रोबोची कमाल

257

शिवाजी सुतार

पाचवीच्या  वर्गात काळे सर शिकवत होते. त्यांचं शिकवणं सुरू असतानाच शिवानी मधेच उठून उभी राहिली. ते काळे सरांच्या लक्षात येताच त्यांनी तिला विचारलं, `का गं, उठून का उभी राहिलीस?’  शिवानी म्हणाली, `सर, माझ्या दप्तरातील कंपासपेटी नाहीशी झालीय!’

`घरी विसरून तर आली नाहीस ना तू?’

`नाही सर, सकाळी घरून निघताना होती माझ्या दप्तरात.’ शिवानी असं उत्तरताच काळेसरांनी सर्व विद्यार्थ्यांना शिवानीच्या कंपासपेटीबाबत विचारलं; पण ज्याने त्याने नकारच दिला. आज पाचवीच्या वर्गात चौथ्यांदा असा प्रकार घडला होता. त्यामुळे काळे सर अगदीच काळजीत पडले. गेल्या पंधरा दिवसांत मुग्धाची रंगपेटी, यास्मिनचे बालभारतीचे पुस्तक, तर संदेशचा किमती पेन हरवला होता आणि आज तर शिवानीची कंपासपेटी नाहीशी झाली होती. काळे सरांना या प्रकाराने खूपच चीड आली होती; पण शिक्षा करायची कुणाला? कारण चोर तर सापडला पाहिजे ना?

दोनेक तासांनी मधली सुट्टी झाली. काळे सर वर्गाबाहेर निघून गेले. सर्व विद्यार्थ्यांनी खाऊचा डबा काढून खाण्यास सुरुवात केली. यास्मिनने खाऊचा डबा संपताच हात धुतले आणि ती स्टाफ रूमकडे गेली. यास्मिनने काळे सरांना हळूच बाहेर बोलावलं आणि म्हणाली, `सर, वस्तू चोरणाऱ्याला शोधण्यासाठी माझ्या डोक्यात एक कल्पना आलीय.’

यास्मिननं आपली कल्पना सरांना सांगून टाकली. काळे सर यास्मिनची ती कल्पना ऐकून तिला म्हणाले, `छान! तुझी कल्पना तर छान आहे; पण सध्या तशी वस्तू तुझ्याजवळ आहे का?’

`हो, आहे ना! कालच माझ्या मामांनी ती वस्तू मला पाठवून दिलीय.’

`ठीक आहे. मग उद्याच घेऊन ये ती वस्तू!’

दुसऱया दिवशी प्रार्थनेनंतर शाळा सुरू झाली. काळे सर वर्गात आले. वर्गात येताच ते सर्व विद्यार्थ्यांना म्हणाले, `मुलांनो, आज मी तुम्हाला अशी एक वस्तू दाखवणार आहे की, ती पाहून तुम्हा सर्वांना नक्कीच आश्चर्य वाटेल.’

`कोणती सर?’ यास्मिन वगळता बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकच गलका केला. सरांनी  यास्मिनला ती वस्तू आणायला सांगितली. यास्मिननं खोक्यात असलेली ती वस्तू सरांसमोरील टेबलावर ठेवली. काळे सर ती वस्तू  सर्व विद्यार्थ्यांना दाखवत म्हणाले, `मुलांनो, ही वस्तू कोणती आहे सांगता येईल तुम्हाला?’ मात्र कुणालाच त्या वस्तूचे नाव सांगता येईना. तसे काळे सर मोठय़ा मिस्किलीने म्हणाले, `याला म्हणतात रोबो! हा रोबो यास्मिनच्या मामाने मुंबईहून तिला पाठवून दिलाय. हा रोबो म्हणजे एक चालता-बोलता माणूसच आहे बरं का! आता याचे डावीकडील बटन दाबले की, आपल्याला हव्या असणाऱया प्रश्नांची उत्तरे तो बिनचूक देतो. मुलांनो, तुम्हाला माहीत आहेच की, गेल्या पंधरा दिवसांपासून आपल्या वर्गातील एकेका विद्यार्थ्याची वस्तू चोरीला जात आहे. मात्र चोरी करणारा विद्यार्थी काही सापडत नाही आता हा प्रश्न आपोआपच सुटणार आहे. हा रोबो आता आपल्याला चोरी करणारा विद्यार्थी कोण आहे, ते अगदी बिनचूक सांगणार आहे.’

काळे सर असं म्हणताच वर्गात पाठीमागे बसलेला दिनू अचानक उठून उभा राहिला. तो थोडा घाबरलेला होता. काळे सरांना नवल वाटले.

`सर, त्या वस्तू मीच चोरल्यात,’ दिनू खाली मान घालून म्हणाला.

`काय! तू चोरल्यास? पण का?’

`त्या वस्तूंसाठी माझ्याकडे पैसे नव्हते. `सर, माझे वडील आजारी असल्याने घरीच असतात. आई कसातरी खर्च चालवते.’

`अरे पण, त्यासाठी तू असा चुकीचा मार्ग का निवडलास? चोरी करणे हा गुन्हा आहे.

`इथून पुढे माझ्या हातून असा गुन्हा पुन्हा कधीच घडणार नाही. मी आजपासून गाडय़ा धुण्याचं, पेपर टाकण्याचं काम सुरू केलंय. त्यातूनच मी वह्यापुस्तकं खरेदी करेन.’

`मग मुलांनो, दिनूनं आपला गुन्हा तर आता कबूल केलेला आहे. वास्तविक याबाबत त्याला शिक्षा होणं गरजेचं होतं; पण तो आता फावल्या वेळात कष्ट करून स्वावलंबी झाल्याचं सांगतोय. त्यामुळं आपण त्याला माफ करूया. मात्र मुलांनो, हा टेबलावरील रोबो मुळीच चालता-बोलता नाही बरं का? अरे, हे एक खेळणं आहे. यास्मिनने मला या रोबोविषयीची कल्पना सुचविली आणि त्यामुळेच एका गुह्याची उकल झाली. याबाबत यास्मिनच्या कल्पनेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे नाही का?’

`होय सर.’ सर्व मुले एकसुरात उत्तरली.

आपली प्रतिक्रिया द्या