रोझा देशपांडे काळाच्या पडद्याआड, साम्यवादी चळवळीचा साक्षीदार हरपला

ज्येष्ठ साम्यवादी नेत्या व माजी खासदार काँम्रेड रोझा देशपांडे (वय 92) यांचे शनिवारी दादर येथील राहत्या घरी  वृध्दापकाळाने निधन झाले. शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसस्कार करण्यात आले.

काँम्रेड रोझा देशपांडे यांच्या पश्चात विवाहित कन्या, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. रोझा देशपांडे या कम्युनिस्ट पार्टी आँफ इंडियाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या होत्या. 1974मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार म्हणून त्या  उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. काँग्रेसचे रामराव आदिक यांचा त्यांनी पराभव केला होता. पुढे काँ. डांगे यांच्याबरोबर अखिल भारतीय कम्युनिट पक्षात गेल्या.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही त्या अग्रभागी होत्या. गिरणी कामगारांबरोबरच औषध कंपन्यांमधील कामगार चळवळ हे त्यांचे क्षेत्र होते.जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन सारख्या अनेक औषध कंपन्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली युनियन होती. त्याकाळी औषध कंपन्यांमध्ये महिला मोठ्या संख्येने होत्या. गरोदर राहिल्यास त्यांना कामावरून काढून टाकत असत. त्यांनी या विरोधात लढा देऊन  मालकांची ही अरेरावी बंद पाडली होती. त्यांची स्मरणशक्ती वृद्धकाळातही तल्लख होती. त्यांनी लिहिलेले  ‘एस. ए. डांगे –एक इतिहास’ हे पुस्तक गाजले होते.

विसाव्या शतकातील लढवय्यांच्या पिढीच्या त्या प्रतिनिधी होत्या अशी आठवण भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबई कौन्सिलचे सेक्रेटरी प्रकाश रेड्डी यांनी सांगितली.

राज्यपालांकडून श्रद्धांजली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. वडिल श्रीपाद अमृत डांगे यांच्याकडून मिळालेला समाजसेवेचा वसा त्यांनी आयुष्यभर निष्ठेने चालविला, असे राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

‘संघर्ष’मय जीवन

  • कॉ. रोझा देशपांडे यांचा जन्म 1928मध्ये झाला.त्यांचे वडील कॉ. डांगे, आई ऊषाताई यांनी त्यांचे नाव जर्मन कम्युनिस्ट क्रांतिकारक नेत्या रोझा लक्झेंम्बर यावरून ठेवले.
  • त्या वर्षी गिरणी कामगारांचे अभूतपूर्व संप सुरु होते. कॉ.डांगे तुरुंगात असत. ऊषाताई रोझाला संपात गिरिणीच्या गेटवर घेऊन जात. त्या संप, संघर्ष अशा  वातावरणात वाढल्या.
  • पुढे गिरणी कामगारांच्या आंदोलनातही त्या अग्रभागी होत्या. प्रभावी वत्तäया होत्या. कॉ. डांगे यांच्या प्रमाणेच छोटी वाक्ये उच्चारत पण राजकीय प्रभावी विचारांनी त्या हजारोंच्या सभा मुग्ध करीत असत.
आपली प्रतिक्रिया द्या