लोकसंस्कृति

शिमग्याचा महिना….गणेश चंदनशिवे

महाराष्ट्रात होळीच्या सणाचे महत्त्व फार असते. अनेक प्रथा, परंपरांसह हा उत्सव सजला आहे

महाराष्ट्रात शिमग्याच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. शिमग्याच्या आदल्या दिवशी होळी साजरी करतात. गावातील लहान-थोर मुले आणि माणसे गावठाणातून शेणाच्या गोवऱया जमा करतात आणि  गावातील मध्यभागी मारुतीच्या मंदिरासमोर होळी रचतात. मध्यभागी गोल खड्डा करून त्यात एरंडाचे झाड रोवले जाते. अवतीभोवती गोवऱया  आणि लाकडांची सुडी लावली जाते. गावातील सुवासिनी येऊन तांब्याच्या कलशातील उदक शिंपडून आणि हळदी-कुंकू वाहून पूजन करतात. आणि त्यानंतर होळी पेटवण्याचा विधी संपन्न होतो. महाराष्ट्रात होळीच्या वेळेला गावातील ग्रामस्थांनी जर होळीसाठी सरपण आणि गोवऱया देण्यास नकार दिला तर त्याच्या नावाने बोंब ठोकतात. म्हणूनच होळी शिमग्याचा सण ज्या महिन्यात येतो त्या महिन्याला ग्रामीण भागात ‘बोंबाचा महिना’ म्हटले जाते. यावेळी गावातील मुले गल्लीबोळातून बोंब मारत सुटतात ती अशी –

बोंबल बोंबल कायको आणि जो अ ब कच्या नावाने         

बोंबलणार नाही ती माझी बायको रे भो……..’’

अशा पध्दतीने या काळात कोणाची थट्टामस्करी जरी केली तरी त्याचा राग मानू नये असा संकेत रूढ आहे. होळी पेटवण्याचे ग्रामीण भागात मुख्य कारण हे असे की, गावात वास्तव्यास असलेली थंडी होळी पेटवण्यामुळे पळून जाते. पुराणात धर्मग्रंथात असे म्हटले आहे की, होळीमध्ये खुळचट रूढी, परंपरा यांचे दहन होते. गावात जणू आनंदाला उधाण येते. कलगीतुऱयाचे सामने रंगतात. रंगाची उधळण होते. तमाशे, जलशे आयोजित केले जातात. होळी-शिमग्याचा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. रंगपंचमीच्या निमित्ताने ज्या घराण्याला तमाशाची परंपरा आहे ती घराणी आठवडी बाजार सन्मानाने मागतात–

ताय, ताई, ताई गं देना मला पाच रुपये बाई गं

या रुपयाचे म्हणनं काय, जशी साडी नेसून आली बाय’’

अशा पध्दतीची गाणी रंगाच्या उधळणीबरोबर लोककलावंत गातात, गावातील सर्व नागरिकांकडून वर्गणी काढून एका ड्रमामध्ये कलर पाण्यासहित मिसळवला जातो. गावातील सर्व समाजातील लोक बैलगाडीच्या मिरवणुकीबरोबर एक दुसऱयाच्या अंगावर रंगाची उधळण करतात. डबल बाऱया म्हणतात. हलगी आणि सुंदरीच्या तालावर लोक ठेके धरतात. कृष्णलीलेच्या गौळणी आणि रचना गायली जातात.

शिमग्याच्या रचना अनेक तमाशा शाहीरांनी रचलेल्या आढळून येतात. अगदी अलीकडे शाहीर दादा कोंडके यांच्या चित्रपटात होळीच्या सोंगाविषयी रचना सापडते ती अशी-

   ‘होळीचं सोंग घेऊन, लावू नका लाडीगोडी

          रंग नको टाकू माझी भिजल कोरी साडी

अशा प्रकारच्या शृंगारिक रचनाचा मोह लोककलांबरोबरच अनेक हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीलासुध्दा आवरता आला नाही. या सणानिमित्ताने लोकमनात, लोकजनात, ग्रामजनात विविधतेतून एकता पहावयास मिळते. सामाजिक सलोखा एकसंध बांधण्याचे काम होळी-शिमग्याच्या निमित्ताने हिंदुस्थानात पहावयास मिळतो.

आपली प्रतिक्रिया द्या