मुंबईचा संकटमोचक………. सिद्धेश लाड

307

>>>   नवनाथ दांडेकर

 

टीम इंडियात स्थान मिळवण्याचे स्वप्न

यंदाच्या रणजी हंगामात मुंबईसाठी तीन शतके व चार अर्धशतकी खेळींचा रतीब टाकणाऱया सिद्धेश लाडने अखिल हिंदुस्थानी आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे यशस्वी नेतृत्व केले होते. पण दुर्दैवाने मुंबईला आंतर विद्यापीठ स्पर्धेत जेतेपदापासून वंचित राहावे लागले आहे. दुखापतींमुळे काही काळ क्रिकेट खेळू न शकणाऱ्या सिद्धेशने तामीळनाडूविरुद्ध पुनरागमन साजरे करीत आपला ‘दस का दम’ प्रतिस्पर्धी संघाला दाखवून दिलाय.

रणजीत विजयाची तुतारी वाजवत मुंबई संघाला यश मिळवून देणाऱ्या सिद्धेशला आता टीम इंडियात स्थान मिळवायचे आहे. त्यासाठी कितीही परिश्रम करायची त्याची तयारी आहे. बालमित्रांनो, मुंबई संघाचा ‘संकटमोचक’ म्हणून ओळखल्या जाणाऱया सिद्धेशदादाला आपण भरभरून शुभेच्छा देऊया. आईवडिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा आणि परिश्रमाची अफलातून तयारी असलेला सिद्धेश आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून लवकरच देशासाठी विजयी खेळी करणार यात शंका नाही. मुंबईकर क्रिकेटशौकिनांच्या लाख लाख शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेतच.

बालमित्रांनो मुंबईकरांच्या रक्तातच क्रिकेटचा जीन्स आहे असे म्हणतात. ब्रिटिश हिंदुस्थान सोडून जाताना क्रिकेट या खेळाची विरासत मुंबईकरांकडे सोडून गेले असे म्हणायला काही हरकत नाही. मुंबई संघाने ४१ वेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरून देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. मधली काही वर्षे कर्नाटक व तामीळनाडू या दाक्षिणात्य संघांनी मुंबईला मागे टाकत रणजी करंडक पटकावला होता. पण रक्तातच क्रिकेट असलेल्या मुंबईने गोऱयांच्या या खेळात पुन्हा आपली मास्टरी सिद्ध केलीय. त्याचे कारणही तसेच आहे. घरातच क्रिकेटचे गुरुकुल असलेले सिद्धेश लाडसारखे नव्या दमाचे मुंबईकर क्रिकेटपटू आपली चमक आता दाखवायला लागले आहेत. यंदाच्या हंगामात रायपूर रणजी लढतीत हैदराबादविरुद्ध  ११० धावांची खेळी करीत सिद्धेशने मुंबई संघाला रणजी उपांत्य फेरी गाठून देण्यात सिंहाचा वाटा उचललाय. रणजी करंडक व इराणी करंडक लढतीत जेव्हा जेव्हा मुंबई संघ संकटात सापडला तेव्हा तेव्हा झुंझार सेनानीच्या थाटात सिद्धेशने जिगरबाज फलंदाजी करीत मुंबईचा ‘संकटमोचक’ म्हणून भूमिका पार पाडली आहे. रोहित शर्मासारखा धडाकेबाज फलंदाज घडवणारे शालेय क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा मुलगा म्हणून सिद्धेशने संघनिवडीसाठी ओळखीच्या कुबडय़ा कधीच घेतल्या नाहीत यातच त्याचे मोठेपण सामावले आहे.

घरातच क्रिकेटचे वातावरण असल्याने शालेय जीवनातच सिद्धशने बॅट हातात घेऊन पराक्रम नोंदवायला सुरुवात केली. धडाकेबाज पण संयमी फलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण व संघाला गरज पडल्यास प्रभावी ऑफब्रेक गोलंदाजी करीत सिद्धेशने मुंबई संघात आपले स्थान निश्चित केलेय. दुखापतग्रस्त रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांच्या अनुपस्थितीत मुंबई संघाला यंदा रणजी करंडक उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून देण्याचे काम सिद्धेशने कर्णधार आदित्य तरे आणि अष्टपैलू अभिषेक नायरच्या साथीने अगदी उत्तम पार पाडलेय. आता संघाला अंतिम फेरीत मजल मारून देण्यासाठी आणि पुन्हा एकदा ४२ व्या वेळी रणजी करंडक पटकावून देण्यासाठी सिद्धेश लाड पुन्हा मुंबईचा संकटमोचक ठरेल अशी आशा मुंबईकर क्रिकेट शौकिनांना आहे. २४ वर्षीय सिद्धेशने ७ नोव्हेंबर २०१६ रोजी पंजाबविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करीत ३० लढतीत ४१.५२  च्या सरासरीने २०७६ धावांची नोंद केलीय. त्यात चार शतके व १३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या १५० ठरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या