वेब न्यूज – ‘Detonating’ Rocket Engine

1254

>> स्पायडरमॅन

सध्या अंतराळ तंत्रज्ञानात जगभरातील अनेक दिग्गज कंपन्या नासाच्या तोडीस तोड प्रकल्पांवर काम करत आहेत. खासगी कंपनीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱया प्रकल्पांमध्ये मानवाला अंतराळात सहल घडवून आणण्यापासून ते मानवाच्या वसाहती अंतराळात स्थापन करण्यापर्यंत विविध प्रकल्प समाविष्ट आहेत. सरकारी संस्था असलेल्या नासाबरोबरच स्पेसएक्ससारखी खासगी कंपनी अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात जोरदार स्पर्धा करत आहे. अंतराळ प्रकल्प कोणताही असो, त्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे खर्चाची बचत करणे आणि एकापेक्षा जास्त वेळा वापरता येणाऱया वस्तूंची निर्मिती करणे. कोणत्याही अंतराळ प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे रॉकेट लाँचिंगचा. सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठय़ा खर्चाचा भाग असे म्हटले तरी चालेल. रॉकेट लाँचिंगच्या वेळी प्रोपेलेंटचा खर्च हा प्रचंड असतो. प्रोपेलेंट म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून रॉकेटला बाहेर नेऊन सोडण्याचा भाग. त्यासाठी प्रचंड प्रमाणात इंधन खर्ची पडते आणि त्याचा खर्चही अमाप असतो. आता याचा खर्च कमी करण्यासाठी शास्त्र्ाज्ञांच्या एका गटाने एका आधुनिक रॉकेट इंजिनाचे गणितीय मॉडेल तयार केले आहे. रॉकेट लाँचिंगच्या तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडवू शकणाऱया या इंजिनाला सध्या Rotating detonation engine (RDE) नाव देण्यात आले आहे. पारंपरिक रॉकेट इंजिनामध्ये प्रोपेलंटला इग्निशन चेंबरमध्ये जाळले जाते आणि नंतर ऊर्जा आणि ताकद मिळवण्यासाठी मागील बाजूच्या नोजलद्वारे बाहेर पाठवले जाते. नव्या आरडीईमध्ये गोष्टी वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. या नव्या डिटोनेशन इंजिनमध्ये प्रोपेलेंटचे वेगळ्या तंत्रज्ञानाद्वारे दहन केले जाते. यासाठी concentric cylinders ची मदत घेतली जाते. दोन सिलिंडर्समधील अंतरात प्रोपेलेंट वाहते आणि प्रज्वलनानंतर उष्णतेची एक वेगवान शॉक वेव्ह तयार होते. गॅसची एक मजबूत पल्स अत्यंत उच्च दाब आणि तापमान तयार करते, जे इंजिनाला आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगवान बनवते. सध्या विविध प्रयोगांद्वारे या इंजिनाची रचना कितपत सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे याची खात्री करणे चालू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या