भावनांची गुंफण

>> नमिता वारणकर

उत्तमोत्तम प्रेमकथांचा खजिना आणि नात्यांची वीण जपायला शिकवणारं लेखिका संगीता धायगुडे यांचं ‘पॅरेडाईज’ हे पुस्तक. प्रत्येक कथा वाचकाला नकळत अनोखा संदेश देणारी, विचार करायला प्रवृत्त करणारी आहे. ‘पॅरेडाईज’ वाचताना प्रत्येकाला त्याच्या भूतकाळातील आठवणीत घेऊन जातं, रमवतं. यातील प्रत्येक कथा नकळत बोध देऊन जाते.

डिंपल पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या या कथासंग्रहात लेखिका संगीता धायगुडे यांनी लिहिलेल्या कथा वाचताना भावनांचे अनेक पदर उलगडत जातात. त्यामुळे पुस्तक वाचताना मनाच्या कप्प्यात त्या कथांचा नकळतपणे आपण स्वतःशी कधी संबंध जोडू याची जाणीवच राहात नाही.

भावनांचे हिंदोळे…मनाचं मनाशी मिलन… रेशमी बंध फुलण्याच्या पहिल्या पायरीतलं प्रेम… त्यातील पावित्र्य आणि निस्सीम आपुलकी असलेली निःस्वार्थता… ‘पॅरेडाइस’ या कथेत वाचायला मिळते. आयुष्यातलं पहिलं वादळ मिटवण्यासाठी परदेशी आलेली हबिका जर्मनमध्ये राहणाऱया विम्बल्डनच्या प्रेमात पडते. त्यांची प्रत्येक भेट पहिल्या भेटीच्या आतुरतेनं होते. या भेटीचं वर्णन, त्यांचं उत्कट प्रेम, एकमेकांच्या भावनांची कदर लेखिकेने फारच सुंदर शब्दात व्यक्त केली आहे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या जाणिवेतून वडिलांचा क्लिष्ट आजार, आई-बहिणीचं असहायपण, त्यांना आर्थिक आणि मानसिक आधारासाठी आयुष्यात आलेल्या खऱया प्रेमाला हबिका डावलते. त्यांच्या प्रेमाचा पॅरेडाईस लेखिकेने अतिशय समर्पक शब्दात गुंफला आहे.

‘नव्या नात्यांचा पदर’ही कथा भिकाऱयांच्या जगात घेऊन जाते. वेगळ्या आणि भिन्न परिस्थितीतील दोन माणसांना जोडणाऱया या गोष्टीमुळे एका वेगळ्या जगाची ओळख व्हायला मदत होते. कधी कधी आयुष्याच्या सारीपाटावरील पहिल्या डावात नियतीनं हरवल्यानंतर दुसऱया लग्नानंतर झालेली घट्ट मैत्री. यामुळे जिंकलेल्या या दुसऱया डावाचा आनंददायी प्रवास ‘सारीपाट’ या कथेत वाचायला मिळतो. ‘लाईफ पार्टनर’ही अशीच एका प्रगती नावाच्या लग्नाळू मुलीची कथा. अनेक स्थळं हुंडय़ामुळे नापसंत केल्यानंतर अचानक परदेशी जाण्याचा योग येतो. तिथे तिची ओळख डॅनिएल नावाच्या एका जन्मांध व्यक्तीशी होते. हळूहळू त्याच्याशी मैत्री होऊन त्याचं रूपांतर प्रेमात होतं. मात्र अंध असल्यामुळे त्यांच्या लग्नाला आईवडिलांचा विरोध असतो. तरीही हाच आपला लाईफ पार्टनर या मनातल्या विचारावर ठाम राहून ती दोघे लग्न करतात. काही वर्षांनी आईवडिलांचा राग मावळतो. ते आपल्या लेकीचा सुखी, डोळस संसार पाहून आनंदी होतात. ही कथा मनाला हळवं करणारी आहे.

अशा प्रकारे भावभावनांचे अनेक कांगोरे गुंफणाऱया कथा ‘पॅरेडाईज’ या पुस्तकात वाचायला मिळतात. प्रत्येक कथा व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत आहेत. जीवनाचे मर्म उलगडणाऱया आहेत. वेदनेचं बाशिंग, कृतार्थ, पुनर्जन्म, आऊफ विडरजेहेन, दंगल क्यू होती है, दोन क्षणांची माया, अध्यात्म, अनुजा, बांगडय़ा आणि अंगठी अशा विविधरंगी, जिवास जवळच्या वाटणाऱया कथा या कथासंग्रहात वाचायला मिळतात. प्रत्येकीतून एक वेगळा प्रवास उलगडत जातो. प्रत्येकीचा पोत, त्यातील नात्यांची वीण रोमहर्षक आहे.

पॅरेडाईज
लेखिका – संगीता उत्तम धायगुडे
पृष्ठ – 144
मूल्य – 160 रुपये