वर्तमानातील कविता

98

>> प्रतिभा सराफ

एक ‘योग’ शिक्षक म्हणून प्रस्थापित झालेल्या मनोज वराडे यांचे ‘योग’ या विषयावरील लेख मी वाचले होते. अचानक एका कविसंमेलनात त्यांनी एक विनोदी कविता सादर केली आणि त्या कवितेला भरभरून दाद मिळाली. तेव्हा कवी मनोज वराडे यांची ‘कवी’म्हणून ओळख झाली. या गोष्टीला दहा वर्षे झाली असावीत. तसा खूप उशिरा आलेला काव्यसंग्रह – ‘तुझं येणं’

‘तुझं येणं’ ही कविता नक्कीच प्रेमकविता असेल असं वाटणं स्वाभाविक आहे.

वाट पाहायचो आम्ही तुझी
पूर्वी चातकासारखी
कासावीस व्हायचा जीव
तुला उशीर झाल्यावर…

अशी सुरुवात करून शेवटी वाट पाहायचो तो म्हणजे ‘पाऊस’ अशा कलटी देणाऱया नर्म विनोदी कविता लिहिण्यात मनोज वराडे यांचा हातखंडा आहे. मुक्तछंदातील काही कविता संग्रहात आहेत, पण तालासुरांचे चांगले ज्ञान कवीकडे असावे असे वाटते. कारण या संग्रहात अनेक गेय कविता आहेत.

शेतामंदी पिकवतो मोत्यावानी दानं
मेघराजाकडं चार थेंबाचं मागनं
किंवा
चोहीकडे पाणी झाले
बाबा पण घरी आले
गाडय़ा झाल्या बंद, देवा बंद होवो शाळा
अशा बालकविताही संग्रहात आहेत.

‘पाऊस’, ‘आई’, ‘प्रेम’, ‘निसर्ग’ या सगळय़ा कवितांबरोबरच काही ‘सामाजिक जाणिवां’च्या कविताही संग्रहात आहेत.

त्यातील ‘मुंबई बंद’सारखी कविता मुळातूनच वाचायला हवी.

कविता म्हणजे शब्दांची नुसती मांडणी नव्हे तर प्रत्येक कवितेमागे कवीचा खोल विचार जाणवतो. आपली अभिव्यक्ती प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केलेले आढळतात. प्रत्येक शब्द, प्रत्येक आशय नेटकेपणाने हृदयापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांची कविता करते. त्यामुळे प्रत्येकाला ती कविता भावते. हे त्यांच्या कवितेचे वैशिष्टय़ आहे. कवी गेय कवितांकडून ‘गजल’ प्रकाराकडे वळलेला आढळतो. हेही चांगले द्योतक आहे.

आकर्षक मुखपृष्ठ, उत्कृष्ट छपाई, दणकट बांधणी आणि ८० कवितांचा मौलिक खजाना असलेल्या ‘तुझं येणं’ संग्रहाचे स्वागत काव्यरसिक करतील यात शंकाच नाही.

तुझं येणं
कवी – मनोज वराडे
प्रकाशक – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
पृष्ठ- ८७
मूल्य – रु. ४८/-

आपली प्रतिक्रिया द्या