श्री शंकरगाथा : अशक्यही ‘शक्य’ केले!

श्रीशंकर महाराजांचा मुक्काम बऱयाचदा पुणे शहरात होत असे. प्रा. भालचंद्र देव यांना श्रीमहाराजांच्या सहवासाचे भाग्य अनेकदा लाभले. प्रा. देव बऱयाच वेळेला श्रीमहाराजांना अध्यात्मातील शंका किंवा पारमार्थिक ‘कूट’प्रश्न विचारीत असत. अशावेळी श्रीमहाराज जवळपास असलेल्या ग्रंथांपैकी एखादा ग्रंथ त्यांना उघडावयास सांगत. प्रा. देव यांच्या मनातील शंका आणि श्रीमहाराजांनी सांगितलेला ग्रंथ यामध्ये वरकरणी जरी साम्य नसले तरीही श्रीमहाराज मात्र प्रा. देव यांना त्या ग्रंथातील ज्या क्रमांकाचे पृष्ठ वाचावयास सांगत असत, त्यामध्ये प्राध्यापकांच्या सर्व शंकांचे निरसन होईल असाच मजकूर असे. असे केवळ एखादेवेळी अन् निव्वळ योगायोगाने नव्हे तर अनेकदा घडले होते. यावरून श्रीमहाराजांचा अध्यात्ममार्गातील अधिकार आणि थोरवी किती जबरदस्त होती याची प्रचीती येते.

श्रीशंकर महाराजांचे ज्ञान आणि योगमार्गाविषयीचे प्रभुत्व दाखविणारे असे अनेक प्रसंग आहेत. श्रीमहाराजांची उंची बेतासबात आणि देहयष्टी किरकोळ असली तरीही त्यांच्या अद्भुत शरीरसामर्थ्याचा परिचय घडवून देणारी ही ‘वाठार’ गावातील कथा आहे. सातारा जिह्यातील ‘वाठार स्टेशन’ नावाने परिचित असलेला हा परिसर तत्कालीन थोर सत्पुरुष श्रीवागदेव महाराज यांचे ‘समाधीस्थळ’ म्हणून प्रसिद्ध आहे. या गावातील एक मल्ल विलक्षण शक्तिसामर्थ्य राखून होता. कुस्तीसाठी सुप्रसिद्ध असलेला हा मल्ल गडी एकदा आपल्याच मस्तीत रस्त्याने चालला असता अचानक श्रीमहाराज तेथे आले आणि उडी मारून थेट त्याच्या खांद्यावरच बसले. अवचितपणे घडलेल्या या प्रकारामुळे तो मल्ल आधी गोंधळला, मात्र नंतर खांद्यावर असलेले श्रीमहाराजांचे ओझे झटकून टाकण्यासाठी त्याने जोराचा हिसका दिला तरी काही उपयोग झाला नाही. तो मल्ल वारंवार झटापट करूनदेखील श्रीमहाराजांना खांद्यावरून उतरवू शकला नाही. श्रीमहाराजांची देहयष्टी जरी किरकोळ असली तरी त्यांच्या अचाट सामर्थ्याने तो मल्ल मेटाकुटीस आला. श्रीमहाराजांचे वजन काही त्याला सहन होईना. दमछाक होऊन अक्षरशः रडकुंडीस आलेला तो मल्ल अखेरीस शरण आला तेव्हा श्रीमहाराज त्याच्या खांद्यावरून उतरले.

वाठारकर मल्लाने श्रीमहाराजांच्या चरणांवर लोळण घेतली तेव्हा श्रीमहाराज त्याला सहजच म्हणाले, ‘‘अरे, तुला कुस्ती जिंकण्यासाठी एक नामी युक्ती सांगतो. तू गावात दवंडी पिटवून सर्वांना जेवणाचे आमंत्रण दे.’’ श्रीमहाराजांची ही विचित्र युक्ती ऐकून तो मल्ल चिंतेत पडला आणि म्हणाला, ‘‘गावजेवण देण्यासाठी माझ्यापाशी काही नाही. पैसे नाही, धान्यही नाहीत. अशाने माझी फजिती होईल.’’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘‘मी असताना काळजी कशाची? खुशाल सर्वांना गावजेवणाचे आमंत्रण दे.’’ श्रीमहाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्या मल्लाने गावजेवणाची दवंडी पिटवली. तोवर इथे अन्नपूर्णेची यथास्थित पूजा करून स्वतः श्रीमहाराजांनी शेरभर तांदळाची खिचडी तयार केली आणि भोजनासाठी जमलेल्या मंडळींची पंगत बसवून मल्लाला सर्वांना खिचडी वाढण्यास सांगितले. त्या शेरभर तांदळाच्या खिचडीत समस्त गावकरी तृप्त होईतोवर अगदी पोटभर जेवले. श्रीमहाराजांची ही लीला पाहून मल्ल आश्चर्यचकित झाला.

पुढे काही काळाने हा मल्ल पुणे येथे कुस्ती लढण्यासाठी गेला असता त्यास विजेतेपद मिळाले तेव्हा त्याची विजयी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मंडई येथील प्रख्यात श्रीअक्कलकोटस्वामींच्या मठाजवळून चालली असता श्रीमहाराजांना मठाजवळ उभे असल्याचे पाहून तो मल्ल मिरवणूक बाजूला सोडून धावतपळत तेथे आला. त्याने श्रीमहाराजांचे चरण धरले आणि त्यांना आपल्या खांद्यावर बसवून तो मल्ल मिरवणुकीत सामील झाला. श्रीमहाराजांच्या अशा अनेक अतर्क्य लीला त्या काळी अनेकांना प्रत्यक्ष अनुभवावयास मिळाल्या.

असाच प्रकार एकदा डॉ. हरी त्र्यंबक खरे यांच्या बाबतीत घडला. श्रीमहाराजांनी एका उत्सवाच्या निमित्ताने खरे यांच्याकडून तांदूळ-गहू आदी धान्यांची प्रत्येकी पाच शेर इतकी सामग्री मागवली आणि त्या सामग्रीमध्ये पाच हजार भक्तांना तृप्त होईपावेतो जेवू घातले.