मुद्दा – कबड्डी खेळाडूंना ‘अच्छे दिन’

1067

कबड्डी म्हणजे अस्सल हिंदुस्थानी मातीतला खेळ. पूर्वी गावागावांत खेळला जाणारा हा खेळ मागील काही वर्षांत लोप पावतो की काय अशी शंका यावी इतपत दुर्मिळ होत चालला होता, पण गेल्या काही वर्षांत या खेळाला पुन्हा उर्जितावस्था मिळाली. विशेषतः आयपीएलच्या धर्तीवर प्रो कबड्डी लीग अस्तित्वात आल्यापासून कबड्डीला अच्छे दिन आले आहेत. सात वर्षांपूर्वी आयपीएलच्या धर्तीवर प्रो कबड्डी लीगचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला ही लीग यशस्वी होईल असे कोणालाही वाटले नव्हते, पण अल्पावधीतच या लीगने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या लीगचे थेट प्रक्षेपण सुरू केल्यावर या लीगला तुफान प्रतिसाद मिळाला. स्टार वाहिनीमुळे कबड्डी घराघरांत पोहचली. दूरचित्रवाणीवर या लीगला चांगला प्रतिसाद मिळाला. क्रिकेटप्रमाणेच प्रेक्षकांनी या लीगचाही आनंद लुटला. प्रो कबड्डी लीगमधील कबड्डीपटू लोकप्रिय झाले. या लीगमध्ये खेळणारे खेळाडू प्रेक्षकांचे आयकॉन बनले. प्रो कबड्डी लीगमधील खेळाडू अतिशय गरीब घरातून व छोटय़ा गावातून आले आहेत. ते या लीगमुळे मालामाल झाले. सुरुवातीला या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना लाखो रुपये मिळत. हिंदुस्थानचा कर्णधार राकेश कुमार याला सुरुवातीला 18 लाख रुपये मानधन मिळाले. राकेश कुमारप्रमाणेच अन्य खेळाडूंनाही मनासारखे मानधन मिळाले. या लीगची लोकप्रियता वाढल्याने सुरुवातीला आठ संघ असणारी ही लीग आता बारा संघांची झाली आहे. अदानी जिंदाल या बड्या उद्योग समूहांसोबतच सचिन तेंडुलकर व अभिषेक बच्चन यांनीही संघ विकत घेतल्याने या लीगला ग्लॅमर प्राप्त झाले. क्रिकेटप्रमाणेच या लीगचीही लोकप्रियता वाढल्याने खेळाडूंचे मानधनही वाढले. या वर्षी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात सहा खेळाडूंना एक करोडपेक्षाही जास्त मानधन देण्यात आले. मनू गोयल, दीपक हुडा, राहुल चौधरी, शशांक देवडिगा, नितीन तोमर याशिवाय इराणच्या एका खेळाडूलाही एक कोटीपेक्षा जास्त मानधन देण्यात आले. कबड्डी हा खेळ ग्रामीण भागात खेळला जाणारा खेळाडूही गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील कबड्डीवर यांचा उदरनिर्वाह होणे कठीणच. म्हणूनच या खेळाडूंना मिळणारे हे मानधन सुखावणारे आहे. जर कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना असे मानधन मिळाले तर तरुण वर्ग कबड्डीकडे आकर्षित होईल. जास्तीत जास्त मुले कबड्डी खेळतील. कबड्डीचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त होईल. प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डीप्रमाणेच खेळाडूंनाही अच्छे दिन आले आहेत हे मान्यच करावे लागेल.

>> श्याम बसप्पा ठाणेदार

आपली प्रतिक्रिया द्या