वारसा वैभव – किकलीचे भैरवनाथ मंदिर

>> प्रणव पाटील

वीरगळांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले किकली तिथल्या अप्रतिम नक्षीकाम आणि स्थापत्य असलेल्या भैरवनाथ मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. प्राचीन काळातील हे मंदिर यादव राजवटीत बांधले गेले असावे असा अंदाज आहे. त्रिदल गाभारा असलेले हे मंदिर नक्षीदार स्तंभ, मैथुन शिल्पं, व्याल, सुरसुंदरी, रामायणातील विविध प्रसंग यांची अप्रतिम शिल्पं यासाठी पाहायलाच हवे.

वाई तालुक्यातील चंदन-वंदन या किल्ल्याच्या पश्चिमेला वसलेल्या किकली या गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मुंबई – बेंगलोर महामार्गावर असणाऱ्या भुईंजमधून किकली या गावाला जाणारा एक फाटा लागतो. किकली गावातील शाळेलाच लागून भैरवनाथ मंदिर असून या मंदिराला चारही बाजूंना तटभिंत घातलेली आहे. उंचावर असणारे वैशिष्टय़पूर्ण प्रवेशद्वार ही या मंदिराची खासियत आहे. एखाद्या दक्षिण हिंदुस्थानी मंदिरात प्रवेशद्वारातून आत जावे तशा प्रकाराचे प्रवेशद्वार या मंदिराला आहे. या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर दोन कीर्तिमुखांचे शिल्प असून आत प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूंना असणाऱया देवकोष्ठकांमध्ये वेगवेगळ्या देवता आहेत. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर साधारण एक-दीड एकराच्या या परिसरात मध्यभागी भैरवनाथाचे त्रिदल पद्धतीचे म्हणजेच तीन गर्भगृह असणारे दिमाखदार मंदिर उभे आहे.  मंदिराच्या संपूर्ण बाह्यभागावर शिळांवर पुरातत्व खात्याने काही सांकेतिक क्रमांक लिहिलेले आहेत. याचा अर्थ पूर्वी ढासळत असलेले मंदिर संपूर्ण उतरवून पुन्हा त्याची रचना केलेली आहे.

मंदिराच्या प्रवेशमार्गावर अर्धमंडप असून त्याला आतील बाजूस बसण्यासाठी केलेले कक्षासन आहेत. या कक्षासनाचे कठडे काही ठिकाणी भंगलेले असले तरी त्याच्या बाह्य भागावर अतिशय सुंदर शिल्पापृती आहे. यामध्ये नृत्य व वादन करणारे नर्तक तसेच काही मिथुन शिल्पंदेखील आहेत. यात एका लहान बाळाला जन्म देणाऱया स्त्र्ााrचेही शिल्प आहे. या शिल्पांच्या खाली व्यालशिल्पांचे विविध प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये मेषव्याल, शुकव्याल, सिंहव्याल, वृषभव्याल, अश्वव्याल, वराहव्याल इ. वैविध्यपूर्ण शिल्पं आहेत. मुखमंडपामधे एक पाठीवर घंटय़ांची माळ घालून मंदिरातील देवाकडे पाहत पहुडलेला भलामोठा नंदी आहे. अर्धमंडपाला जाळीदार जालवातायन आहे.

अर्धमंडपातून आत मुख्य मंडपात जाताना असलेले प्रवेशद्वार हे पाच शाखांचे नंदिनी प्रकारातील असून यावर ललाटबिंबावर हात जोडून बसलेल्या योग्याचे शिल्प आहे.  प्रवेशद्वारावर शैव द्वारपाल असून प्रवेश करताना पायरीच्या जागी अतिशय सुंदर अशी शंख, फुले कोरलेली चंद्रशिळा आहे. आतमध्ये रंगमंडप असून या मंडपाच्या मधोमध चौकोनी रंगशिळा असून मंदिरामध्ये चालणाऱया वादन, गायनाचे ते व्यासपीठच होते. या रंगमंडपाचे वितान म्हणजेच छत अतिशय सुंदर असून या मंदिराचा तो एक आकर्षणाचा बिंदूच आहे. रंगमंडपाला  जोडून तीन गर्भगृहे असून डावीकडे उजवीकडे दोन व समोरच्या बाजूस एक अशी त्यांची रचना असून प्रत्येक गर्भगृहाला वेगवेगळे मंडपाला जोडणारे अंतराळ आहे. यातील उजव्या बाजूच्या गाभाऱयात शिवलिंग असून या शिवलिंगामागे एक देवपीठावर भैरवाची काळय़ा पाषाणात कोरलेली देखणी मूर्ती असून या भैरवाचे वैशिष्टय़ म्हणजे तो ब्रह्मचारी असल्यामुळे त्याची पत्नी जोगेश्वरी मात्र इथे दिसत नाही. भैरवाचे हे ठिकाण प्रसिद्ध असल्याने काwल लावण्यासाठी लांबून लोक येतात. भैरवाच्या मूर्तीला कन्हेराची पाने लावून कौल मागितला जातो.

या मंदिरातील रंगमंडपाचे खांब अतिशय कोरीव असून दक्षिणेतील सुंदर खांबांची आठवण करून देतात. उजवीकडच्या खांबांवर अधिष्ठानावरच्या भागावर सुरसुंदरी असून यात नर्तकी व पत्रलेखिकsची शिल्पे अतिशय सुंदर आहेत. खांबाच्या मधल्या भागावर रामायणातले काही प्रसंग कोरलेले आहेत. यामध्ये वाली- सुग्रीव युद्ध, राम, लक्ष्मण व हनुमान यांची भेट, रामाचे खोटे मृत मुख सीतेला दाखवणारा प्रसंग, रामायणातील युद्धप्रसंग, त्याचबरोबर विष्णूचे त्रिविक्रम रूप व वामन अवताराचा प्रसंग, शिवाच्या तांडवनृत्याचा प्रसंग इत्यादि.

मंदिराच्या बाह्य भागावर कोणतेही शिल्प नाही. शिखर पडल्यामुळे चुना व सिमेंटचे आच्छादन करून उतरते छत बनवलेले आहे. या मंदिराच्या उजवीकडे दोन उद्ध्वस्त मंदिरे आहेत. या मंदिरासमोर दोन दुभंगलेली गजशिल्पे असून त्यातील एक शिल्प फारच कोरीव आहे. या मंदिरामागे काही स्तंभ पडलेले आहेत. त्यातील एका स्तंभावर गणेशवंदनेचे चित्रण असणारे शिल्प अतिशय सुंदर आहे.

मंदिराच्या आवारात तटभिंतीला टेकवून ठेवलेले वीरगळ ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे जतन केलेले आहेत. वीरगळांची इतकी संख्या खचितच एखाद्या गावात सापडेल. लढाईमध्ये मृत पावलेल्या सैनिकांची स्मारके म्हणजे वीरगळ होय. या वीरगळांचे अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात. यात अश्वदलातील सैनिक, गजदल व पायदळातील सैनिकही दाखवलेले आहेत. त्याचबरोबर आत्मबलिदान दर्शवणारे वीरगळही पाहायला मिळतात हे विशेष आहे. येथील वीरगळ साधारण चार फुटांचे असून त्याहीपेक्षा कमी उंचीचेही वीरगळ आहेत.

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या