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे ‘पॅडी आर्ट’मधून काळा चित्ता साकारला आहे. ‘पॅडी आर्ट’ अर्थात भातशेतीच्या माध्यमातून भव्य चित्र साकारणे. भातशेतीच्या हिरव्या कॅन्व्हासवर साकारलेला काळा चित्ता सर्वांचे आकर्षण ठरला आहे. पर्यटक, रसिक तो पाहाण्यासाठी आवर्जून गर्दी करताना दिसत आहेत.

‘पॅडी आर्ट’ साकारण्याचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षीही ‘पॅडी आर्ट’मध्ये भव्य गणपती साकारण्यात आला होता. व्यवसायाने उद्योजक असलेल्या इंगळहळ्ळीकर यांनी जपानमधील हे ‘पॅडी आर्ट’ प्रथमच पुण्यात आणले. ‘पॅडी आर्ट’ साकारताना जमिनीचा एका ‘कॅन्क्हास’सारखा वापर केला जातो आणि विविध रंगांतील भाताची रोपे लावून रंगसंगती साधली जाते. जोराच्या पावसात गुडघाभर पाण्यात उभे राहून दोन रंगांच्या भातपिकाची पेरणी करणे हे आव्हानात्मक काम असल्याचे इंगळहळीकर यांनी नमूद केले.

या ‘पॅडी आर्ट’विषयी सांगताना इंगळहळ्ळीकर म्हणाले, दक्षिण जपानमधील ओमोरी जिल्हय़ात असलेले इनाकादाते या गावात ‘पॅडी आर्ट’चा जन्म झाला. या भागात वर्षानुवर्षे भातशेती केली जाते. ही भातशेती कोणत्याही यंत्राच्या वापराविना केली जाते. काही वर्षांपूर्वी या भातशेतीला दोन हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेथील शेतकऱयांनी उत्सव साजरा करण्याचे ठरवले आणि त्यातून ‘पॅडी आर्ट’ अर्थात ‘टॅम्बो अटा’ ही कला १९९३ मध्ये जपानमध्ये लोकप्रिय झाली.

इनाकादाते या गावात होणाऱया या उत्सवाची माहिती मला इंटरनेटच्या माध्यमातून मिळाली आणि त्यापासून प्रेरित होऊन मागील कर्षी सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे असलेल्या आपल्या ‘लेक्सॉन किंडर्स’ या कंपनीच्या आकारात या ‘पॅडी आर्ट’पासून भव्य गणपती साकारला होता. या वर्षी काळा चित्ता साकारला असून चित्राचा आकार १२० बाय ८० फूट एवढा आहे.

साधारण पाऊस पडण्यास सुरुवात झाली की, जुलै महिन्यात दोन प्रकारची भाताची रोपे तयार केली जातात. यामध्ये हिरव्या पानांची आणि काळय़ा पानांची रोपे असतात. अगोदर छोटय़ाशा जागेत रोपे तयार केली जातात. त्यानंतर जे चित्र साकारायचे आहे त्या आकारात ती शेतामध्ये लावली जातात. यंदा ब्लॅक पँथर तयार करायचे ठरले. दोन आठवडे अगोदर कम्प्युटरवर चित्र तयार करून त्याचा आकार पक्का केला. त्याच आकारात छोटे छोटे भाग करून त्या मापात ही तयार केलेली रोपे आम्ही शेतामध्ये खोचली. जेव्हा रोपे मोठी झाली तेव्हा त्यामध्ये साकारलेले चित्र खूपच खुलून दिसायला लागते. गो प्रो प्रकारच्या कॅमेऱयातून पॅडी आर्टमध्ये साकारलेले हे चित्र टिपले जाते. त्यामध्ये साकारलेल्या चित्राचा आकार स्पष्टपणे दिसून येतो.

पॅडी आर्टची सुरुवात श्री गणपतीचे चित्र भातामध्ये साकारून करण्यात आली. यंदा काळा चित्ता साकारण्यात आला. यापुढेही निसर्गातील गोष्टी साकारण्याचा प्रयत्न राहील. फुलपाखरू, सापाच्या विविध जाती साकारण्यात येतील. यंदा साकारलेला  काळा चित्ता ही वेगळी प्रजाती नसून तो चित्त्याचाच एक प्रकार आहे. विशिष्ट जनुकीय रचनेमुळे या बिबटय़ांच्या त्वचेमध्ये  मेलॅनिन द्रव्याचा  प्रभाव अधिक असतो आणि त्यामुळे त्यांना संपूर्णतः काळा रंग प्राप्त होतो. हा दुर्मिळ चित्ता प्रामुख्याने कर्नाटकच्या जंगलांमध्ये आढळतो असेही इंगळहळीकर यांनी सांगितले.

इंगळहळ्ळीकर यांनी साकारलेले ‘पॅडी आर्ट’ उंचावरून आणखीनच खुलून दिसत आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील पर्यटकांसाठी ते एक आकर्षण ठरते आहे. जवळजवळ डिसेंबर महिन्यापर्यंत हे ‘पॅडी आर्ट’ पाहता येणार आहे.