मानवी वन्य जीवन – न उलगडणारे कोडे

1308

>> सुनील लिमये

मानव आणि वन्य जीव यांच्यातील संघर्ष पूर्वापार चालत आलेला आहे. मात्र अलीकडे तो तीक्र होताना दिसत आहे. काय आहेत याची नेमकी कारणे? माणूस आणि वन्य जीव प्रसंगी एकमेकांच्या जीवावर का उठतात? हा संघर्ष कमी करण्यासाठी काय करता येईल? वन्य जीव संघर्ष एक उलगडणारे कोडे का बनत चालला आहे? आदी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणारा हा लेख…

हिंदुस्थानातील वाघांची किमान संख्या ही दोन हजारांच्याही वरून दोन हजार 967 वर पोहोचली तर महाराष्ट्रातील वाघांची संख्या 190 वरून 312 वर गेली आहे. वाघांच्या संख्यावाढीमुळे वन्य जीवप्रेमींना नक्कीच आनंद झाला. विशेषतः या संख्येमध्ये वाघांच्या पिलांच्या संख्येचा समावेश केलेला नाही हे कळल्यानंतर तर  वन्य जीवप्रेमींच्या आनंदाला पारावारच उरला नाही. कारण ही पिले म्हणजे आणखी अतिरिक्त वाघ व त्यामुळे वाघांची संख्या चांगल्या प्रकारे वाढत आहे हे निश्चित झाले, परंतु त्याच वेळी वृत्तपत्रातील व दूरचित्रवाणीवरून दिसणाऱया बातम्या अस्वस्थ करणाऱया होत्या. उत्तर प्रदेशातील दुधवामध्ये ग्रामस्थांनी वाघाला जंगलात जाऊन वाहनाखाली चिरडून मारले, महाराष्ट्रात विजेच्या धक्क्याने वाघ मृत पावले, फाशात वाघ अडकून त्याचा जीव गेला व त्याचबरोबर चंद्रपूर जिह्यामध्ये वाघांच्या हल्ल्यात माणसांचा बळी, वर्षभरापूर्वी महाराष्ट्रातील यवतमाळ जिह्यातील पांढरकवडा येथे वाघ व मनुष्य यांच्यात झालेल्या तीक्र संघर्षात माणसे तसेच वाघिणीचा झालेला मृत्यू या सर्वच खूप धक्कादायक व क्लेशदायक बातम्या होत्या. म्हणजेच एकंदरीत या संघर्षात मानव तसेच वाघ हे दोन्ही बळी पडत असल्याचे दिसून येते. वन्य जीवांच्या संवर्धनासाठी शासनातर्फे योजलेल्या निरनिराळय़ा उपायोजनांमुळे वन्यजीवांची वाढणारी संख्या हा सुखद अनुभव असताना दुसरीकडे या वन्य जीवांच्या वाढीमुळे व त्याच वेळी त्यांच्या अधिवासावर होणाऱया

अतिक्रमणामुळे वाढत चाललेला मानव-वन्य जीव संघर्ष मात्र मन विषण्ण करणारा ठरतो. मानव-वन्य जीव संघर्षामध्ये नक्की चूक कोणाची? मानवी वस्तीत वन्य प्राणी शिरतातच का? त्यांना नैसर्गिक अधिवासाची कमी आहे का? असे बरेच प्रश्न या अनुषंगाने वनाधिकाऱयांना व निसर्गप्रेमींकडून एकमेकांना विचारले जातात. अशा अनेक घटनांत वन्य जीवांची प्रथम चूक नसल्याचे दिसून येते. कारण सामान्य जीवन जगण्यासाठी वन्य जीव काय किंवा मनुष्यप्राणी काय, त्यांना जरुरी असलेल्या जागेत दुसऱया कोणाचा शिरकाव झाला तरच संघर्षाचे प्रसंग घडतात. मनुष्यास तसेच वन्य जीवांनादेखील सामान्य व व्यवस्थित जगण्यासाठी एक ठराविक जागा जरुरी असते. परंतु जंगलांची कमी होणारी घनता, तेथे स्थानिकांद्वारे होणारे अतिक्रमण यामुळे त्यात राहणाऱया वन्य जीवांना नाइलाजाने निवारा व भक्ष्यांच्या शोधात मनुष्याच्या अधिवासाकडे यावे लागते व त्यामुळे मानव वन्य जीव संघर्षाचे प्रसंग ओढवतात. ही परिस्थिती बदलली नाही तर हे वाढतच राहणार आहे.

मानव-वन्य जीव संघर्षाबाबत सामान्यतः नागरिकांची मते वेगवेगळय़ा प्रकारची असतात. काही स्तरांतून वन्य जीवांसाठी खूप प्रेम दाखवले जाते. मात्र संबंधित नागरिक आपले मत प्रकट करण्यापूर्वी संघर्षाच्या पूर्वपीठिकेबाबत कोणताही अभ्यास अथवा विचार करीत नाहीत.

हे सर्व असे का होते, हे जर आपण बारकाईने पाहिले तर दरवेळी मानव-वन्य जीव संघर्ष होण्यासाठी मनुष्य अथवा पशुधनाचा मृत्यू किंवा शेतीचे नुकसान हे महत्त्वाचे मुद्दे आढळतात. परंतु त्याच वेळी अकोले, जुन्नर भागातील ऊस शेतीमधील पिलांना जन्म देणारे बिबटे शेतीचे नुकसान करणाऱया डुकरांना मारतात. त्यामुळे पीक नुकसानीपासून शेतकऱयांचा बचाव होतो हेही खरेच. गीरसारख्या ठिकाणी सर्वत्र असलेल्या सिंहाच्या वावरामुळे नीलगाय व रानडुकरे हेसुद्धा शेतीपासून दूर राहतात. सिहांच्या वावरामुळे शेतकऱयांचाही एक प्रकारे फायदा होतो. महाराष्ट्राचा विचार करता पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा, कोकण या भागांमध्ये बिबटय़ा व मनुष्य यांच्यातील संघर्ष वाढतच आहे, तर विदर्भात मात्र या बिबटय़ाच्या जोडीने वाघ व मनुष्य हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे दिसते. यामागील कारणांचा विचार करता प्रथमदर्शनी यात वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा होणारा नाश हे महत्त्वाचे कारण बऱयाच ठिकाणी असल्याचे दिसते.

आजकाल बऱयाच ठिकाणी वाघ व मनुष्य हा संघर्ष वाढत असल्याचे दिसत आहे व विशेषतः विदर्भात जास्तच. जगातील सुमारे 70 टक्के वाघ हे हिंदुस्थानात असून त्यातील 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाघ महाराष्ट्रात आहेत व त्यातही त्यांची मोठी संख्या विदर्भात आहे. परंतु विदर्भात वाघांचे जंगलातील अधिवासाचे क्षेत्र हे बऱयाच प्रमाणात स्थानिकांचे व आदिवासींच्या वनोपजावर आधारित असलेल्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे तेथील संघर्ष हा दोघांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिवासावर निश्चित हक्क कोणाचा आहे या मुद्दय़ांवरून होत असतो. पूर्वापार चालत असलेल्या समजुती, विश्वास तसेच आपल्या संस्कृतीमुळे खरे तर बऱयाच वन्य जीवांना देवतांच्या वाहनांचे व विशेषतः वाघाला देवतेचे स्थान देण्यात आलेले आहे. बऱयाचदा खेडय़ापाडय़ांत आदिवासी पाडय़ामध्ये वाघोबा किंवा वाघदेवता म्हणून वाघाला पुजले जाते व त्यांच्याकडून संरक्षणाची अपेक्षा ठेवली जाते. परंतु जेव्हा मानव व वाघामध्ये संघर्ष तीक्र होतो तेव्हा मात्र आपली पूर्वापार चालत आलेली संस्कृती लक्षात न घेता आपण वाघांच्या जीवावर उठतो. वास्तविक अशा प्रकारचा मानव-वन्य जीव संघर्ष आपणांस नवीन नाही. परंतु वाढत चाललेली लोकसंख्या आणि त्याच वेळेस शासनाच्या विविध योजनांमुळे व वन विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे वाढत चाललेली वाघांची संख्या यामुळे हा संघर्ष एका न उलगडणाऱया कोडय़ासारखा झाला आहे.

गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रातील यवतमाळ जिह्यातील पांढरकवडा येथे टी-1 वाघिणीकडून झालेली मनुष्याची हत्या व त्यानंतर तिचा झालेला मृत्यू यामुळे महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते. परंतु अशा घटनांचा एकांगी विचार न करता त्यामागील कारणे शोधून काढणे अत्यंत जरुरीचे आहे. त्यानंतरच हा मानव-वन्य जीव संघर्ष कसा कमी करता येईल याबाबत विचार करता येईल.

आपण या मानव-व्याघ्र संघर्षाच्या मुळाशी जायचे ठरवले तर आपल्या हे लक्षात येईल की, हा संघर्ष वेगवेगळय़ा कारणांमुळे होत असतो. अनेकदा जे क्षेत्र वाघांसाठी किंवा वन्य जीवांसाठी गाभा क्षेत्र म्हणून संरक्षित ठेवलेले असते त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी (जसे विदर्भामध्ये तेंदू, मोहा, बांबू इत्यादी वनोपज गोळा करण्यासाठी, मध्य प्रदेशामध्ये वरील वनोपजांसोबतच हिरडा, बेहडा ही वनोपजे गोळा करण्यासाठी, पश्चिम बंगालमधील सुंदरबनमध्ये मध, खेकडे व सागरी अन्न पकडण्यासाठी) जेव्हा स्थानिक लोक जंगलात अपप्रवेश करतात तेव्हा मानव-वन्य जीव संघर्ष होतो. दुसऱया परिस्थितीमध्ये असेही दिसते की, जेथे वन क्षेत्र आणि शेती, मनुष्य वस्ती हे एकमेकास लागून आहेत त्या ठिकाणी हा संघर्ष नेहमी होतो.

या परिस्थितीचा अभ्यास केला असता असे दिसून येते की, हा संघर्ष मुख्यत्वेकरून वन्य प्राण्यांना व मनुष्याला अन्न व निवारा यासाठी आवश्यक असलेल्या अधिवासाचा आहे. वन्य जीवासाठी वनक्षेत्र, त्यातल्या त्यात संरक्षित क्षेत्र हा राखून ठेवलेला अधिवास आहे. परंतु जेव्हा मनुष्य त्यांच्या अनावश्यक, पण वाढीव गरजांपोटी या अधिवासामध्ये शिरकाव करू पाहतो त्यावेळी हा संघर्ष सुरू होतो. विविध उपाययोजना करून आपण नक्कीच हा मानव-वन्य जीव संघर्ष कमी करू शकतो. परंतु हे सर्व करीत असताना स्थानिकांचे सहकार्य व्याघ्र आणि इतर वन्य जीव संवर्धनासाठी अत्यंत जरुरीचे आहे हे विसरून चालणार नाही. कारण जोपर्यंत स्थानिक हे वन्य जीवाच्या संरक्षणासाठी तयार होत नाहीत तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केले तरी ते शक्य नाही व त्यामुळे असे संघर्ष निर्माण होऊन ते वाढतच राहतील. त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा वाघ, बिबटय़ा यांसारख्ये प्राणी व त्याची पिले जंगलात पाहू त्याच वेळेस अशा वन्य जीवांच्या वाढत्या संख्येमुळे होणारा मानव-वन्य जीव संघर्ष कमी करण्याची जबाबदारीसुद्धा वाढतच राहणार आहे हे नेहमीसाठी लक्षात ठेवूनच आपणांस वन्य जीव संवर्धनासाठी योग्य ते प्रयत्न करणे व त्याप्रमाणे मानव-वन्य जीव संघर्ष कमी करण्यासाठी धोरण ठरविणे जरुरीचे आहे.

संघर्ष कमी करण्यासाठी…

माणूस आणि वन्य जीव यांच्यातील संघर्ष कमी करायचा असेल तर त्यासाठी माणसानेच जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी पुढील काही उपाय करता येतील –

मानवामध्ये वन्य जीवांबाबत व त्यांच्या किमान गरजांबाबत जागृती करणे.

– वाघ व इतर प्राण्यांचे महत्त्व स्थानिकांना समजावून सांगणे.

– वन्य जीवाकडून मनुष्यहत्या किंवा पशुधनहत्या वा शेतीचे नुकसान होते तेव्हा तातडीने त्यांना शासनाकडून सानुग्रह अनुदान तातडीने प्राप्त करून देणे हे अत्यंत जरुरीचे आहे, जेणेकरून वन्यजीवांच्या विरुद्ध स्थानिकांचे मत तयार होणार नाही.

– जे स्थानिक वनांच्या हद्दीवर राहतात किंवा संरक्षित क्षेत्राच्या जवळ राहतात ते एक प्रकारे वन्य जीवांच्या संरक्षणासाठी जास्त जबाबदार असतात. त्यामुळे अशा स्थानिकांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळावे म्हणून विविध शासकीय योजनांमधून त्यांच्या शेतीसाठी किंवा ते राहत असलेल्या ठिकाणाच्या जवळच्या वनांमध्ये निसर्ग पर्यटन सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे हे अत्यंत गरजेचे आहे.

– विविध विकासकामांमुळे बऱयाच वन्य जीवांच्या/वाघांच्या अधिवासाचे छोटे छोटे तुकडे पडण्याची शक्यता असते व असे अधिवासांचे तुकडे आज बऱयाच क्षेत्रात पडलेले आहेत. वाहतुकीसाठी तयार होणारे मोठमोठे रस्ते, पाण्यासाठी बांधलेली धरणे, कालवे अशांमुळे हे अधिवासाचे तुकडे पडतात. तेव्हा अशा या तुकडय़ांत विभागलेल्या अधिवासांच्या तुकडय़ांना व्यवस्थितपणे जोडून त्यांचा वन्य जीवांसाठी भ्रमणमार्ग तयार करणे हेदेखील अत्यंत जरुरीचे आहे, ज्यामुळे वन्य जीव त्यांच्या एका अधिवासाच्या क्षेत्रातून दुसऱया क्षेत्रात सुरक्षितपणे व मानवाशी संघर्ष न होता जाऊ शकतील.

(लेखक महाराष्ट्र राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या