रिकी पाँटिंगचे नॉनस्टॉप कोचिंग, आयपीएल फायनलनंतर थेट ऑस्ट्रेलियाला कोचिंग

रिकी पाँटिंग फलंदाज म्हणून महान होता. कर्णधार म्हणून ग्रेट होता. आता तो प्रशिक्षक म्हणूनही ठसा उमटवतोय. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला फायनलपर्यंत पोहोचवल्यानंतर त्याने एका दिवसाचीही विश्रांती न घेता ऑस्ट्रेलियन संघाला कोचिंग करायला प्रयाण केले. ही वाखाणण्याजोगी बाब.

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 27 नोव्हेंबरपासून क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. याप्रसंगी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्क्स स्टोयनीस म्हणाला, रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत पहिल्या दिवसापासून आहे. नेटमध्ये चेंडू थ्रो करून तो खेळाडूंचा सराव करवून घेतोय. आयपीएल आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा सराव यामुळे रिकी पाँटिंग थकलाय, पण तरीही तो नॉनस्टॉप आपले काम करीत आहे.

आमूलाग्र बदल करत नाही
मार्क्स स्टोयनीस म्हणाला, रिकी पाँटिंगला गेल्या अनेक दिवसांपासून ओळखत आहे. त्याचे मार्गदर्शन मला पदोपदी लाभत आहे. काय करायचे आहे ते तुम्हाला तो करून दाखवतो. तसेच तुमच्यामध्ये काही सुधारणा करायची असल्यास तो सल्ला देतो, मात्र तुमच्यात आमूलाग्र बदल करत नाही. हीच एका महान कोचची ओळख आहे.

आपली प्रतिक्रिया द्या