राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर

सामना ऑनलाईन। मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली. यामध्ये व्यवसायाने डॉक्टर आणि वकील असलेल्यांनाही संधी देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. या यादीमध्ये आजीमाजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेवकांचाही समावेश आहे.

काँग्रेसशी युती करणार का या प्रश्नावर उत्तर देताना मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन अहीर यांनी सांगितलं की काँग्रेसचे काही नेते आम्हाला कोणाची गरज नाही अशी भाषा करत आहे. त्यामुळे आम्ही कोणासाठी न थांबता पहिली यादी जाहीर केली. मुंबईतील सगळ्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार नाहीये. जिथे पक्षाची ताकद असेल अशा प्रभागांमध्येच निवडणूक लढवणार असल्याचं सचिन अहीर यांनी स्पष्ट केलं.

मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली. या पत्रकार परिषदेला मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ देखील उपस्थित होत्या.